Hair Growth Sleeping Position: एक वेळ आकाशातील तारे मोजून होतील, डोक्यावरचे केस मोजता येतील पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्रिक्स व टिप्स काही केल्या संपणार नाहीत. केस मोजण्याचा विषय निघालाच आहे तर आपण केसवाढीसाठी व्हायरल होणाऱ्या हॅकला उलगडून पाहणार आहोत. सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून अशी एक संकल्पना व्हायरल होत आहे की बेडवरुन मान खाली सोडून झोपलं किंवा पोटावर झोपताना मान खाली झुकवली तर केसवाढीसाठी खूप मदत होऊ शकते. यामागे लॉजिक असं दिलंय की मान खाली वाकली असल्याने मेंदूला पुरेसा रक्त पुरवठा होतो परिणामी केसाच्या वाढीला हातभार लागतो. ही हॅक खरोखरच आपल्याही कामी येऊ शकते का? तज्ज्ञांचे याविषयी काय मत आहे हे आता आपण जाणून घेऊया..
“जेव्हा तुम्ही तुमचे डोके किंवा शरीर वाकवता, तेव्हा टाळू आणि केसांच्या कूपांमध्ये रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे टाळूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस गळणे कमी होते,” असे त्वचातज्ज्ञ डॉ ब्लॉसम कोचर यांनी सांगितले. पण इतकंच नाही, ऑक्सिजनच्या पुरेशा पुरवठ्यासह केसांच्या वाढीला चालना देणारी सर्व आवश्यक पोषक तत्त्वेही टाळूपर्यंत पोहोचतात असेही कोचर यांनी पुढे म्हटले. संगीता तिवारी, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, आर्टेमिस लाइट, NFC, दिल्ली यांनी सांगितले की, अतिरिक्त फायद्यांसाठी, काही लोक डोके खाली सोडून झोपण्याआधी त्यांच्या टाळूला तेलाने (जसे नारळ किंवा एरंडेल तेल) मसाज करतात.
कोचर यांनी ‘Inversion’ पद्धत कशी अवलंबता येईल याचाही उलगडा केला. त्यानुसार आपण खालील स्टेप्स फॉलो करू शकता.
- Inversion सुरू करण्यापूर्वी ५ -१० मिनिटे कोणत्याही तेलाने तुमच्या टाळूची मालिश करा. हे केसांच्या कूपांमध्ये रक्त प्रवाह उत्तेजित करते.
- आता हळूहळू तुमचे शरीर उलटे करणे सुरू करा. तुम्ही शक्य असल्यास शीर्षासन करू शकता किंवा मग साध्या पद्धतीने तुमच्या पलंगाच्या मध्यभागी बसून पोटावर झोपून मान खाली सोडू शकता. सोफ्यावर सुद्धा हा प्रयोग शक्य आहे पण पुरेशी जागा आहे ना व मानेवर ताण येत नाही ना याची खात्री करावी.
- ४ ते पाच मिनिटे या स्थितीत राहा. हळूहळू तुमच्या सामान्य स्थितीत परत या. घाई करू नका अन्यथा तुमच्या नसा किंवा स्नायूंना नुकसान होऊ शकते. मान लचकण्याचा सुद्धा धोका असतो त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही सावकाश होऊद्या.
आता वरील पद्धत सोपी आहे, फायदे होण्याची शक्यताही आहे म्हणून लगेचच अवलंब करावा का? तर थांबा. आधी या खालील बाबी सुद्धा लक्षात घ्या.
मर्यादित वैज्ञानिक पुरावे: वाढलेला रक्त प्रवाह सर्वसाधारणपणे फायदेशीर ठरू शकतो, परंतु या विशिष्ट पद्धतीद्वारे केसांच्या वाढीस चालना मिळते असे अभ्यासांनी निश्चितपणे दाखवलेले नाही.
सुरक्षिततेची चिंता: तुमचे डोके उलटे केल्याने चक्कर येऊ शकते, विशेषत: ज्यांना याची सवय नाही त्यांना. हळू सुरू करा आणि आपल्या शरीराचे ऐका. तुम्हाला कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास, ताबडतोब थांबवा
तिवारी यांच्या माहितीनुसार, गर्भवती महिला, उच्च रक्तदाब, चक्कर येणे, कानाचे संक्रमण किंवा पाठीच्या/मणक्याचे दुखणे असलेल्या लोकांसाठी या पद्धतीची शिफारस केलेली नाही. कोणत्याही नवीन तंत्राचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषत: जर तुम्हाला आरोग्यविषयक समस्या असतील तर हे अनिवार्य आहे.
हे ही वाचा<< सकाळी काळी मिरीची पूड मिसळून एक कप पाणी प्यायल्याने होणारे फायदे वाचाच; पावसाळ्यात तर होईल मोठी मदत
संपूर्ण केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार महत्त्वाचा आहे. पौष्टिक तेलांसह स्कॅल्प मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारू शकते. तुमच्या रुटीनमध्ये एक दिवस मसाजसाठी वेळ आवर्जून काढा.