Actress Bhagyashree Share Health Benefits Of Gawar And Spicy Recipe : ‘आज डब्याला गवाराची भाजी देतेय’, असं आईकडून कानावर पडलं तरीही अनेक जण नाक मुरडायला सुरुवात करतात. अनेकांना न आवडणाऱ्या आणि अगदी कमी लेखली जाणारी ही भाजी मात्र भरपूर पौष्टिक आहे. त्यामुळे कितीही कंटाळा केला तरी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी ही भाजी आपल्या घरी बनतेच. तर आज ‘मैंने प्यार किया’फेम अभिनेत्री भाग्यश्रीनेसुद्धा हीच गोष्ट अधोरेखित केली आहे.

सोशल मीडियावर नियमितपणे आरोग्यदायी रेसिपीसह अभिनेत्री भाग्यश्री टिप्स आणि ट्रिक्स शेअर करीत असते. भाग्यश्रीने अलीकडेच गवार या भाजीवर प्रकाश टाकला. या भाजीला कमी लेखले जात असले तरी ही भाजी प्रत्यक्षात पौष्टिकतेचे एक पॉवरहाऊस आहे, असेदेखील तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे आणि ‘महाराष्ट्रीयन प्रथिने! गवार ही फायबर, अनेक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ज्वारी किंवा नाचणीची भाकरी, मिरची, लोणच्याबरोबर गवारीची भाजी खा आणि महाराष्ट्राची अस्सल चव चाखा’, अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे.

तर अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून द इंडियन एस्क्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आणि नियमित आहारात गवार समाविष्ट करण्यामुळे कोणते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात याविषयी त्यांच्याशी संवाद साधला.

बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलच्या चीफ क्लिनिकल डाएटिशियन वीणा व्ही. यांनी गवार खाण्यामुळे जे फायदे सांगितले, ते खालीलप्रमाणे :

१. पचनक्रियेत सुधारणा (Supports digestive health)

गवारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनास, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते. त्यामुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी गवार आदर्श ठरते.

२. हृदयाच्या आरोग्याला प्रोत्साहन ( Encourages heart health)

गवारमध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

३. वजन आणि रक्तशर्करेवर नियंत्रणा (Weight and blood sugar regulation)

गवारमध्ये कॅलरीज खूप कमी असतात; पण त्यात भरपूर फायबर असते. त्यामुळे गवार खाल्यानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि साखरेचे शोषण कमी होते. त्या पार्श्वभूमीवर मधुमेही आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

४. हाडांच्या मजबुतीस चालना (Makes bones stronger)

गवारमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडांच्या मजबुतीस मदत मिळते. तसेच गवारमध्ये आढळणारे लोहाचे प्रमाण एखाद्याची ऊर्जा वाढवते आणि एकूणच सहनशक्ती टिकवून ठेवते.

५. मेंदू, त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त (Enhances brain, skin, and hair health)

गवारमध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन बी असते, जे मेंदूच्या कार्याला समर्थन देते आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मदेखील असतात, ?जे तारुण्य आणि त्वचा चांगली राहण्यासाठी हातभार लावतात. इतर आवश्यक पोषक घटक लांब केस होण्यासाठीही फायदेशीर ठरतात.

गवार खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता ?

डाएटिशियन वीणा व्ही. यांच्या मते, गवार खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सर्वप्रथम गवार चांगली शिजवून घ्या. कारण- कच्ची किंवा न शिजवलेली गवार जड असते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. जिरे किंवा हिंग यांसारख्या चांगल्या पचणाऱ्या मसाल्यांसह गवार स्टिअर-फ्राय (stir-fries) करा किंवा करी (curries) आणि वाफवलेल्या भाज्यांसह खा. गवारीची किंचित कडू चव कमी करण्यासाठी आणि पचन क्षमता सुधारण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ती उकळवून घ्या.

त्याचबरोबर गवार योग्यरीत्या स्वच्छता करणे आणि त्यांची टोके काढून टाकणे महत्त्वाचे आहे. गॅस किंवा पोटफुगीच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी एकाच जेवणात इतर उच्च फायबर किंवा गॅस तयार करणाऱ्या पदार्थांबरोबर गवार खाणे टाळावे. गवार थोडे तेल आणि पाचक मसाल्यांमध्ये तयार केल्याने ते पोटाला अनुकूल आणि खाण्यायोग्य बनते हेसुद्धा लक्षात ठेवावे.

गवार खाणे कोणी टाळावे?

गवार सामान्यतः आरोग्यदायी मानली जाते. पण, वीणा व्ही. म्हणाल्या की, काही लोकांनी गवार खाणे टाळावे किंवा त्याचे सेवन मर्यादित करावे. जर तुम्हाला इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा तुमचे पोट संवेदनशील असेल, तर तुम्हाला पोट फुगणे, गॅस किंवा अस्वस्थता येऊ शकते. कारण- गवारमध्ये फायबर, तसेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात.

कमी रक्तदाब असलेल्यांनीदेखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण- गवारमध्ये सौम्य हायपोटेन्सिव्ह क्रिया असते आणि जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबासाठी औषधे घेत असाल, तर नियमितपणे ती औषधे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण- गवार साखर आणि रक्तदाब पातळीवर परिणाम करते.