Diabetes Prevention Cure: रक्तातील साखर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ज्याचे प्रमाण कमी जास्त झाल्यास आरोग्यात लगेच बिघाड दिसून येतो. रक्तातील साखर वाढल्याने डायबिटीजचा धोका उद्भवतो. डायबिटीजचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैली. अलीकडे बैठ्या जीवनशैलीचे प्रमाण वाढले आहे. चुकीचा व मुळात अवेळी आहार कमी व्यायाम, धूम्रपान, मद्यपान अशी व्यसने या सगळ्यामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढत आहे. जर डायबिटीजवर वेळीच अंकुश ठेवला नाही तर त्यातून हृदयाचे विकार, मल्टीपल ऑर्गन फेल्युअर तसेच ब्रेन स्ट्रोकसारख्या जीवघेण्या समस्या सुद्धा उद्भवतात. डायबिटीजच्या रुग्णांनी रक्तातील साखर वाढण्याआधीच थांबवण्यासाठी नेमकं काय करता येईल हे आज आपण पाहणार आहोत.
डायबिटीज असल्यास रक्तातील साखर किती हवी?
डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण रिकाम्या पोटी ७० ते ९० mg/ dL इतकी असावी. तर जेवल्यानंतर रक्तातील साखर १४० mg/ dL इतकी असायला हवी. यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाण झाल्यास शरीराला सहन करता येत नाही. आहारतज्ज्ञ व प्रशिक्षित डायबिटीज एज्युकेटर आकांशा मिश्रा यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्या रोजच्या जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हे एकाएकी 350 mg/dl इथपर्यंत वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ आपण नियमित आहारातून वगळणे फायद्याचे ठरेल.
रिफाइंड केलेली पीठं
रिफाइंड केलेली पीठं जसे की मैदा किंवा अगदी काही प्रमाणात गव्हाचे पॅक पीठ यामुळेही डायबिटीजचा धोका बळावण्याची शक्यता असते. पांढरा ब्रेड, पास्ता, भात याच्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते व फायबरचे प्रमाण अगदीच नगण्य असते. डायबिटीज रुग्णांनी अशा पदार्थांचे सेवन टाळावे. सफेद रंगाचे पदार्थ हे अधिक स्टार्चयुक्त असतात ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते.
बटाटे
बटाट्यात स्टार्चचा साठा असतो. तसेच बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाणही अधिक असते. यामुळेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स १११ असतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वेगाने वाढू शकते. आपल्यापैकी अनेकांना बटाटा खाण्यास आवडतोच अशावेळी एक साधा उपाय म्हणजे आपण नुसते बटाटे असणारे पदार्थ खाऊ नका. भाजीत बटाटा असल्यास हरकत नाही पण बटाट्याची भाजी, फ्रेंच फ्राईज, चिप्स असे पदार्थ खाल्ल्याने ब्लड शुगर वाढू शकते.
हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा
मांसाहार
डायबिटीजच्या रुग्णांनी रेड मीट, सॅलमन असा मांसाहार वर्ज्य करायला हवा. हे पदार्थ मधुमेहींसाठी अक्षरशः विषासारखे काम करू शकतात. यात असणारे सॅच्युरेटेड फॅट्स हे ब्लड शुगर वाढवण्यास कारण ठरतात. डायबिटीजचा त्रास असल्यास महिन्यातून केवळ एकदा चिकन- मटण प्रमाणात खाण्यास हरकत नाही.
सोडायुक्त पेय/ ज्यूस
डायबिटीज रुग्णांनी गोडाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये आर्टफिशियल फळांचे ज्यूस, आईस टी, सोडा, यांचा समावेश असतो. या सोडायुक्त पेयांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढीस लागेल. या पेयांमध्ये असणाऱ्या फ्रुक्टोजमुळे शरीरातील इन्सुलिनवर प्रभाव होतोच तसेच वजन वाढणे, फॅटी लिव्हर अशाही समस्या डोके वर काढतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आला आहे)