Cashew for Diabetes: धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा घरी जेवण बनवायलाही वेळ नसतो. किंवा घरी जेवण केलं तरी जिभेच्या चोचल्यांनी बाहेरचं खाणं होतंच. अशावेळी आवश्यक त्या पोषणासाठी काही साध्या सवयी सुद्धा मोठी मदत करू शकतात. जसे की सकाळी सुका मेवा खाणे. काजू बदाममध्ये शरीराला आवश्यक सत्व मुबलक प्रमाणात असतात हे आजवर आपल्याला आई, आजी सांगत आल्या आहेत. नैसर्गिक गोडवा असल्याने हा सुका मेवा डायबिटीज रुग्णांनी खावा का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात ४२० मिलियनहुन अधिक लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपोलो हॉस्पिटल ग्रेटर नोएडा येथील डायबिटीज व थायरॉईड स्पेशलिस्ट डॉ. बी. के. राय सांगतात की, डायबिटीजवर नियंत्रणासाठी नट्सचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादेत राहण्यास मदत होते. काजूमध्ये प्रोटीन, फायबर व शरीराला उपयुक्त फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. डायबिटीजच्या रुग्णांसाठी काजूचे किती सेवन उपयुक्त आहे व नेमक्या कोणत्या वेळी काजू खायला हवेत हे आज आपण जाणून घेणार आहोत..

डायबिटीज असल्यास काजू खावे का? (How cashews control diabetes)

डायबिटीजच्या रुग्णांसाठी दिवसाला ४० ग्रॅम सुका मेवा फायदेशीर ठरू शकतो. काजूमध्ये मँग्नेशियम व झिंक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच काजूचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा २५ इतका कमी असतो. काजूच्या सेवनाने ब्लड शुगर स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. तसेच डायबिटीजच्या रुग्णांसाठी काजू हा ऊर्जेचा स्रोत ठरू शकतो. काजूमधील हेल्दी फॅट्समुळे चयापचय क्रिया वेगवान होऊन वजनही नियंत्रणात राहू शकते.

काजूचे सेवन कसे व किती करावे? (How To Eat Cashews)

डायबिटीजचे रुग्ण दिवसाला २० काजू सेवन करू शकतात. एक काळजी घ्या काजू खाताना मीठ व मसाल्यांसह काजू खाणे टाळा. प्रोटीनयुक्त नैसर्गिक काजू हे आरोग्याला स्थिर ठेवण्यास मदत करतात व शरीराला ऊर्जा देऊ शकतात.

हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याचा धोका ‘या’ ४ पदार्थांनी ५० टक्के कमी होऊ शकतो; कसे कराल सेवन?

दरम्यान, केवळ डायबिटीजवरच नव्हे तर अन्यही समस्यांवर काजू उपयुक्त ठरू शकतो. रोज काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आढळणारे फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. काजूच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे काजू खाल्ल्याने हृदय निरोगी राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news is cashews good for diabetes know the truth from the expert how much kaju is good in a day svs