एक दिवस एक गृहस्थ त्यांच्या सतरा-अठरा वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. म्हणाले, “डॉक्टर आमच्या रोहनच्या उजवा अंगठ्याच्या नखाजवळ वारंवार पू धरतो व तो भाग दुखतो. अ‍ॅण्टिबायोटीक दिले की काही दिवस बरं असतं. पण परत ये रे माझ्या मागल्या. डॉक्टरांनी तर दोनदा त्याचं नखदेखील काढलं. तरी काही उपयोग झाला नाही. लोक म्हणतात, ते नखुर्डे झालं आहे. तो बिचारा हैराण झाला आहे या आजाराने.” मी रोहनला तपासलं. त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाच्या आतील बाजूस व पुढे जो नरम भाग असतो तो सुजला होता व लाल झाला होता. थोडसं दाबलं तरी रोहनला खूप दुखत होतं व तिथून थोडा पूदेखील आला. तो खरोखरच नखुर्डे हा आजार होता.

काय असते हे नखुर्डे?

या आजारामध्ये पायाच्या एका किंवा दोन्ही अंगठ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूला असलेल्या नरम भागामध्ये नख घुसते व त्यामुळे तिथे दुखू लागते. तो भाग लाल होतो व कधीकधी जरा दाबलं तर तेथून पू येतो. तो भाग बऱ्यापैकी सुजतो व कधीकधी चांगलाच वरती येतो. यालाच नखुर्डे असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये Ingrowing Toenail असे म्हणतात. जी माणसे टोकदार बूट घालतात, त्यांची बोटे आत चिमटली जातात. त्यामुळेही नखुर्डे होऊ शकते. तसेच अंगठ्याचे नख कापताना जर जास्त गोलाकार कापले व बाजूचा भाग नेलकटरने नीट काढला गेला नाही तर बाजूला जे नखाला टोक तयार होते ते बाजूच्या नाजूक भागाला टोचत राहते व त्यामुळेही नखुर्डे होते.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

हेही वाचा – Health Special: अँटिबायोटिक्सचा अतिवापर कसा टाळाल? कोणती काळजी घ्याल? (भाग दुसरा)

नख फार जाड व जास्त रुंद असेल तरी देखील नखुर्डे होऊ शकते. कारण असे रुंद नख खालील नखाच्या अरुंद गादीमध्ये माऊ शकत नाही व असे नख नेलकटरने काढताना एकदम बाजूचा आत घुसलेला नखाचा भाग नीट कापता येत नाही व तो तिथे राहिल्यामुळे नखुर्डे होते. जर एखादे पाकीट घेतलं आणि त्यामध्ये एखादं पोस्ट कार्ड टाकलं आणि जर कार्ड पाकिटापेक्षा मोठे असेल तर पाकिटाची कडा फाटण्याची शक्यता असते. तसेच इथे होऊन जातं.

पायाला जास्त घाम येतो किंवा पायाच्या अंगठ्याला वारंवार धावताना किंवा खेळताना लागत राहते. त्यांनाही नखुर्डे होण्याची शक्यता जास्त असते. काहीजणांची नखं ही अतिवक्र असतात व त्यामुळे नखांच्या बाजूच्या कडा ह्या नखाच्या गादीमध्ये रूतूनही नखुर्डे होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचे नख जन्मजातच सरळ न येता थोडे तिरके वाढते. अशा व्यक्तींनाही नखुर्डे होण्याची शक्यता जास्त असते. नखुर्डे होण्याचे प्रमाण हे पौगंडावस्थेतील मुले-मुली व साधारण तीस वर्षांपर्यंतच्या तरुण-तरुणींमध्ये जास्त असते. तसेच मुलींपेक्षा मुलांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. साधारण दोन टक्के व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येतो. नखुर्डे हे फक्त पायांच्या अंगठ्यांनाच दिसून येते. पायांच्या बाकी बोटांना त्यांची नखे छोटी असल्यामुळे नखुर्डे होत नाही. नखुर्डे कमी प्रमाणात असेल तर ठणका कमी असतो. पण नख जास्त आत घुसल्यामुळे तिकडे जर जंतूसंसर्ग झाला तर मात्र ठणका जास्त असतो व चालताना, विशेषतः चप्पल किंवा बूट जर तिथे लागला तर, आणखी दुखते.

नखुर्ड्यावर उपाय काय?

नखुर्डे होऊ नये यासाठी पायाच्या अंगठ्याचे नख कापताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. ते नख थोडे वाढू द्यावे व नख दोन्ही बाजूने पूर्ण वर आले की मग नेलकटरने सरळ कापावे. जास्त गोलाकार कापू नये. नख असे कापावे की नख कापून झाल्यानंतर नखाचे दोन्ही कोपरे आपल्याला दिसले पाहिजेत. जास्त टोकदार बूट वापरू नयेत. नखुर्डे झाल्यास पाय गरम पाण्यात बुडवावा व त्यानंतर पुसून तिथे जंतुनाशक मलम लावावे. नखुर्ड्यामधून जर पू यायला सुरुवात झाली असेल व तो भाग चांगलाच सुजला असेल तर डॉक्टर त्यासाठी तोंडावाटे प्रतिजैविके देतात व ठणका तसेच सूज कमी करायच्या गोळ्या देतात. त्यांनी तिकडचा जंतूसंसर्ग कमी होऊन तात्पुरते बरे वाटते. पण नख सतत वाढत असते व त्यामुळे जसं ते बाजूच्या नाजूक भागात घुसते तसं परत पिकणे व सुजणे चालूच राहते. त्यासाठी त्वचारोग तज्ञ किंवा सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हा आजार समूळ नष्ट व्हावा यासाठी काही शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. सर्वप्रथम एक साधी शस्त्रक्रिया करून पाहिले जाते. यामध्ये तो भाग सुन्न करून जो आत वाढणारा नखाचा टोकदार तुकडा (splinter) आहे तो कापून तिकडे गोलावा दिला जातो व तो भाग कानशीने घासून गुळगुळीत केला जातो. बहुतेकांना यामुळे कायमचा आराम मिळतो. पण काही कालावधीनंतर परत त्याच ठिकाणी नखुर्डे झाल्यास मग मात्र हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी म्हणून विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये तो भाग सुन्न करून एकतर संपूर्ण नख काढले जाते किंवा जिकडे नखुर्डे झाले आहे तिकडचा पूर्ण नखापैकी साधारण पाव भाग (पण पूर्ण उभा, नखाच्या मुळापर्यंत) काढला जातो व त्यानंतर जिकडे नखुर्डे झाले आहे त्या बाजूला नखाच्या मुळामध्ये काडीने तीव्र आम्ल लावले जाते. जेणेकरून नख जेव्हा पुन्हा वाढते तेव्हा जिकडे तीव्र आम्ल लावले आहे तेथील नखाचे मूळ नष्ट होते. त्यामुळे तिथून नख येत नाही व जे नख फार रुंद असतं ते आपोआपच अरुंद होते. त्यामुळे ते नखाच्या बाजूच्या कडेमध्ये घुसत नाही. पण यानंतरही नख कापताना योग्य ती खबरदारी घेणे व टोकदार बूट किंवा आवळ सँडल न वापरणे ही काळजी घ्यावीच लागते.

हेही वाचा – आवळा-मध-काळी मिरी खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवते का?; सद्गुरुंनी सुचवलेल्या उपायांबाबत तज्ज्ञ काय सांगतात…

नखुर्डे झाल्यास वेळीच त्वचारोग तज्ज्ञ किंवा सर्जनचा सल्ला घ्या व त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यास ती वेळीच करून घ्या. कारण प्रतिजैविके घेतल्यास तुम्हाला तात्पुरते बरे वाटेल. पण जोपर्यंत नख आत घुसणे चालूच आहे तोपर्यंत हा आजार चालूच राहू शकतो.