नवी दिल्ली : भारतासह सात देशांत दरवर्षी १३ लाखपेक्षा अधिक जणांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. ‘लॅन्सेट’च्या ‘ई-क्लिनिकल मेडिसिन’मध्ये प्रकाशित संशोधनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी सांगितले की, कर्करोगामुळे दरवर्षी जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी अर्ध्यापेक्षा अधिक मृत्यू हे भारत, चीन, ब्राझील, ब्रिटन, रशिया, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील असतात. धूम्रपानासह मद्यपान, लठ्ठपणा आणि ‘ह्युमन पेपिलोमा व्हायरस’मुळे (एचपीव्ही) दरवर्षी २० लाख लोकांचा मृत्यू होतो.
हेही वाचा >>> Health Special : डायबेटिसवरच्या सल्ल्यांचं काय करायचं?
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, क्वीन मेरी लंडन युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनमधील किंग्ज कॉलेजच्या तज्ज्ञांनी हे एकत्र संशोधन केले आहे. क्वीन मेरी लंडन युनिव्हर्सिटीचे प्रा. ज्युडीथ ऑफमॅन यांनी सांगितले की, तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे; परंतु सध्या गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यूही गंभीर बाब आहे. जगभरात प्रत्येक दोन मिनिटांत एका महिलेचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. यामधील ९० टक्के मृत्यू हे अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत.