Health benefits of pomegranates : निरोगी आणि चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे फायदेशीर असते. फळामध्ये डाळिंब खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारण डाळिंबामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. यातील खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, तसेच जळजळ कमी करत हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात. दरम्यान, इन्स्टाग्रामवर सध्या डाळिंबाच्या सेवनासंदर्भात एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, रोज सकाळी चार चमचे डाळिंब खाल्ल्याने वजन जलद कमी करण्यास आणि केसांच्या वाढीस मदत होते, तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासही फायदेशीर असते. दरम्यान, या दाव्यांबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आहारतज्ज्ञ डॉ. नुपूर पाटील, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी सविस्तर खुलासा केला आहे.
दररोज चार चमचे डाळिंबाचे सेवन करणे हा अतिरंजित दावा आहे. ज्यात दुप्पट वेगाने वजन कमी होते किंवा केसांची लक्षणीय वाढ होते हे सांगण्यात आले आहे, ज्यावर तुमचाही विश्वास बसतो. यावर फिटनेसच्या आहारतज्ज्ञ डॉ. नुपूर पाटील यांनी म्हटले की, शाश्वत परिणामांसाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. यात संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि निरोगी आरोग्य या गोष्टींचा समावेश असतो.
हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी म्हटले की, दररोज सकाळी चार चमचे डाळिंब खाल्ल्याने वजन दोन पटीने वेगाने कमी होते किंवा केसांची वाढ होते, या दाव्याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. डाळिंबात आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अनेक पौष्टिक घटक आहेत, पण कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय असे धाडसी दावे करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही डॉ. गुडे म्हणाले.
वजन कमी करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे, जी आहार, शारीरिक क्रियाकलाप आणि एकूण जीवनशैलीवर अवलंबून आहे. डाळिंबात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असले तरी त्याच्या सेवनाने दुप्पट वेगाने वजन कमी होत नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी समतोल आहार, नियमित व्यायाम आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे, असेही डॉ. गुडे म्हणाले.
केसांच्या वाढीवर आनुवंशिकता, हार्मोनल संतुलन, पौषण स्थिती आणि एकूण आरोग्य यांचा प्रभाव पडतो. डाळिंबातील काही घटकांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्म असू शकतात; परंतु दररोज विशिष्ट प्रमाणात डाळिंबाचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळते, या दाव्याला समर्थन देणारे कोणतेही सबळ पुरावे नाहीत, असे डॉ. गुडे यांनी नमूद केले.
त्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही दाव्यांबाबत सावध राहणे आवश्यक आहे. विशेषत: एखादा पदार्थ खाऊन वजन जलद होणार कमी, तीव्र वेदना होणार कमी, अशा प्रकारचे दावे करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा. यावर आहारतज्ज्ञांनी असे नमूद केले की, निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार, शारीरिक हालचाली गरजेच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही आरोग्यविषयक समस्या किंवा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ आणि नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण यांच्या मार्गदर्शनाने आरोग्यासंबंधित अडचणी दूर करत योग्य सल्ला घेऊ शकता. असेही डॉ. गुडे यांनी नमूद केले आहे.