न्यूयॉर्क : सध्या प्लास्टिक प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु या पदार्थामुळे पर्यावरणासह मानवी मेंदूवरही वाईट परिणाम होत आहे. विशेषत: वृद्धांच्या मेंदूचे मोठे नुकसान होत आहे. मायक्रोप्लास्टिक पृथ्वीवरील हवा, पाणी, जल आणि खाद्यपदार्थ प्रदूषित करत आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ रोडआयलँड’च्या संशोधकांनी मायक्रोप्लास्टिक आणि मानवी मेंदू यासंबंधी संशोधन केले आहे. संधोधकांनी युवा आणि वृद्ध अशा दोन गटांतील उंदरांना तीन आठवडय़ांपर्यंत पाण्याद्वारे मायक्रोप्लास्टिक हे भिन्न स्तरात दिले.
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्यूलर सायन्स’मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार मायाक्रोप्लास्टिक यकृत आणि मेंदूच्या उतींचे नुकसान करत आहे. उंदरांवरील संशोधनात पाण्याद्वारे मायक्रोप्लास्टिकची मात्रा देण्यात आलेले उंदीर विचित्र प्रकारे चालत होते. त्यांच्या वर्तनातही बदल झाला होता. त्यांचे हे वर्तन मानवी स्मृतिभ्रंश आजारासारखे होते. संशोधकांनी सांगितले की, मायक्रोप्लास्टिकची मोठी मात्राच नव्हे तर, नाममात्र मात्राही शरीरात अनेक प्रकारचे बदल घडवतात. तसेच मानवी जीवनचक्रावरही परिणाम करतात. त्यामुळे प्रत्येकाने या पदार्थाचा वापर टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.