Health Special आतप म्हणजे ऊन. आयुर्वेदाने हिवाळ्यातल्या दिवसांमध्ये उन्हाचे सेवन करण्याचा सल्ला दिलेला आहे. हिवाळ्यामध्ये आतप सेवनाचा दिलेला सल्ला हा आरोग्यदायीच असतो, यामध्ये शंका नाही. हेमंत-शिशिरातल्या गारठ्याच्या दिवसांमध्ये अंगाला ऊब देणारे ऊन सर्वांनाच हवेहवेसे वाटते, ज्याचा शक्य होईल तितका आनंद प्रत्येकाने घ्यावा. त्यातही थंडी (शिशिर) हा निसर्गतः शरीरामध्ये थंड, गोड, जड, स्निग्ध, बुळबुळीत गुणांचा कफ जमण्याचा (कफसंचयाचा) ऋतू असल्याने आणि ऊन त्या कफाच्या गुणांच्या विरोधी असल्याने या दिवसांमध्ये केलेले उन्हाचे सेवन कफ जमण्यास विरोध करणारे ठरते.
सावलीत थांबा, नंतर उन्हात जा
एकंदरच हिवाळ्यात उन्हाचे सेवन करणे आरोग्याला हितकर ठरते, त्यातही ज्यांच्या शरीरामध्ये मुळातच थंडावा अधिक असतो, अशा वात व कफ प्रकृतीच्या व्यक्तींना. मात्र उन्हाचे सेवन युक्तिपूर्वक करावे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. (अष्टाङ्गहृदय १.३.१४) युक्तिपूर्वक चा अर्थ असा की, एक तर थंडीमधून अचानक कडक उन्हात जाऊ नये. गारव्यामधून अचानक उष्म्यामध्ये जाणे आरोग्यासाठी हितकर नसते. हा शीत-उष्ण व्यत्यास शरीराची तापमान यंत्रणा बिघडवू शकतो. त्यामुळे गारठ्यामधून बाहेर पडल्यावर आधी सावलीमध्ये थोडा वेळ थांबून मग उन्हामध्ये जावे, शक्यतो शरीराला सुखद वाटेल असे ऊन अंगावर घ्यावे. गारठ्यामधून बाहेर पडल्यावर थेट सुर्याकडे पाहू नये.
ऊन चालेल, पण वारा नको
शिवाय, ऊन घेतल्यानंतर शरीराला वारा लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. होतं असं की, तुम्हीं मैदानावर, बागेमध्ये, गच्चीवर, बाल्कनीमध्ये, खिडकीजवळ जिथे ऊन मिळेल तिथे बसून ऊन अंगावर घेता. मात्र ऊन मिळाल्यावर पुढे शरीराला वारा लागणार नाही, याची दक्षता घेत नाही. अंगावर ऊन घेतल्यामुळे शरीराला ऊब मिळते तेव्हा शरीराचे बाह्य तापमान गरम झालेले असते, अशा वेळेस त्वचेला गार वारे लागणे योग्य नाही. ते आरोग्यास हितकर होत नाही.
ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे त्रास
हिवाळ्यामध्ये सूर्यदर्शन नेहमीच होत नसल्याने सूर्यकिरणे शरीरावर न पडल्याने जाणवणारी ड जीवनसत्त्वाची कमतरता ही गंभीर समस्या ठरते. ड जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे कमजोर होतात, स्नायू सैल पडतात, शरीराची ताकद कमी होते, रोगप्रतिकारशक्ती घटते, केस गळू लागतात, मानसिक त्रास सारखा होतो, मन अनुत्साही व निराश होते. या बहुतांश तक्रारी उन्हाचे म्हणजेच सूर्यकिरणांचे सेवन केल्यावर निघून जातात. इथे वाचकांच्या मनात प्रश्न उभा राहील की, दिवसातल्या नेमक्या कोणत्या वेळी अंगावर ऊन घ्यावे, जेणेकरुन शरीराला पर्याप्त ड जीवनसत्त्व मिळेल, तर त्याचीही माहिती घेऊ.
ड जीवनसत्त्वासाठी सूर्यस्नान : कधी?
दिवसभरातून नेमक्या कोणत्या वेळेला अंगावर घेतलेले ऊन अधिक हितकर ठरते? आपल्याकडे याबाबत नेमकी माहिती नाही, मात्र ’अल्टिमेट न्युट्रिशन’ या आहारावरील जगप्रसिद्ध पुस्तकाच्या संदर्भानुसार सर्वसाधारणपणे सूर्यकिरणांमधील अल्ट्राव्हायोलेट (अतिनील)किरणांचा त्वचेशी होणारा संपर्क ड जीवनसत्त्वाच्या निर्मितीला चालना देत असल्याने; ज्या वेळी या किरणांचे प्रमाण सूर्यप्रकाशात सर्वाधिक असते, त्या वेळी म्हणजे सकाळी १० ते दुपारी २ या तासांमधील सूर्यकिरणे तुलनेने अधिक उपयुक्त ठरतात.
सकाळचे ऊन श्रेयस्करच!
मात्र यामध्येही एक गोम आहे.तुम्ही जिथे प्रदूषण नाही अशा गावांमध्ये राहात असाल , तर ही वेळ शरीरामध्ये ड जीवनसत्त्व तयार होण्यासाठी योग्य समजा. अन्यथा, तुम्ही जिथे निवास करता ते गाव-शहर प्रदूषित असेल तर मात्र अडचण आहे. कारण वातावरणातील धूळ, वायू, धुके वा अन्य प्रदूषणास कारणीभूत घटक हे अतिनील किरणांना अटकाव करत असल्याने उन्हाशी संपर्क येऊनही ड जीवनसत्त्व तयार होण्यात अडचण येईल. त्यातही शहरामध्ये सकाळी १० नंतरच वातावरणातील प्रदूषणही वाढत असल्याने या काळामध्ये लाभ होण्याची शक्यता कमीच. त्यामुळे प्रदूषित शहरांमधील लोकांनी सकाळच्या पहिल्या १-२ तासांमधील ऊन अंगावर घ्यावे. सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीनेही सकाळचे कोवळे ऊन श्रेयस्कर असते, यात काही शंका नाही.