थंडीमध्ये माणूस खा-खा करतो, भरपूर खातो, याचे अजून एक वेगळे स्पष्टीकरणसुद्धा दिले जाते. बर्फाळ प्रदेशामधील अस्वलं सहा महिने भरपूर आहार घेतात आणि शरीरामध्ये चरबीचा मुबलक साठा करुन ठेवतात. कारण पुढचे सहा महिने बर्फ पडत असताना त्यांना अन्न मिळणार नसते. भविष्यात अन्नाचे दुर्भिक्ष्य होईल तेव्हा शरीरामध्ये जमवलेल्या चरबीच्या साठ्यावरच शरीर जिवंत ठेवायचे असते. याच प्रकारची मनोधारणा मनुष्याची थंडीच्या मोसमात होत असावी अशी शक्यता आहे. कारण कधीकाळी मनुष्यप्राणीसुद्धा बर्फाळ प्रदेशामध्ये राहत होता. बर्फ पडणार्‍या ऋतूमध्ये अन्नाची होणारी कमी मानवानेही हजारो वर्षे अनुभवली आणि त्यावर उपाय म्हणून जेव्हा अन्न मुबलक उपलब्ध होईल तेव्हा अतिसेवन करुन शरीरामध्ये चरबी जमवून ठेवायची असा मानवाचाही इतिहास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थंडीतला आहार ही पुढची तजवीज?

हिमयुगामधील त्या आठवणी अजूनही मनुष्याच्या मेंदूमध्ये जतन करुन ठेवलेल्या असल्याने थंडी आली की माणसाला अतिरिक्त आहार सेवन करुन शरीरामध्ये चरबी जमवून ठेवावीशी वाटते. थंडीमध्ये घेतलेला हा अतिरिक्त आहारच आधुनिक मनुष्याला स्थूल करण्यास कारण होत असावा, अशी माझ्यासारख्या अनेकांच्या मनात शंका आहे. म्हणजे असे की एरवी सडसडीत शरीराचा असलेला मनुष्यसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये आपला खुराक वाढवतो, अतिप्रमाणात अन्नसेवन करतो. अधिक प्रमाणात जेवण्याची ती सवय मग हिवाळा संपला तरी पुढेही तशीच सुरु राहते आणि मग तिथपासून त्याचे शरीर स्थूलत्वाकडे झुकू लागते. शरीर स्थूल होण्याची अनुवंशिकतेपासून हार्मोनल इम्बॅलन्सपर्यंत अनेक जैव-रासायनिक (Bio-chemical) कारणे असली तरी एक महत्त्वाचे कारण अतिप्रमाणातील आहार आहे, यात काही शंका नाही. तुमच्या शरीराची नित्य व्यवहार करण्यासाठी असलेली ऊर्जेची गरज व त्या तुलनेत व्यस्त (अधिक) प्रमाणात असणारा आहार हे शरीर जाडजूड होण्याचे महत्त्वाचे कारण असते अणि थंडीतले अतिअशन (अत्यधिक अन्नसेवन) हे त्या स्थूलत्वाचे निमित्तकारण होते.

हेही वाचा…Health Special : खूप वेळ बसून राहण्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

थंडीत वजन का वाढते?

थंडीच्या दिवसांमध्ये मनुष्य हिमयुगातील भविष्यात अन्न न मिळण्याच्या भयस्मृतिंना अनुसरुन अतिप्रमाणात अन्नसेवन करतो, जी सवय आधुनिक जगात स्थूलत्वास कारणीभूत होत आहे. समजा एखाद्या शरीराची दिवसाची ऊर्जेची सरासरी गरज आहे २००० उष्मांक(कॅलरीज); म्हणजे आपली नित्य कामे-व्यवहार करण्यासाठी (शरीरयष्टीचा-दिनचर्येचा-कामकाजाचा-व्यायामाचा,वगैरे विचार करता) त्या शरीराने २००० उष्मांक मिळतील एवढा आहार घ्यायला हवा. आता या गरजेच्या उष्मांकांपेक्षा (२००० पेक्षा) अधिक प्रमाणात घेतला जाणारा आहार हा त्या शरीरासाठी अतिरिक्त आहार आहे. थंडीमध्ये तर आपण जवळजवळ २०० ते ४०० कॅलरीजच्या आसपास उष्मांक देणारा अतिरिक्त आहार घेतो अशी शंका आहे. हे २०० ते ४०० अधिकचे उष्मांक शरीर चरबीच्या रुपामध्ये साठवून ठेवते; पुढील वाईट काळातली बचत वा बेगमी म्हणून! वाईट काळ म्हणजे कधी उपाशी राहाण्याची वेळ आली तर,अन्नाचे दुर्भिक्ष्य झाले तर!!

हेही वाचा…Health Special : मॅरेथॉन धावायचीय? तर आहाराचे ‘हे’ नियम पाळाच!

सुदैवाने (की दुर्दैवाने?) आजच्या आहार-संपन्न काळात; निदान तुमच्या आमच्या आयुष्यात तरी अन्नाच्या दुर्भिक्ष्याचा कधीच सामना करावा लागणार नसल्याने शरीराला पुढील बेगमीसाठी म्हणून केलेल्या या चरबीचा वापर करण्याची कधीच वेळ येत नाही. त्यात अधिक हिवाळ्यात शरीराचे चलनवलन कमी होत असल्याने सेवन केलेल्या आहाराची उर्जा वापरली सुद्धा जात नाही, ती उर्जा चरबीच्या स्वरुपात शरीरातच साठवली जाते. आणि शरीरावर चरबीचे थरावर थर जमत जातात. आहाराच्या-उर्जेच्या-चरबीच्या बचतीचा साठा वाढतच जातो, तो इतका की एक दिवस शरीर चरबीच्या साठ्याने ठासून भरते म्हणजेच आकाराने,वजनाने मोठे होते,स्थूल-जाडजूड-वजनदार होते. त्यामुळे हिवाळा हा कृश-सडसडीत मंडळींसाठी आरोग्याला पोषक ऋतू असला तरी, स्थूल-वजनदार लोकांसाठी मात्र पूरक होत नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special article on why weight gain in winter season hldc psg
Show comments