जिने चढताना दम लागतोय? त्यामुळे तुमचीही तुमच्या हृदयासंबंधीच्या आरोग्याची चिंता वाढू लागली आहे? मग असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाही आहेत. परंतु, क्वीन्स कॉलेज स्टेप टेस्ट नावाची एक अतिशय सोपी अशी चाचणी तुमचे आरोग्य कितपत चांगले आहे याचा एक अंदाज देऊ शकते. मात्र, या नुकत्याच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, भारतातील ४० टक्के तरुण ही चाचणी पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, ही एक गंभीर बाब आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमधील अहमदाबाद येथील व्ही. एस. हॉस्पिटलमध्ये एसबीबी लेज ऑफ फिजिओथेरपीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर तरुण व प्रौढांमधील हृदयाच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “इफेक्ट ऑफ फिजिकल पॅरामीटर्स ऑन क्वीन्स कॉलेज स्टेप टेस्ट परफॉर्मन्स, अहमदाबाद, गुजरात, इंडिया” असे या संशोधनाचे नाव आहे. हे संशोधन ‘सोसायटी ऑफ इंडियन फिजिओथेरपिस्ट’च्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या अभ्यासातून असे निदर्शनास आले की, सहभागी झालेल्या तरुणांपैकी ४० टक्के तरुण ही चाचणी पूर्ण करू शकले नाहीत.

या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला काही ठरावीक गतीने एका प्लॅटफॉर्म किंवा पायऱ्यांवर चढ-उतार करावा लागतो, असे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे न्यूरो-रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्ट व डायरेक्टर डॉक्टर अभिषेक श्रीवास्तव यांनी ‘क्वीन्स स्टेप टेस्ट’बद्दल माहिती देताना सांगितले.

हेही वाचा : तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….

“क्वीन्स कॉलेजची स्टेप टेस्ट तुम्हाला तुमच्या तंदुरुस्तीचे मोजमाप करण्यास मदत करते. या चाचणीमुळे अतिशय झटपट आणि सुरक्षितरीत्या तुम्हाला तुमच्या VO२ मॅक्सबद्दल अंदाज लावता येऊ शकतो. VO2 मॅक्स म्हणजे सोप्या भाषेत व्यायामादरम्यान तुमचे शरीर सर्वाधिक वापरत असलेल्या प्राणवायूचे परिमाण, असे म्हणता येऊ शकत,” असे डॉक्टर अभिषेक यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

ही चाचणी कशी घेतली जाते?

तुम्हाला ही चाचणी घेण्यासाठी १६.२५ इंच/ ४१.३ सेंमीच्या पायरीवर तीन मिनिटे चढणे-उतरणे ही क्रिया करावी लागते. या चाचणीमध्ये महिलेला दर मिनिटाला २२ वेळा पायरी चढावी व उतरावी लागते. पुरुषांसाठी हा आकडा २४ असा आहे.

वेळ संपल्यावर चाचणी ताबडतोब थांबवावी. चाचणी घेतल्यानंतर ५ ते २० सेकंदांच्या विश्रांतीनंतर १५ सेकंद हृदयाचे ठोके मोजले जातात.

या १५ सेकंदांच्या आकडेवारीला चारने गुणले जाते. त्यामुळे प्रतिमिनीट ठोक्यांचा आकडा म्हणजेच bpm काढता येतो. या गुणोत्तरावरून VO२ मॅक्स ची वारंवारीता लक्षात येते.

हेही वाचा : तुम्ही ‘बनावटी’ ORS तर पीत नाही ना? ‘शारीरिक त्रास ते मेंदूला सूज’, होऊ शकतात गंभीर समस्या! डॉक्टरांचा सल्ला पाहा

VO२ मॅक्सचे महत्त्व काय?

VO२ मॅक्स सर्वाधिक असल्यास तुमचे शरीर उत्तमरीत्या काम करू शकते. तुमचे हृदय, रक्तवाहिन्या व श्वसनसंस्था उत्तम काम करत असल्याचे ते चिन्ह आहे, असे म्हणता येऊ शकते. याचे फायदे काय आहेत हेदेखील डॉक्टर अभिषेक यांनी सांगितले आहे, ते पाहू.

उत्तम पद्धतीने ताण सहन करणे शक्य : दैनंदिन जीवनातील अपेक्षा आणि अनपेक्षित आव्हाने सांभाळण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये असू शकते.

क्रॉनिक आजारांचा धोका कमी : उच्च VO२ मॅक्स असणे ही बाब हृदय, मधुमेह अशा क्रॉनिक आजारांचा आणि अल्पवयात मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

एकंदरीत आरोग्य सुधारण्यास मदत : शरीरात प्राणवायूचे प्रमाण अधिक असल्याने आपोआपच तुमचे संपूर्ण आरोग्यदेखील सुधारण्यास किंवा उत्तम राहण्यास मदत होऊ शकते. शरीरास दिवसभर काम करण्यास त्यामुळे अधिक ऊर्जा मिळू शकेल.

त्यामुळे या चाचणीत ४० टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे अयशस्वी होणे ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टर अभिषेक म्हणतात. “याचा अर्थ, आपल्या देशात शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते, असे लक्षात येते. आपल्या तरुण पिढीचे सर्वाधिक लक्ष हे शारीरिक हालचालींकडे नसून, सामाजिक माध्यमांकडे आहे,” असे ते म्हणतात.

आरोग्यदायी हालचालींकडे लक्ष देण्याची गरज

या सोप्या चाचणीतील कमी गुणांकडे पाहता, यावर काहीतरी उपाय करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टर अभिषेक यांचे मत आहे. त्यासाठी त्यांनी सुचविलेले उपाय खालीलप्रमाणे :

जनजागृती करणे : तरुण पिढीला बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम सांगून, शारीरिक तंदुरुस्तीबद्दल शिक्षण देणे.

विद्यार्थ्यांची तपासणी : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘क्वीन्स कॉलेज स्टेप’ चाचणीची अंमलबजावणी करणे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you took queens college step test for healthy heart and lungs why is it important for young generation checkout dha
Show comments