जबाबदारीचे ओझे आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्तींना नाइट शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यामुळे बहुतांश व्यक्ती झोपलेल्या असताना अनेक नोकरदार नाइट शिफ्टमध्ये रात्रभर जागून आपले काम करीत असतात. मात्र, रोज नाइट शिफ्टमध्ये काम करून व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तुम्हीही जर रोज नाइट शिफ्टमध्ये काम करीत असाल, तर त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो किंवा कोणते आजार होऊ शकतात याविषयी हैदराबादमधील केअर हॉस्पिटलच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. सुषमा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. सुषमा यांच्या माहितीनुसार, नाइट शिफ्टमध्ये सतत काम करून, झोपेवर विपरीत परिणाम होतो; तसेच तणावाच्या पातळीतही वाढ होते. परिणामत: मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. दीर्घकाळ नाइट शिफ्टमध्ये काम केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांसह रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या वाढतात. त्याशिवाय चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.

फोर्टिस कनिंगहॅम हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. आदित्य एस. चौटी यांनी नमूद केले की, नाइट शिफ्टमुळे तणाव वाढतो. या तणावामुळे डोकेदुखी, पोटदुखी व उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो. त्याशिवाय वैयक्तिक नातेसंबंध, छंद जोपासणे आव्हानात्मक होऊ शकते.

हेही वाचा – रोज कढीपत्ता खा, झटपट वजन घटवा; डॉक्टरांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

डॉ. सुषमा यांनी एका मुद्द्यावर जोर देत म्हटले की, शिफ्टमध्ये काम करताना तुम्ही दीर्घकाळ कामात व्यग्र राहता; ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: नाइट शिफ्टमध्ये काम करताना आरोग्याची खूप काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्यासाठी काही गोष्टी नित्याने करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

नाइट शिफ्टमध्ये काम करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

१) झोप पूर्ण करा

नाइट शिफ्ट करून घरी आल्यानंतर पूर्ण झोप घ्या. अगदी सुटीच्या दिवशीही आरामदायी झोप घ्या; पण आरामदायी झोपेसाठी घरात शांत, अंधारमय वातावरण तयार करा.

२) नियमित ब्रेक घ्या

नाइट शिफ्टमध्ये काम करताना थकवा जाणवल्यास काही अंतराने ब्रेक घ्या. या वेळेचा सदुपयोग थोडी झोप घेण्यासाठी, वेगाने चालण्यासाठी किंवा मनाला ताजेतवाने करण्यासाठी करा. अशा छोट्या छोट्या ब्रेक्समुळे तुम्हाला योग्य पद्धतीने काम करण्यास मदत होईल; तसेच विविध आजारांपासूनही दूर राहता येईल.

३) पौष्टिक आहाराचे सेवन करा

नाइट शिफ्टदरम्यान शरीरातील ऊर्जा पातळी टिकवून ठेवणे, थकवा कमी करणे आणि एकूण कार्यक्षमतेसाठी योग्य त्या पोषण घटकांचे सेवन करा. असे पोषण घटकांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो; ज्यामुळे तुम्हाला कामाच्या अनियमित तासांशी संबंधित मानसिक ताणाचा सामना सक्षमतेने करणे शक्य होते.

४) नैसर्गिक सूर्यप्रकाशात वेळ घालवा

नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा एक्सपोजर तुमच्या सर्केडियन ऱ्हिदमचे नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. नाइट शिफ्टनंतर थोडा वेळ सूर्यप्रकाशात वेळ घालवा. तुम्ही शिफ्टच्या आधी किंवा नंतर सूर्यप्रकाश मिळत असल्यास, त्यात थोडा वेळ थांबा. सूर्यप्रकाशात राहणे शक्य नसल्यास कृत्रिमरीत्या डिझाइन केलेल्या लाइट्सचा वापर करा.

५) सामाजिक नातेसंबंध निर्माण करा

नाइट शिफ्टमध्ये सतत काम करून उदभवलेल्या अन्य आव्हानांना तोंड देण्यासाठी मित्र आणि कुटुंबासह अनेकांशी चांगले नातेसंबंध निर्माण करा. तुमच्या अडचणी मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. सुटीच्या दिवशी फिरायला जाण्याचा प्लॅन करा.

६) नियमित आरोग्य तपासणी करा

सतत नाइट शिफ्टमध्ये काम करून अनेक आरोग्य समस्या उदभवण्याचा धोका असतो. अशा वेळी नियमित आरोग्य तपासणी करा. प्रत्येक गोष्टीचे एक वेळापत्रक तयार करा.

७) स्ट्रेस मॅनेजमेंट

कामाच्या अनियमित तासांशी संबंधित तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी माइंडफुलनेस टेक्निक, योग, जिम यांसारख्या तणाव कमी करणाऱ्या व्यायामप्रकारांची मदत घ्या.

Story img Loader