Health special डॉक्टर सहा महिने झाले मी खाली वाकत नाहीये, टू-व्हीलर चालवलेली नाहीये, सहा महिन्यांपूर्वी कंबर दुखते म्हणून एमआरआय करायला सांगितला तेव्हा त्यात कंबरेतली गादी थोडी सरकली आहे असं सांगितलं, तेव्हापासून मला खाली वाकण्याची आणि वजन उचलण्याची भीती वाटते, मग मी या क्रिया करतच नाहीये… ३५ ते ४० दरम्यान वय असलेली महिला मला सांगत होती. मुख्य उपचार सुरू करण्याआधी आपल्याला यांच्या मनातली भीती काढून टाकावी लागणार आहे हे मला कळलं, माझ्याकडे असलेला कंबरेच्या मणक्याचं मॉडेल हातात घेऊन मी त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली…
कंबरदुखी- गैरसमजच अधिक
प्रत्यक्ष मणक्याची आणि गादीची रचना समजून घेतल्यावर या महिलेच्या हे लक्षात आलं की, कोणतीच हालचाल पूर्णपणे बंद करणं हा यावरचा उपाय होऊ शकत नाही, त्याऐवजी क्रिया करण्याची पद्धत बदलणं, वारंवारता बदलणं आणि स्नायूंना क्रिया करण्यासाठी सक्षम बनवणं हा यावरचा शाश्वत म्हणजेच ‘सस्टेनेबल’ उपाय होऊ शकतो! सात वर्षांपासून ऑरथोपेडीक फिजिओथेरपी क्षेत्रात काम करत असताना आणि कंबरदुखीच्या असंख्य रुग्णांशी संवाद साधताना हे रोज लक्षात येतं, की प्रत्येक रुग्णागणिक कंबरदुखीबद्दल वेगवेगळे गैरसमज आहेत आणि भीतीही आहे. कंबरदुखीच्या रुग्णांशी संवाद साधताना लक्षात आलेले काही गैरसमज आणि त्यांचे स्पष्टीकरण आज लिहिते आहे.
रुग्णाचं स्वत:चंच निदान
बहुतेकवेळा कंबरदुखीसाठी आलेले रुग्ण त्यांना तपासल्यावर पहिलं प्रश्न विचारतात तो म्हणजे मला ‘स्लिप डिस्क’ तर नाही ना? (कंबरेचं कोणतंही दुखणं हे सामान्य व्यक्तीना स्लिप डिस्क वाटू शकतं) कंबरदुखीची तीव्रता काही वेळा घाबरवणारी असू शकते, पण बहुतेकवेळा या वेदनेची कारण गंभीर नसतात. शिवाय, बहुतेक रुग्ण कंबरदुखीतून पूर्णपणे बरे होतात. क्वचित काही रुग्णामध्ये कंबरदुखी ही एखाद्या गंभीर आजारासोबत जोडलेली असू शकते. सध्या सोशल मीडियावरुन मिळणाऱ्या अवास्तव माहितीमुळे रुग्ण आमच्याकडे येताना, स्वतःचं निदान घेऊन आलेले असतात. उदाहरणार्थ मला सायटिका आहे, मला स्पॉनडीलोसिस आहे इत्यादी.
बेल्ट आवश्यक… पण
प्रत्येक वेळी आपल्याला होणाऱ्या वेदनेला काही तरी नाव दिलंच पाहिजे असं नाही, वेदना आणि तपासणी यावरून योग्य ते निदान करण्याची जबाबदारी ऑर्थोपेडीक किंवा फिजिओथेरपी डॉक्टरांची आहे. इंटरनेटवरील माहितीवरुन स्वतःला विशिष्ट आजाराच्या वर्गात बसवणं योग्य नाही. चोवीस तास कंबरेचा बेल्ट बांधून ठेवणं आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या कंबरेला आधार मिळतो आणि वेदना कमी होतात खरं तर कंबरेच्या बेल्टवर एक वेगळा लेखच लिहायला हवा, या बेल्टला कोरसेट असं म्हणतात. हे कोरसेट काही विशिष्ट रुग्णांना विशिष्ट कालावधीसाठी वापरण्यास सांगितले जातात. पण रुग्ण याचा अतिरेकी वापर करून पोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंना आयत्या मिळणाऱ्या आधाराची सवय कावून घेतात. यामुळे हे स्नायू अधिकच क्रियाहीन होत जातात.
व्यायाम महत्त्वाचा
कंबरेतून वाकणं आणि वजन उचलणं यामुळे कंबरेची झीज होते किंवा खाली वाकल्याने आणि वजन उचलयाने ‘स्लिप डिस्क’ होते, हा गैरसमज आहे. मानवी कणा हा रोजच्या आयुष्यातील साध्या क्रियांमुळे किंवा वजन उचलण्याने झिजत नाही. आपण कशा पद्धत्तीने आणि किती वेळा एखादी हालचाल करतो हे महत्वाचं आहे. कोणतीच हालचाल पूर्णपणे आणि खूप काळासाठी बंद करणं योग्य नसतं. स्नायुंना बळकटी देणारे व्यायाम लाभदायक ठरतात आणि आपल्याला स्वयंपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतात.
हेही वाचा – Health Special : कंबरदुखी: भीतीतून जागरूकतेकडे (भाग १)
…तर कमी वयातही कुंबरदुखी
बऱ्याच व्यक्तीना वेदनाशामक औषधे हा कंबरदुखीसाठी सोपा आणि हमखास उपाय वाटतो. औषधांमुळे कंबरदुखी कायमस्वरूपी बरी होऊ शकते असं त्यांना वाटत. वेदनाशामक औषधे हा तात्पुरता उपाय होऊ शकतो. त्यांची उपयुक्तता ही फक्त वेदनेची तीव्रता कमी करण्यापर्यंतच मर्यादित असते. बहुतेकवेळा वेदानाशमक औषधी घेणं थांबवलं की दुखणं परत येत. कंबरदुखी हा वाढणाऱ्या वयाचा अविभाज्य भाग आहे, आता वय वाढलंय म्हणून कंबर दुखणारंच असा विचार रुग्ण करतात आणि आता आपल्याला वेदना सहन करण्याशिवाय पर्याय नाही असा निराशावादी दृष्टिकोन ठेवतात.
मणके आणि त्यामधील गादी यात वयानुरूप बदल नक्कीच होतात पण त्यासह स्नायूंची बळकटी, क्रियाशीलता, जीवनशैली, आहार, मानसिक ताण हे घटकही महत्वाची भूमिका बजावतात. या घटकांमुळेच कमी वयाच्या किंवा तरुण व्यक्तींना देखील कंबरदुखी होऊ शकते.
पॅसिव्ह प्रयत्न टाळा
आपल्याकडे कोणत्याही वेदनेवर आणि आजारावर पॅसिव्ह उपचारांना पसंती दिली जाते, कंबरदुखी याला अपवाद नाही. वेदानाशमक औषधीसारखेच, ऑपरेशन आणि इंजेक्शन्सने आपली वेदनेतून कायमची सुटका होईल आणि व्यायाम, जीवनशैलीतील बदल असे ‘अॅक्टिव्ह’ प्रयत्न करावे लागणार नाहीत, असा समज रुग्ण करून घेतात. ऑपरेशन म्हणजेच सर्जरीचा निर्णय फक्त ऑर्थोपेडिक डॉक्टर्स घेऊ शकतात. फार कमी रुग्णांना याची गरज असते. ऑपरेशनचा निर्णय झाला तरीही ऑपरेशनच्या आधी आणि नंतर व्यायाम करावाच लागतो!