Health Benefits of Charoli Dry Coconuts and Godambi सुका मेवा म्हणजे फक्त काजू, बदाम, पिस्ता नाहीत तर त्यात इतर गोष्टींचाही समावेश होतो. त्यात गोडांबी, सुकं खोबरं, चारोळी यांचाही समावेश होतो आणि या साऱ्याचा औषधी उपचारांसाठीही मोठा फायदा होतो.
गोडांबी
गोडांबी म्हणजे बिब्ब्याचा गाभा आहे. बिब्ब्याचे सर्व गुण गोडांबीत आहेतच. त्याशिवाय गोडांबी ही अत्यंत वृष्य, शुक्र व वीर्यवर्धक आहे. ज्या पुरुषाला स्त्रीसंग करायला ‘भ्या’ वाटते त्याने नियमितपणे गोडांबी खावी. मात्र त्याकरिता पुढील पथ्य कडकपणे पाळावे म्हणजे बिब्बा अंगावर उतत नाही.
गोडांबीचा प्रयोग थंड ऋतूत, थंड ठिकाणी व रात्रीच्या वेळात किंवा पहाटे करावा. हा प्रयोग करण्याअगोदर आठ दिवस आंबट, खारट व तिखट वर्ज्य करावे. आंबवलेले पदार्थ, पाव, दही, लोणचे, पापड खाऊ नये. लघवीची तक्रार असणाऱ्यांनी गोडांबी खाऊ नये. वीर्यवृद्धी अपेक्षित असणाऱ्यांनी आपल्या ताकदीनुसार तीन ते सात गोडांब्या सकाळी रिकाम्यापोटी दुधाबरोबर घ्याव्या. त्यानंतर त्या दिवशी शक्यतो दूध-भात, दूध-चपाती असा अनम्ल, अलवण व मसालाविरहित आहार ठेवावा. असा प्रयोग मानवत गेला तर सात दिवस नियमित गोडांब्या खाव्यात. लघवी कमी होत नाही यावर लक्ष ठेवावे.

ज्यांना मेंदूला ताकद हवी, स्मरणशक्ती वाढायला हवी असेल त्यांनीसुद्धा वरीलप्रमाणे प्रयोग करावा, गोडांबीबरोबर गायीचे दूध प्यावे. गोडांबी अधिक खाऊन शरीरावर फोड उठले तर घाबरू नये. कोथिंबीर वाटून त्याचा रस पोटात घ्यावा. बाहेरून त्याचा चोथा लावावा.

चारोळी

चारोळ्या खाण्याचा प्रघात नाही. पण बदामाचे सहीसही गुण चारोळीच्या बियांत आहेत. रुची यावी म्हणून केवळ चारोळी वापरावी असेच नसून लहान मुलांकरिता चारोळी हे उत्तम टॉनिक आहे. चारोळीत तीस टक्के मांसवर्धक पदार्थ व साठ टक्के स्निग्ध पदार्थ आहे. खोकल्यात चारोळीची पेज घ्यावी. त्वचाविकारात चारोळी वाटून त्याचे उटणे करावे. चारोळीचे तेल केस काळे व्हावे म्हणून वापरून प्रयोग करण्यासारखे आहे.

खोबरे

नारळ कल्पतरू आहे, त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. नारळाच्या आतील खोबरे, ओले, वाळलेले, नारळाचे दूध तीनही वेगवेगळ्या प्रकारे आरोग्य राखण्याचे व रोगनिवारण्याचे काम करतात. सुके खोबरे हे अत्यंत शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक आहे. ज्या स्त्री-पुरुषांच्या कमतरतेच्या किंवा कामेच्छा कमी असल्याच्या तक्रारी आहेत त्यांनी नियमित खोबरे खावे.

क्षीण बालके, वाढ न होणारी मुले-मुली, विशेषत: खुरटे स्तन व छाती असणाऱ्यांकरिता सुकेखोबरे वरदान आहे. ज्या बाळंतिणीला पुरेसे दूध येत नाही त्यांनी खोबरे जरूर खावे, दुधाचे प्रमाण वाढते. ज्या स्त्रियांना आपल्याला गोरीपान व तेज:पुंज संतती व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी नियमाने खोबरे गर्भारपणी खावे, उत्तम संतती होते. कंपवात विकारात कृश व्यक्तीकरिता खोबरे नियमित खाणे चांगले, त्यामुळे मज्जातंतूंचे पोषण होते, कापणे कमी होते.

धातूक्षयामुळे ज्यांना मुंग्या येतात. जास्त बोलणे किंवा विचार, मगजमारी यामुळे क्षीणता येते त्यांनी खोबरे, साखर खावी. दुबळेपणाच्या तक्रारी असणाऱ्यांना पोटात वायू धरण्याची खोड असली तरी त्यांनी खोबऱ्याबरोबर आल्याचा तुकडा किंवा सुंठचूर्ण खावे. ज्यांना मलावरोधाची सवय आहे त्यांनी कोरड्या खोबऱ्याऐवजी ओला नारळ दुबळेपणाकरिता वापरावा. कोरडे खोबरे भाजून खाल्ले तर पोटात वायू धरत नाही. पचायला सोपे जाते. नेत्रक्षीणता, वाचण्याचे खूप श्रम यामुळे डोळे थकणे याकरिता सकाळी रिकाम्यापोटी खोबरे चावून चावून खावे.

आमचे आयुर्वेदातील गुरुजी वैद्य दत्तूकाका शेण्ड्ये त्यांच्या सर्व रुग्णांना ‘ख’ पदार्थांचे टॉनिक सांगायचे. खोबरे, खारीक, खसखस, खडीसाखर व खरबुजाच्या बियांमधील मगज. ‘रंगीबेरंगी’ टॉनिकांच्या बाटल्यांपेक्षा हे टॉनिक अनेकपट चांगले. गळू, फोड पिकावयास हवे असतील तर खोबरे व कांदा ठेचून शिजवून त्याचे पोटीस बांधावे. पुवाचा निचरा आपोआप होतो किंवा गळू, फोड आपोआपच बसून जातात.

आपल्या मुलांचे दात बळकट व्हावयास हवे आहेत त्यांनी मुलांना रोज एक खोबऱ्याचा तुकडा चावून चावून खावयास सांगावे. नंतर चुळा भराव्यात. जिथे कॉडलिव्हर ऑईल किंवा अन्य प्रकारची टॉनिक खाण्याकरिता वापरली जातात त्याला आपले खोबऱ्यासारखे पदार्थ वापरून पाहावयास हवे, तुलनेने खोबरे स्वस्त आहे. ज्यांना नेहमी थंडी वाजते, खूप पांघरुण घ्यावेसे वाटते, पाय चेपावेसे वाटतात अशा वातविकारात सुके खोबरे खावे. त्यामुळे रक्त वाढते, व्हायटॅलिटी सुधारते.
नारळ वरून खडबडीत, टणक असला तरी आतले ओले खोबरे कोणालाही हवेहवेसेच वाटते. महागड्या बदाम, बेदाणा, आक्रोडापेक्षा ओल्या, सुक्या खोबऱ्याशी मैत्री करा. हाडाच्या हट्टीविकारांना, मगजमारीला दूर ठेवा.