काही दिवसांपूर्वीच एक प्रसिद्ध ब्रँड कृत्रिम चीज वापरुन ग्राहकांची फसवणूक केल्याचं उघड झालं. त्यानंतर कृत्रिम चीजचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कृत्रिम चीज वापरण्याची परंपरा जुनीच आहे. प्रामुख्याने असं चीज तयार करताना त्याचं उत्पादन आणि मागणी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. जाणून घेऊया कृत्रिम चीज काय असतं, काय आहेत त्याचे फायदे तोटे?
“पल्लवी मावशी, चीज अॅनालॉग म्हणजे”? १२ वर्षांच्या काव्याने कुतूहलाने विचारलं. “चीझ अॅनालॉग म्हणजे चीझसारखं असणारं, दिसणारा पदार्थ जो दुधापासून तयार केला जात नाही”, मी म्हटलं.
“काल न्यूजमध्ये आमच्या इकडून चीज अॅनालॉग व्हॉट केलं ग ममा ?” काव्याने प्रिताला विचारलं (प्रीता काव्याची आई)
“जप्त केलं म्हणजे सील केलं. मुंबईतच पकडलंय अगं. बाहेरचं काही खायलाच नको”, प्रीता म्हणाली.
काव्याने कुतूहलाने मला विचारलं म्हणजे इट वॉज फेक पाश्चरायझेशन ? फेक पनीर प्रेपरेशन? काव्याने डोळे मोठे करत माझ्याकडे पाहत विचारलं. तिचा बाबा म्हणाला मला, “ते अनहेल्दी असतं खूप”.
“पाश्चरायझेशन वेगळं. त्यात दुधातील पदार्थाचं विलगीकरण करतात आणि अॅनालॉग म्हणजे कृत्रिम -वेगळ्या पदार्थापासून चीझसारखा पदार्थ करतात. हे वेगळं”, मी सांगितलं.
“म्हणजे बर्गर पॅटी पनीर इज फेक !” काव्याने विचारलं. यावर प्रीताने मोठ्ठा होय भरला.
काव्या यादरम्यान हळूच माझ्याशेजारी आली आणि तिने विचारलं – “मी ठरवलंय -यापुढे कधीच बाहेरचं चीझ किंवा पनीर सँडविच खाणार नाहीये. ते फेक पनीर आणि चीज इज अनहेल्दी” !
“तुला गरजच नाहीये बाहेरचं खायची. तुझी आई इतकं ताजं आणि हेल्दी जेवण करते. ट्रस्ट हर !” मी असं म्हणताच काव्याने प्रीताला घट्ट मिठी मारून म्हणाली – माय ममा इज बेस्ट ! त्यावर मी आणि प्रीता सुखावून हसलो.
काव्याने सांगितलेला चीझ अॅनालॉगचा किस्सा मात्र माझ्या डोक्यातून जाईना. इतक्या सहज एखाद्या पदार्थासारखं दिसणारा, चव असणारा पदार्थ हुबेहूब पदार्थ तयार करून सर्रास वापरला जातो आणि ग्राहक म्हणून आपण तो तितक्याच सहज स्वीकारतोसुद्धा.
कृत्रिम चीज तयार करताना ते विषारी परिणाम करत नाही. चीझसदृश कृत्रिम पोत आणण सोपं आहे. पामतेलाचे शरीरावर होणारे परिणाम वाईट असले तरी ते खाण्यासाठी मान्य असल्यामुळे सर्रास वापरलं जाऊ शकतं. या चीजमध्ये दुधापासून बनणाऱ्या चीजपेक्षा आणि पनीरपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल असते.
कृत्रिम चीजचा उष्मांक जास्त असतो. त्यामुळे ते जास्त वेळ गरम केले जाऊ शकते. कमी वेळात जास्त प्रमाणात चीज तयार करणे शक्य होतं. सोयाबीन, सोयाबीन तेल, कृत्रिम रंग आणि पामतेल यांचा वापर करून चीज आणि पनीर तयार केले जाते. याप्रकारे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असताना सोयाबीनमधील पोषकतत्त्वे काही प्रमाणात या चीजमध्ये आढळतात.
या चीजमध्ये जीवनसत्त्वे उत्तम प्रमाणात असतात पण स्निग्धांशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण जास्त असते. या चीजची चव दुग्धजन्य चीज सारखीच असते. मात्र नेहमीच्या चीज आणि पनीरपेक्षा कृत्रिम चीज आणि पनीर जास्त मलईदार असते. या चीजचा आणि तत्सम उत्पादनांचा वापर मुख्यत्वे केक, पेस्ट्रीज, बिस्किटे तयार करणे, पनीर बर्गर, चीज बर्गर, आणि तत्सम उत्पादने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
नेहमीच्या खाण्यामध्ये विशेषतः संध्याकाळच्या चटपटीत पदार्थांमध्ये या कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांचा वापर सर्रास केला जातो. अनेकदा नाचोज चिप्स, बटाटा चिप्स किंवा भाजी यासोबत “डीप” म्हणून दिला जाणारा पदार्थ प्रत्येक वेळी चीज असेलच असे नाही. विशेषतः जेव्हा रोटी रॅप म्हणून तळीव पोळीमध्ये भाज्या आणि दिसायला विशेष तेलकट दिसणारं पिवळसर चीजचा थर आपण सर्रास पाहतो.
सँडविचवर वितळलेलं चीज म्हणून एक अत्यंत पाणीदार चीजचा थर लावला जातो. फ्रँकीबरोबर तर पनीर म्हणून देखील अनेकदा कृत्रिम पनीर वापरलं जातं. अनेक आईस्क्रीम किंवा कुल्फी खाताना आपल्याला दुधापेक्षा केवळ साखरेचं पाणी पितोय असं वाटतं त्यावेळीदेखील क्रीम म्हणून अशा प्रकारच्या कृत्रिम दुधाचा वापर केला जातो.
हेही वाचा – मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?
अलीकडे ग्राहक म्हणून आपण सजग होत चाललोय. मात्र तरीदेखील अनावधानाने आपण बेकरी पदार्थ खरेदी करताना अशा प्रकारचं कृत्रिम पनीर किंवा चीज विकत घेत नाही आहोत याचं भान राखणं आवश्यक आहे.
प्रोटीन मिळावं म्हणून पनीर बर्गर खाताना त्यातलं पनीर खरंच चांगल्या दर्जाचं आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दूध, दुधाचे पदार्थ वापरताना त्यात भेसळ असू नये यासाठी आपण सजग असतो. अनेकदा कृत्रिम दुग्धजन्य पदार्थ खाताना त्यातील स्निग्धांशाचे अतिरिक्त परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ डोळसपणे विकत घेणं फार महत्वाचं ठरतं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून केवळ भरघोस कॅलरीज नव्हे तर कॅल्शिअम, प्रथिने, केसीन यासारखी आवश्यक पोषकतत्त्वं मिळणं आवश्यक असतं.
वाढत्या मुलांमध्ये दूध, दही, पनीर, चीज यापासून मिळणारं कॅल्शिअम हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दूध किंवा दुधाचे पदार्थ निवडताना डोळस रहा सतर्क रहा.