आपल्यापैकी बहुतेकांना कधीकधी लघवी करताना जळजळ आणि तीव्र वेदना जाणवतात. साधारण आपण खूप बाहेर फिरतो, गरम खातो किंवा खूप काम करुन थकतो तेव्हा आपल्याला लघवीमध्ये अशा समस्या उद्भवू शकतात. जास्त पाणी प्यायल्यानंतर अनेकदा बरे वाटते. पण यानंतरही लघवीत जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करु नका. अनेकदा ही किडनी आणि प्रोस्टेटशी संबंधित गंभीर आजारांची चिन्ह असू शकतात. वैद्यकीय भाषेत याला डिसूरिया असे म्हणतात, असे सतत दोन ते तीन दिवस होत राहिल्यास या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, कारण यानंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
लघवीमध्ये जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु हे मुख्यत: हे किडनी किंवा प्रोटेस्टमधील समस्यांमुळे होते. अनेकदा लघवीमधील जळजळ वाढल्यास लोक सावध होतात परंतु त्यावर कोणते उपचार करावे हे समजत नाही. अशावेळी लघवीमधील जळजळ कोणत्या आजारांचे कारण असू शकते जाणून घेऊ…
१) किडनी स्टोन – मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, जेव्हा किडनीमध्ये कॅल्शियमच्या डिपोजिशनचे प्रमाण जास्त होते, तेव्हा किडनीमध्ये स्टोन तयार होतात, किडनी स्टोन झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे आणि वेदना होऊ लागतात. यामध्ये लघवीचा रंग गुलाबी किंवा तपकिरी होतो. त्यात ताप, उलट्या, अस्वस्थता यांसारखी लक्षणेही दिसू लागतात.
२) प्रोस्टेट इन्फेक्शन- पुरुषांमध्ये प्रोस्टेट ही एक अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे जिचा थेट संबंध प्रजननक्षमतेशी आहे. कधीकधी प्रोस्टेटमध्ये संसर्ग होतो, याला Prostatis म्हणतात. लैंगिक संक्रमित रोगांमुळे प्रोस्टेटमध्ये सूज येऊ शकते. प्रोस्टेटमध्ये संसर्ग झाल्यामुळे, लघवी करताना खूप जळजळ होते आणि मूत्राशय आणि प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना देखील होऊ शकतात.
३) UTI – लघवी करताना जळजळ किंवा वेदनादायक लघवी होणे हे देखील लघवी मार्गात संसर्ग झाल्यामुळे होते. यामुळे लघवी मार्गात बॅक्टेरियाची संख्या जास्त प्रमाणात वाढते आणि लघवीमध्ये जळजळ होऊ शकते. या स्थितीत वारंवार लघवी करण्याची इच्छा होते आणि कधीकधी लघवीतून रक्त येऊ लागते.
४) STI- क्लॅमिडीया, गोनोरिया, हर्प्स इत्यादी लैंगिक संक्रमित संसर्गांमुळे देखील लघवी करताना जळजळ होते. या स्थितीत विविध प्रकारची लक्षणे दिसून येतात. यामध्ये प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला मुरुम किंवा फोडही येऊ शकतात.
लघवीतील जळजळ दूर करण्यासाठी उपाय
दोन-तीन दिवस सतत लघवीला त्रास होत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासणीनंतर लघवीमध्ये जळजळ कोणत्या कारणांमुळे होते हे डॉक्टर चाचण्यांद्वारे शोधून काढतील. यासाठी सामान्य अँटीबायोटिक्स आहेत, परंतु आपल्याला कोणत्या औषधाची आवश्यकता आहे हे केवळ डॉक्टरच सांगू शकतात.