मानवी मूत्रपिंड म्हणजे रक्तात संचयित झालेली, आपल्या शरीरातील टाकाऊ आणि विषारी द्रव्ये व्याश्लेषण क्रियेने मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास मदत करणारा एक अद्भुत अवयव आहे. दोन मूत्रपिंडे दर २४ तासांनी सुमारे २०० लिटर रक्तद्रव एकत्र व्याश्लेषित करतात. तसेच मूत्रपिंड शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे (क्षारांचे) विशेषतः सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन करतात आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण स्थिर ठेवतात. त्यातून अनेक आवश्यक संप्रेरकांचा स्राव होतो. चेतासंस्थेसहीत सर्व अवयव संस्थांच्या इष्टतम कार्यासाठी अशी अवस्था अत्यावश्यक असते.
मूत्रपिंड केवळ अतिशय कार्यक्षम गालक म्हणून कार्य करण्याव्यतिरिक्त गाळलेली जीवनसत्त्वे, अमिनो आम्ले, ग्लुकोज, संप्रेरके आणि इतर महत्त्वपूर्ण पदार्थ पुन: रक्तप्रवाहात सोडण्याचे कार्य करतात. जीवनसत्त्व ड अनेक शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असते. सामान्यपणे आहारातील जीवनसत्व ड निष्क्रिय स्वरूपात असते आणि मूत्रपिंडाद्वारे त्यात योग्य रासायनिक बदल करून ते ‘सक्रिय’ करणे आवश्यक असते. हे ‘सक्रिय’ जीवनसत्व ड आतड्यांद्वारे कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे हाडांची सामान्य रचना आणि स्नायू कार्य प्रभावीपणे होण्यास मदत होते. इतके महत्वाचे कार्य करणारी यंत्रणा मंदावल्यास अथवा बंद पडल्यास त्याचे पडसाद संपूर्ण शरीरात लगेच जाणवू लागतात किंवा स्थिती पूर्णपणे विकोपाला जाऊ शकते. मुतखडा ज्याला इंग्रजीत नेफ्रोलिथियासिस म्हणतात हा मानवी उत्सर्जन संस्थेशी संबंधित रोगांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मूत्रविकारासंबंधित सुमारे १५% रोगी मुतखड्याचे शिकार असतात.
अर्थात अशा रोगाची लक्षणे, हा खडा नेमका उत्सर्जन संस्थेतील कोणत्या भागात झाला आहे, त्याचे आकारमान किती आहे आणि त्याचे रासायनिक संयोजन कसे आहे अशा अनेक घटकांवर अवलंबून असतात. सर्व मुतखड्यांच्या प्रकरणांपैकी ८०% प्रकरणे ऑक्सेलेट क्षाराचे नेफ्रोलिथियासिस असतात, आणि पुनरावृत्तीची सर्वाधिक जोखीम हे त्याचे वैशिष्ट्य आहे. नेफ्रोलिथियासिसची वारंवार पुनरावृत्ती शरीरात गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते आणि खर्चिक उपचार खर्चास सामोरे जावे लागते. दुर्दैवाने, नेफ्रोलिथियासिस टाळण्यासाठी सध्या प्रभावी मार्ग माहीत नाहीत.
हेही वाचा… मुलांना डोळ्यांच्या समस्या आहेत? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, वाचा डॉक्टर काय सांगतात
रुग्णाच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार आणि खड्याच्या मूत्रपिंड संस्थेतील स्थानानुसार डॉक्टर संबंधित औषधे, शस्त्रक्रिया आणि पथ्ये निश्चित करितात. परंतु मुतखडा निर्माण होण्याची शक्यता कमी करणे अथवा काही शास्त्रोक्त आधार असलेले प्रतिबंधात्मक उपाय आहेत का याची नोंद घेणे आवश्यक आहे. काही सर्वसामान्य उपाय जे इथून तिथून ऐकलेले असतात किंवा व्हाट्सएप पाठशाळेतून कळलेले असतात, उदाहरणार्थ पाणी भरपूर प्या, टोमॅटो कमी खा, फसफसणारी पेये टाळा, भरपूर मीठ खाऊ नका इत्यादी. अर्थातच यांचा काही ना काही फायदा होत असणारच. अगदी अलीकडे आणखी एक मुतखडा प्रतिबंधात्मक उपाय उगम पावला आहे. तो म्हणजे एका खास जिवाणूचा वापर करणे. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, एक जीवाणू मानवातील मुतखडा निर्मिती टाळू शकतो! या अजब जीवाणू बद्दल थोडी माहिती घेवू.
ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस (Oxalobacter formigenes)
ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस हा एक मानवास रोगकारक नसलेला, अबीजाणुधारक, अचल, ग्राम-निगेटिव्ह प्रकारचा, कट्टर विनॉक्सि श्वसन करणारा (ऑक्सिजन शिवाय केले जाणारे श्वसन) आणि दंडगोलाकार आकाराचा जीवाणू आहे जो सामान्यतः मानवी आतड्यात राहतो आणि त्याचा प्रमुख ऊर्जा आणि कार्बन स्त्रोत म्हणून ऑक्सेलेटचे विचयन करतो. १९८५ साली मिल्टन जे. ऍलिसन आणि त्याच्या सहकार्यांनी ओएक्सबी (OxB) जीवाणूची विशिष्ट उपजाती मेंढीच्या रोमंथिकापासून मिळविली.
हेही वाचा… Health Special: वार्धक्यातील शारीरिक आजार आणि उदासी यांचा संबंध काय?
अभ्यास करून या नवीन जीवाणूचे नाव ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस असे देण्यात आले. हा मूळ नवा जीवाणू अमेरिकन टाईप कल्चर कलेक्शन (ATCC) या सूक्ष्मजीवांच्या पेढीत, अनुक्रमांक-ATCC ३५२७४ या ओळख क्रमांकावर ठेवण्यात आला आहे. कालांतराने तो मानवी आणि इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यात देखील आढळतो असे शोधादरम्यान लक्षात आले. केवळ ‘ऑक्सेलेट’चे क्षार पचविणे आणि त्याचा पोषक आणि ऊर्जेचे साधन म्हणून वापर करणे हे त्याचे खास वैशिष्ट्य. आबालवृद्धांच्या आतड्यात हा जीवाणू आढळतो.
ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस आणि ऑक्सेलेट विघटन:
हा जीवाणू अंतर्ग्रहण केलेल्या ऑक्सेलेटचे विघटन करून त्याचे आतड्यातील प्रमाण कमी करू शकतो आणि त्यायोगे आतड्यांमधून होणारे ऑक्सेलेटचे शोषण कमी करतो, तसेच मोठ्याआतड्याद्वारे ऑक्सेलेटचे उत्सर्जन उत्तेजित केले जाते. या सगळ्यामुळे हायपरॉक्सालुरियापासून म्हणजेच अतिऑक्सेलेट मुळे दिसणारे विकार यांपासून हा जीवाणू संरक्षण प्रदान करतो. म्हणूच हा जीवाणू आतड्याच्या सूक्ष्मजीवसमूहात असणे महत्वाचे ठरते. मूत्रातील सुमारे ४०% ऑक्सेलेट आतड्यांमधून येते. ते घडते असे, प्रथम आहारामार्फत आलेले ऑक्सेलेट रक्तात शोषिले जाते. रक्त सतत मूत्रपिंडाद्वारे व्याश्लेषित होत असते. आतड्यातून ऑक्सेलेट सौम्य/माफक प्रमाणात असेल तर मूत्रपिंडात फारसे साचत नाही व मूत्रावाटे उत्सर्जित केले जाते. आतड्यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सेलेट शोषले गेले तर बरेचसे ऑक्सेलेट मूत्रपिंडाच्या विविध भागात कॅल्शियम ऑक्सेलेट रूपात साचते व कालांतराने त्यांचे रूपांतर खड्यांमध्ये होते. परिणामी मुतखड्याची लक्षणे दिसू लागतात.
आतड्यातील या जीवाणू मार्फत ऑक्सेलेटचे विघटन घडवून आणले आणि परिणामी ऑक्सेलेटचे शोषण मर्यादित केले गेले तर नेफ्रोलिथियासिस म्हणजेच मुतखडा विकसित होण्याचा किंवा पुन्हा होण्याचा धोका कमी होतो. तसेच मूत्रातील ऑक्सेलेटचे प्रमाणदेखील नियंत्रित होते. ढोबळमानाने केलेल्या हिशेबाने असे मानले जाते मानवी आतड्यात प्रतिग्राम मलद्रव्यामध्ये सुमारे १ कोटी ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस जीवाणू असतात व यांचा ऑक्सेलेट विघटनाचा दर देखील उच्च असतो. या वरून ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस या जीवाणूचे नेफ्रोलिथियासिसचे उपचार आणि प्रतिबंध यासाठी संभाव्य उपयोजन स्पष्ट होते.
हेही वाचा… Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा दुष्परिणामच अधिक!
लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टरीयम जीवाणूंच्या प्रजातीमध्ये देखील ऑक्सेलेट विघटनाची क्षमता दर्शविली गेली आहे. परंतु ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेनेस यात विघटन करणारी दोन प्रबळ विकरे असतात. त्यामुळे त्यांची ऑक्सेलेट विघटनाची क्षमता खात्रीलायक असते. म्हणून कॅल्शिअम ऑक्सेलेट मुतखड्याच्या निर्मितीचे प्रतिबंध आणि वारंवार पुनरावृत्ती टाळण्यासाठी या जीवाणूची प्रोबियॉटिक्स म्हणून कुतूहल वाढत आहे. ऑक्सलोबॅक्टर फॉर्मिजेन्सने भावी पिढीच्या प्रोबायोटिक्ससाठी आशादायक, लक्षणीय स्वारस्य निर्माण केले आहे. काही निवडक कंपन्यांची या जीवाणूची उत्पादने बाजारात उपलब्ध देखील आहेत. बायोथेराप्युटिक सूक्ष्मजीव कालांतराने रासायनिक औषधांना उत्कृष्ट, सक्षम आणि सुरक्षित पर्याय ठरतील याची ही नांदी आहे.