“गेले काही दिवस इतका रडतोय तो. दात येत आहेत म्हणून खूपच रडारड होते त्याची. काही डाएटरी चेंजेस करू शकतो का आपण ?” श्रुतीच्या बाळाच्या रडण्याच्या आवाजातच आमचं बोलणं सुरु होतं. श्रुती बाळाच्या दात येताना होणाऱ्या वेदना आणि त्यातून आहारात बदल याबाबत उत्सुक होती. तिचं ७ महिन्यांचं गुटगुटीत बाळ रडून रडून लाल झालं होतं.
“ तो काहीही खात नाहीये. दूधही घेत नाहीये. मलाच काळजी वाटतेय. गेले दोन दिवस रॅशेस पण आलेत. हे कमी कधी होणार? दात येताना होतं ते हेच आहे का ?आणि हे असंच सुरु राहणार का ?”
श्रुतीच्या आवाजात काळजी आणि अस्वस्थता जाणवत होती. आमच्या बालरोगतज्ज्ञांनी तिला शांत करत विचारलं “ किती वेळा फीड घेतलं आज ?”
“सकाळपासून ३ वेळा पण आता आम्ही थोडं नॉर्मल खायला देतोय. गाजर, भरड वगैरे”
“तरीही सकाळपासून रडायचं थांबत नाहीये तो..आम्हाला थोडी भीती वाटतेय. अंगपण थोडं गरम आहे. म्हटलं ताप यायच्या आधी भेटू”
श्रुतीच्या सजगपणाचं आम्हाला कौतुक वाटलं.
बाळाला दात यायला सुरुवात होते तेव्हा प्रत्येक बाळाचं त्यादरम्यान वावरणं बदलू लागतं. काही मुलं खूप रडतात, काहींना रॅशेस येतात, काहींची भूक कमी होते, स्तनपान करताना देखील बाळाचं रडणं वाढतं. बाळ अचानक आजच्या भाषेत सांगायचं तर मूडी होऊन जातं.
बाळाच्या खाण्याबाबत सजग आणि आग्रही असणारे पालक यादरम्यान भंडावून जातात. आपलं नेमकं काही चुकतंय का हेच त्यांना कळत नाही.
शिवाय दात येण्याची प्रक्रिया ही एक-दोन महिन्यांची नसून वर्ष-२ वर्षापर्यंत सुरु असते. येणाऱ्या दातांप्रमाणेच बाळाचा खाण्याचं गणित देखील बदलत असतं. लहान मुलांचं खाणं सकस असावं यासाठी सगळेच आग्रही असतात. त्यातून दात येताना बाळाचे बदलणारे मूड्स यामुळे पालकांमध्ये संभ्रम आणि काळजी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात.
बाळाच्या स्तनपानाच्या दिवसात निवांत , आनंदी खेळकर असणार बाळ या दरम्यान खूप विचित्र प्रतिसाद देऊ लागतं. याने आईवडिलांची घाबरगुंडी उडते. अशावेळी योग्य बालरोगतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ यांचं मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं ठरतं.
साधारण ६ ते ७ महिन्यात बाळाला दात यायला सुरुवात होते . काही बाळांमध्ये हिरड्या दुखतात आणि दात येताना बाळांना खूप त्रास होतो आणि काहींमध्ये विनासायास कोणतीही लक्षणं न दिसता दात येण्याची प्रक्रिया होते. ही प्रक्रिया साधारण ७ महिने ते २ वर्ष सुरु असते.
नेमकी ही लक्षणं कोणती हे आधी जाणून घेऊया.
- बाळ बोट चावण्याचा प्रयत्न करतं
- घरातील वस्तू तोंडात घालून चावण्याचा प्रयत्न करतं
- बाळाच्या शरीराचे तापमान वाढते
- बाळाची झोप पूर्ण न होणे
- त्याच्या हिरड्यांना सूज येते
- त्याच्या हिरड्या लाल होतात
- तोंडातून खूप लाळ येते
- बाळाचे गाल लाल होतात
- बाळ खाण्याकडे दुर्लक्ष करते
- बाळाची भूक कमी होते
- अनेकदा बाळाचं पोट गरजेपेक्षा जास्त साफ होणे, ताप येणे हेही दात येण्याचं लक्षण मानलं जातं. यावर वेळीच उपाय होणे आवश्यक आहे. या गैरसमजातून बाळावर उपचार होण्यास उशीर होऊ शकतो.
या दरम्यान बाळाला टीदर्स (चोखणी ) देणे हा सोपा उपाय आहे. आईचं दूध देखील बर्फाळ स्वरूपात ठेऊन जाळीदार चोखणीतून चोखायला देणे उत्तम ठरते.
बाळाची भूक कमी होतेय असं लक्षात आल्यास त्यांना भाज्यांचे किंवा फळाचे रस शक्यतो थंड पाण्यात ठेवून किंवा बर्फ स्वरूपात देऊ शकतो. यामुळे हिरड्यांच्या दुखण्याची जाणीव काही अंशी कमी होऊ शकते आणि बाळाला तात्पुरता आराम मिळू शकतो. बर्फातील फळे देताना त्याचं तापमान बाळाला मानवतंय का याचा देखील अंदाज घेणं गरजेचं ठरतं. जर बाळ शिजवलेले पादार्थ खाऊ शकत असेल तर उकडलेल्या भाज्या , फळं देखील देता येऊ शकतात.
उकडलेल्या भाज्यांमध्ये ब्रोकोली, गाजर यासारख्या भाज्या शिजवून बाळांना चोखायला देता येऊ शकतात.
१ वर्षाहून जास्त महिन्यांच्या बाळांना ताजे शिजवलेले पनीर, ताजे दही, कडधान्यांचा गर (हमस , कढणं ) यासारखे अन्नपदार्थ देता येऊ शकतात. शक्यतो या दरम्यान बाळाला साखरयुक्त, मीठयुक्त पदार्थ देणे टाळावे.
१ ते २ वर्षापर्यंतच्या बाळांसाठी
- उकडलेले अंडं , डाळीची पेज , नाचणीचं सत्व , उकडलेले मटार, उकडलेल्या गाजराचे काप , शिजवलेल्या धान्यांचे सत्त्व , तुपात शिजवून केलेली भरड हे पर्याय उत्तम आहेत.
याशिवाय
- स्वच्छ हातांनी बाळाच्या हिरड्यांना हलके मसाज करावा
- धुतलेले स्वच्छ कापड बर्फात ठेवून बाळाला चोखायला द्यावे
- बालरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करून दातांची होणारी वाढ आणि त्याबद्दल घेण्याची काळजी याबद्दल योग्य माहिती जाणून घेणे हेदेखील महत्वाचं आहे .
- दात येताना तान्ह्या बाळांसाठी विविध प्रकारची औषधं उपलब्ध आहेत परंतु दात येण्यासारख्या नैसर्गिक प्रक्रियेसाठी शक्यतो कोणत्याही औषधाचा वापर करू नये.
- दात येणं म्हणजे बाळ नेहमीचे अन्नपदार्थ खायला तयार होणं अशावेळी जितकं सहनशील राहून नैसर्गिकरीत्या या प्रक्रियेत सहभागी होता येईल तितकं बाळाचं आणि पालकांचं नातं देखील दृढ होत जातं.