उन्हाळ्यातल्या दिवसांमध्येही थंडीताप, सर्दी, खोकला यासाठी उपचार घ्यायला रुग्ण येत असतात. वास्तवात थंडीताप सहसा पावसाळ्यात किंवा थंडीनंतरच्या वसंत ऋतूमध्ये येतो. ग्रीष्मातल्या कडक उन्हाळ्यात जेव्हा सहसा सर्दी-ताप-खोकला होत नाही, तेव्हा तो कसा? त्याचे कारण म्हणजे एसीमुळे निर्माण होणारा गारवा.
कोणी म्हणेल हा विषाणूजन्य ताप आहे. मात्र विषाणूंचा संसर्ग तरी कसा होतो? विषाणूंना शरीरात शिरण्यास, त्यांची वाढ झपाट्याने होण्यास अनुकूल असे वातावरण शरीरामध्ये तयार होईल तेव्हाच संसर्ग होईल. आणि त्यांना अनुकूल वातावरण तयार होते, ते शरीराचा तापमानाचा तोल बिघडल्यामुळे. भर उन्हाळ्यात थंडी वाजून ताप येऊ लागला तर तो एसीमध्ये थंड वातावरणात राहिल्यामुळे नाही ना, हे तपासावे लागते. थंडी-पावसामध्ये जसे लोक सकाळी उठल्या-उठल्या शिंकत असतात, अगदी तसेच उन्हाळ्यातही शिंकू लागले की शंका घ्यायलाच हवी! “हे लोक रात्री हिवाळ्यात झोपत आहेत आणि तो गारवा त्यांना सोसत नाही.”
हेही वाचा >>> बहुतांश भारतीय कोलेस्ट्रॉल, डायबेटीजसह ‘या’ आजारांनी आहेत ग्रस्त; ICMRच्या अभ्यासामध्ये मोठा खुलासा
उन्हाळ्यात हल्ली प्रत्येकाला गारवा तयार करणार्या वातानुकूलित अर्थात एसी वातावरणात राहायला आवडते. त्यातही रात्री झोपताना तर एसी हवाच हवा!पण दिवसभर सभोवतालचे वातावरण गरम, उकाड्याचे आणि रात्री मात्र हिवाळ्यातला थंडावा. हे शरीराला अनुरूप कसे होणार? होत नाहीच. तापमानात होणारा हा बदल शरीराला गोंधळात पाडतो. “सभोवतालच्या गरम वातावरणाला अनुरूप असा शरीरामध्ये गारवा वाढवायचा की बाहेरच्या गार वातावरणाला अनुरूप असा शरीरातला उष्मा वाढवायचा?” या संभ्रमात शरीर पडते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणारी यंत्रणाच त्यामुळे कोलमडून पडते आणि त्याचाच परिपाक म्हणजे थंडीताप.
हेही वाचा >>> Health Special: तुम्हालाही पित्ताचा त्रास सतावतोय? कारण, लक्षणे व उपचार सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा
एसीची हवासुद्धा हिवाळ्यासारखीच गार व कोरडी असते. ज्यामुळे नाक आणि श्वसनमार्गाचा वरचा भाग गार आणि कोरडा पडतो. जे नाकापासून ते पुढील श्वसनमार्गाच्या आतील श्लेष्मल त्वचेला सूज निर्माण करण्यास कारणीभूत होते आणि मग सुरू होतात नाक वाहणे, कफ पडणे, कफ सहज पडत नसल्यास खोकला, घसा कोरडा पडल्याने कोरडा खोकला, कफामुळे वा सुजेमुळे श्वसनमार्गात अडथळा येत असल्यास दमा वगैरे लक्षणे. या दिवसांमध्ये अगदी हिवाळ्याप्रमाणेच छातीमध्ये कफाचा घुर्घुर् आवाज येऊन खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे हा आजारसुद्धा एसीच्या गार वातावरणामुळे होताना दिसतो. अर्थात हे काही सगळ्यांनाच लागू होत नाही. ज्यांची वात वा कफ प्रकृती आहे, ज्यांना मुळातच सर्दी-कफ-खोकला-दम्याचा त्रास आहे, जे व्यायाम करत नाहीत किंवा ज्यांच्या शरीराला फारसे चलनवलन नाही, जे सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येत नाहीत आणि ज्यांचा आहारसुद्धा अयोग्य असतो, अशा मंडळींना हे श्वसनविकार आधिक्याने होताना दिसतात. जे मुळातच सशक्त आहेत, ज्यांना ऊन असो वा थंडी कशाचाही तास होत नाही, त्यांना काही एसीमुळे अशा प्रकारचा श्वसनविकाराचा त्रास होताना दिसत नाही. म्हणूनच तर ऊन, वारा, थंडी, पावसाने ज्याच्या स्वास्थ्यात काही बदल (बिघाड) होत नाहीत त्याला आयुर्वेदाने ‘स्वस्थ म्हटले आहे.