आम्ही मैत्रिणी अनेक दिवसांनी नेहाच्या घरी जमलो होतो. नेहा गेली अनेक वर्ष चविष्ट आणि पोषक पदार्थ तयार करते. नेहाच्या घरी गेलं कि तिची आई आणि आजी कुतूहलाने आणि समरसून आमच्यात सहभागी होतात .
गप्पा रंगलेल्या असताना हिवाळ्यात बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांबद्दल , फळांबद्दल आम्ही बोलू लागलो. बोलता बोलता सहज नेहाने विचारलं -आजी तुम्ही ती शेवग्याच्या पानाची भाजी कशी करायचात ग ? नेहाच्या आजीच्या डोळ्यात चमक दिसली. “नेहमी पालेभाजी करतो तशीच करतात ती. अलीकडे काही पदार्थ तर माहितीच नसतात . तुम्हाला या भाज्या माहिती आहेत हे ऐकून बरं वाटलं”.
“ आजी तुम्ही थंडीत खाण्यासाठी आणखी काय काय करायचात विशेष असं ?”
त्यावर आजीने मिश्कीलपणे डोळे मिचकावून म्हटलं – आमच्या वेळी आम्ही खूप पदार्थ करायचो. घरी सगळ्यांना खायला लाडू बनवायचो . मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू. सगळ्यांनी खायलाच पाहिजेत असा कडक नियम होता घरी” आजी सुरेख हसत म्हणाल्या. “ आमच्या नेहाने बनवलेत तुमचे मॉडर्न डिंकाचे काय ते म्हणे बार “ यावर आम्ही सगळेच हसलो.
“ यावेळी मी डिंकाचे स्पोर्ट्स चॉकलेट्स बनवलेत “ नेहा म्हणाली. आणि तिने डिंकाच्या चॉकलेट्सचा ट्रे आमच्या समोर ठेवला. तिने आमच्यासाठी आणलेल्या डिंकाच्या चॉकलेट्सच्या दिशेने अर्थातच आम्ही मोर्चा वळवला.
हेही वाचा : मासिक पाळीमध्ये वेदनाशामक औषधांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
“ सुकामेवा, कोको सगळंच जमून आलंय “ मी नेहाला म्हटलं.
“ सध्या माणसं लाडवांसारखी गुबगुबीत झालीयेत आणि खायला मात्र अगदी बारीक बार हवेत “ आजींच्या या वाक्यावर आम्ही सगळेच खळखळून हसलो .
परत येताना माझ्या मनात डिंक आणि त्याच्या वेगेवेगळ्या पोषकमूल्यांचा विचार फेर धरू लागला.
डिंक – म्हणजे खरं तर झाडाचा चीक ज्याला इंग्रजीत एडिबल गम (edible gum ) असे देखील म्हटले जाते. शक्यतो पांढऱ्या आणि तांबूस रंगांमध्ये उपलब्ध असणारा डिंक हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम मानला जातो.
ज्यांना भूक कमी लागते आणि कमी खाणं खाऊन जातीत जास्त ऊर्जा मिळावी अस खाण्याकडे कल असतो त्यांच्यासाठी डिंकाचे लाडू अत्यंत उपयुक्त असतात.
स्त्रियांमध्ये विशेषतः मूल झाल्यानंतर दूध योग्य प्रमाणात तयार होण्यासाठी डिंक अत्यंत उपयुक्त आहे.
हेही वाचा : श्रेयस तळपदेला हार्टअटॅक येण्याआधी काय घडलं? डॉक्टर सांगतात, ५० वर्षाखालील पुरुषांनी कोणत्या टेस्ट कराव्यात?
ज्यांना बद्धकोष्ठ आहे त्यांच्यासाठी डिंक अत्यंत गुणकारी आहे. मात्र डिंकाचे सातत्याने सेवन करणे पोटाचे आरोग्य बिघडवू शकते. त्वचेचा पोत उत्तम करण्यासाठी तसंच सुरकुत्या कमी होण्यासाठी ५ ग्रॅम डिंक सेवन केल्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळतात.
आयुर्वेदानुसार डिंक हा गुणधर्माने उष्ण आहे. त्यामुळे डिंक सेवन करताना सोबत दूध, खोबरं , नारळाचे दूध याचा समावेश जरूर करावा.
ज्या मुलींना मासिक पाळीदरम्यान अतिरक्त रक्तस्त्राव आणि पाठदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी डिंकाचे लाडू अत्यंत पोषक आहेत .
डिंकामध्ये असणारे कॅल्शिअम , प्रथिने आणि फॉलिक ऍसिड मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींसाठी उत्तम उपाय आहेत.
डिंकामध्ये असणारे लॅटेक्सचंदन मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
वारंवार लघवी होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी डिंक उत्तम औषध आहे
हेही वाचा : Health Special : हिवाळ्यातील वारे आणि पाण्याचे गुणदोष
डिंकाचे लाडू तयार करताना त्यात सुकामेवा , खोबरं यांचा समावेश जरूर करावा. हे लाडू तयार करताना डिंकातील उष्ण गुणधर्म सोबतच्या इतर घटकामुळे त्याचे शरीरातील पचन सोपे होऊन जाते.
डिंकाला स्वतःची काही चव नसते त्यामुळे डिंकाचे लाडू तयार करताना त्यात गूळ किंवा खोबर एकत्र करणे अत्यावश्यक आहे.
डिंक शक्यतो तुपात गरम करून मग इतर पदार्थसोबत एकत्र करावा आणि लाडू तयार करताना सुकामेवा देखील वापरता येऊ शकतो.
अनेक पदार्थांमध्ये डिंक पदार्थ एकसंध ठेवण्याचंच काम करते. डिंक अनेकदा विविध रेडी टू कूक पदार्थांमध्ये देखील वापरला जातो .
या हिवाळ्यात हाडं बळकट करण्यासाठी , उत्तम रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि पोषक आहारासाठी डिंकाचा वापर नक्की करा.