Sexually Transmitted Fungal Infection : अमेरिकेत लैंगिक संबंधातून सेक्शुअली ट्रान्स्मिटेड फंगल इन्फेक्शन या दुर्मीळ आजाराची लागण झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. हा एक नव्या प्रकारचा संसर्ग असून, जो अमेरिकेत पहिल्यांदाच आढळल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले. जामा डर्माटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या या नव्या दुर्मीळ आजाराचा पहिला रुग्ण न्यूयॉर्क शहरात आढळून आला; ज्याचे वय वर्ष ३० होते. या नव्या आजारामुळे आता अमेरिकन आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहे. त्यामुळे या दुर्मीळ संसर्गाबद्दल सविस्तर जाणून घेऊ या-
अभ्यासात असे दिसून आले आहे की, फंगल इन्फेक्शनच्या या दुर्मीळ आजाराची लागण झालेला माणूस इंग्लंड, ग्रीस व कॅलिफोर्निया येथे गेला होता आणि जेव्हा तो न्यूयॉर्कला परतला तेव्हा त्याच्या लिंग, नितंब आणि शरीराच्या इतर भागांवरील त्वचेवर पुरळ उठू लागले; ज्याला टिनिया, असे म्हणतात. अभ्यासाबाबत प्रकाशित केल्या गेलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये नमूद केलेय की, दुर्मिळ आजाराचे हे नवीन रूप ‘अत्यंत सांसर्गिक’ आहे.
या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, हे फंगल इन्फेक्शन बरे होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. त्या व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळाले, तर हा आजार बरा होऊ शकतो.
द न्यू यॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, या संसर्गामुमुळे त्वचेवर पुरळ उठते, जे चेहरा, हात, पाय, कंबर आणि पायांवर पसरू शकतो. ज्याला टिनिया देखील म्हणतात. बाधित व्यक्तीची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, न्यू यॉर्कमधील या व्यक्तीला ट्रायकोफिटन मेंटाग्रोफाईट्स टाइप VII (TM VII) या प्रजातीची लागण झाली आहे; जो आता युनायटेड स्टेट्समध्ये पोहोचलेल्या गंभीर त्वचेच्या संसर्गाच्या गटातील एक नवीन प्रकार आहे. २०२४ मध्ये फ्रान्समध्ये या संसर्गाची १३ प्रकरणे नोंदवली गेली आणि त्यापैकी बहुतेक पुरुष हे संक्रमित पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे होते, असे NYU ग्रॉसमन स्कूल ऑफ मेडिसिनच्या त्वचाविज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. एव्रॉम एस. कॅप्लान म्हणाले.
सध्या संक्रमित व्यक्तीने असेही सांगितले की, त्याच्या प्रवासादरम्यान त्याने अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले; परंतु त्यापैकी कोणामध्येही अशा संसर्गाची लक्षणे नव्हती.
अभ्यासाचे वरिष्ठ लेखक डॉ. जॉन जी. झाम्पेला यांच्या मते, रुग्ण सामान्यतः जननेंद्रियाच्या समस्यांबद्दल चर्चा करताना थोडी लाज बाळगतो. त्यामुळे डॉक्टरांनी मांडीचा सांधा आणि नितंबांच्या आसपासच्या पुरळाबद्दल थेट विचारले पाहिजे. विशेषत: जे लोक लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेत आणि अलीकडेच परदेशांतून प्रवास करून आले आहेत, त्यांना शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यांसारखी समस्या जाणवत आहे, अशा लोकांना डॉक्टरांनी थेट अनेक गोष्टी विचारल्या पाहिजेत.
संशोधकांच्या मते, TMVII मुळे होणाऱ्या इन्फेक्शनवर टेरबिनाफाइन (ज्याला लॅमिसिल म्हणूनही ओळखले जाते) यांसारख्या औषधांचा वापर केला जाऊ शकतो; परंतु ते बरे होण्यासाठी काही महिने लागू शकतात. हे पुरळ एक्झिमामुळे झालेल्या जखमांसारखेच दिसते. त्यामुळे त्यावर योग्य वैद्यकीय उपचारांना विलंब होऊ शकतो.
अँटीफंगल गोळी इट्राकोनाझोलने सेक्शुअली ट्रान्स्मिटेड फंगल इन्फेक्शनवर चांगले परिणाम दिसून येतात; पण काही लोकांना या औषधांमुळे दुष्परिणामही जाणवू शकतात. जसे की, मळमळ आणि अतिसार होऊ शकते, असेही डॉ. कॅप्लान यांनी नमूद केले.