वाढते वजन हा बहुतांश लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. वजन वाढणं ही केवळ एक प्रक्रिया नसून, ती आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. चुकीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या वेळा व पद्धती, तसेच व्यायामाचा अभाव यांमुळे अनेकांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसू लागली आहे. वजन आणि शरीरातील चरबी वाढल्यानं रक्तदाब, हदयाशी संबंधित समस्या, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, सांधेदुखी, कोलेस्ट्रॉल या आजारांचा धोका संभवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करूनही फारसा फरक जाणवत नाही. काही जण योगासने, व्यायाम करतात; पण तरीही त्यांना काही परिणाम जाणवत नाही. बहुतेक लोकांचं पोट सुटलेलं दिसतं. अलीकडच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांची पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे वेगवेगळ्या गंभीर आजारांचाही सामना करावा लागतो. कंबरेच्या आजूबाजूला चरबी वाढण्याला ‘बेली फॅट’, असं म्हटलं जातं.

पोट आणि कंबरेवर चरबी वाढल्यानं वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. पोटावरील चरबी दिसायलाही चांगली दिसत नाही आणि त्यामुळे अन्य शारीरिक व्याधी उदभवू शकतात. स्त्रियांमध्ये ओटीपोटावर अधिक चरबी असते; पण पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे हृदयाचे नुकसान होते का? याच विषयावर बंगळुरू येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. कुमार केंचप्पा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली आहे.

(हे ही वाचा : Green Coffee: झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी खरंच फायदेशीर? एक्सपर्टनी दिलं उत्तर… )

बेली फॅटमुळे हृदयविकाराचा धोका अधिक?

डॉक्टर सांगतात की, आजकाल महिला आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोटाची चरबी भारतात पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सामान्य आहे. त्यातच किशोरवयीन मुला-मुलींमध्येही याचे प्रमाण वाढत चालले आहे. खरं तर, अधिकतर तरुणाई पोटाच्या चरबीचा सामना करीत आहे. फास्ट फूड खाण्याची सवय, व्यायामाचा अभाव व बिघडलेली जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं ते सांगतात.

डॉक्टर म्हणतात की, पोटावरील चरबी ही शरीरासाठी हानिकारक असते. व्यक्तीच्या कंबरेवरील अतिरिक्त चरबीमुळे हृदयाच्या समस्येचा धोका वाढू शकतो. पोटावर जास्त चरबी असल्यानं हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगाचा धोका जास्त आहे. ज्या स्त्रियांच्या कंबरेचा आकार नितंबांपेक्षा मोठा असतो, त्यांना हार्ट अ‍टॅक येण्याची शक्यता जास्त असते. अतिरिक्त चरबी पोटाच्या आजूबाजूला जमा होते आणि रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये रक्ताची गती वाढते. त्याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होऊ शकतो.

६ मार्च २०१८ मध्ये जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशननं यूकेमध्ये ४० ते ६९ वयोगटातील सुमारे ५,००,००० लोकांचा मागोवा घेतला. संशोधकांनी सहभागींच्या शरीराचे मोजमाप घेतले. त्यावरून असं दिसून आलं की, पोटावरील जास्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका १८ टक्के महिलांमध्ये; तर पुरुषांमध्ये सहा टक्के येण्याचे प्रमाण आहे. खरं तर संशोधनावरून असे पुढे आले की, हृदयाशी संबंधित आजार रोखण्यासाठी पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करणं आवश्यक आहे. या पोटावरील चरबीमुळे महिला चांगल्याच त्रस्त झाल्या आहेत.

पोटावरील अतिरिक्त चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?

वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं डायटिंग करतात किंवा तासन् तास जिममध्ये घाम गाळतात; परंतु तरीही वजन कमी होत नाही. खरं तर चरबी कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता ते खूप महत्त्वाचं आहे. कंबरेचा घेर कमी करण्यासाठी प्रथिनं अधिक व कर्बोदकं कमी घेण्याचा सल्ला दिला जातो. पोहणं, सायकल चालवणं, वेट ट्रेनिंग व वर्कआऊट यांमुळेही पोटावरील अतिरिक्त चरबी नियंत्रणात आणता येऊ शकते, असे डाॅक्टर सांगतात.

खरं तर, सुटलेलं पोट कमी करण्यासाठी जंक आणि अनहेल्दी फूडपासून दूर राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. संतुलित आहार घ्या. त्याचबरोबर नियमित धावणं, चालणे, व्यायाम करणं गरजेचं आहे. नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे, असंही ते नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hat abdominal obesity could up your risk of heart attack belly fat linked with repeat heart attacks pdb
Show comments