पल्लवी, ‘”मला असं वाटतंय की, माझं वजन कमी झालंय. ड्रेस सैल होतायत आणि मला व्यायाम करावासा वाटतो आहे.”दिव्याच्या आवाजात वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. तीन महिन्यांपूर्वीचं आमचं बोलणं आठवलं; जेव्हा दिव्याबरोबर माझं डाएट सेशन सुरू होतं. “माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मला त्या वजनकाट्याचंच प्रेशर येतं आणि खाल्ल्यावर वाईट वाटत राहतं. तरीही मला वाटतंय की, मी किमान डाएट बदलून पाहावं. म्हणजे आधीपासून करतेच आहे तरी करायला पाहिजे. मला एक तर सारखी भूक लागते आणि मला फळांमध्ये फक्त पेर आणि केळं आवडतं. सफरचंदानं मला अजीर्ण होतं आणि डाळिंब वगैरे तर नकोच. आताच आंब्यांचा सीजनही होऊन गेला. बाकी आंबट फळं खाल्ली की, मला खूप सर्दी होते आणि अस्वस्थ वाटतं. सॅलड- मी कधीतरी खाते आणि भाज्या मी खाऊ शकतेच. मला खरं तर हॅपी डाएटिंग करायचंय. फार सॅड डाएटिंग झालंय माझं.”
दिव्यानं एका दमात सगळं सांगून टाकलं. हॅपी आणि सॅड डाएटिंग ऐकून तिला योग्य आणि अयोग्य या दोन्हींची जाणीव आहे हे जाणवून मला बरं वाटलं.
आणखी वाचा: झोपू आनंदे : गुंतता हृदय हे!
पल्लवी- ओके मला असं वाटतं की, तू वजनकाटा वापरूच नको आणि एक केळं खाऊन तुझं वजन वाढणार नाही.
तिच्या आहारपेक्षा तिच्या आवडींकडे आणि त्याप्रमाणे आहार नियमनाकडे लक्ष पुरवणं आवश्यक आहे हे जाणवून मी त्याप्रमाणे आहारात बदल केले.
दिव्या- ओके हे सगळं ठीक आहे; पण तू तर मला सगळंच सांगतेयस खायला. तुमची ती ‘खायचं नाही’ पदार्थांची यादी कुठे आहे?
मला तिनं ज्या प्रकारे प्रश्न विचारला त्याचं जास्त हसू आलं.
पल्लवी- देणार ती यादी; बरोबरच असेल ती.
दिव्या- हो. पण, तू केळं खा म्हणतेयस . हे तूप-भातपण आणि मला आता काहीही खायचीच भीती वाटते.
पल्लवी- हो. चॉकलेट काढलंय आपण आणि नूडल्ससुद्धा. तरीही आपला फोकस हॅपी डाएटवर आहे. आधी आपण आवडीचं आवडीनं खाऊ या.
दिव्या- ओके… आणि नो वजनकाटा?
पल्लवी- सध्या आवश्यकता नाही.
आमच्या सेशननंतर नकारघंटा किंवा पथ्याचं प्रेशर जास्त ठाण मांडून बसतं आणि फक्त मेन्यू म्हणून आहाराचा विचार केल्यामुळे वजन आणि आहारशास्त्राचा बागूलबुवा होतो, असं माझ्या लक्षात आलं. दिव्यासारख्या अनेक जणांना आपल्या आवडत्या पदार्थांना आता जागा नाही याचंच दुःख जास्त जाणवत असतं.
आणखी वाचा: Health Special: लोणची चवदार, पण प्रमाणातच, अन्यथा…
आपल्या आहार आणि मानसिकतेचा खूप जवळचा संबंध आहे. अपुरा आहार आणि भावभावनांच्या कल्लोळामुळे आहाराचे परिणाम बदलू शकतात .
एखादी भावना ठरविक वेळी निर्माण होणं आणि त्याला त्वरित प्रतिसाद दिला, तर समजू शकतो; मात्र त्यामुळे तयार होणारी मनस्थिती जास्त वेळ असते .
अनेक संशोधनांमध्ये भावनांचा संबंध थेट खाण्याशी जोडला गेलेला आहे.
साखर, तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ अतिरेकी प्रमाणात खाल्ल्यास भावनांच्या अतिरेकी प्रतिसादाचे प्रमाण वाढू शकते. अनेक शोधनिबंधांमध्ये आपलं खाणं आणि आपल्या भावनांना कारणीभूत ठरणारी संप्रेरकं यांचा जवळचा संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे.
आपण कोणत्या मनस्थितीत खातो यानुसार मेंदूतील संप्रेरकांवर परिणाम होतो. चांगल्या वातावरणात खाल्लं तर संप्रेरकांची स्थिती नीट राहते. काळजीत किंवा त्रासात असताना खाल्लं तर संप्रेरकांची स्थिती गडबडते. यामुळे परिणाम जाणून घेणं आवश्यक आहे.
आणखी वाचा: मशरुम किती पौष्टिक असतात? ते खाणे किती फायदेशीर?
खाणं सुरू करणं आणि नियंत्रणात आणणं हे जसं लेप्टिन व घ्रेलिन या भुकेसाठी कारणीभूत असणार्या संप्रेरकांच्या कवायतीवर अवलंबून आहे; तसंच मेंदूच्या एका ठराविक कक्षेत असणार्या न्यूरॉन्सचं जाळं आपल्या खाण्याच्या भावनांशी संबंधित आहे.
डोपामाइन व सेरोटोनिन भुकेच्या नियमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. सेरोटोनिनची अतिकमतरता अतिरेकी खाण्याशी निगडित आहे. डोपामाइन व्यसनांशीही जोडलं गेलं आहे.
भूक नियंत्रणात ठेवणं, तसंच ती उत्तेजित करण्याचं काम कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक करतं. अनेक पदार्थ अनावश्यक भुकेची भावना तयार करतात अशा वेळी माणूस खाणं थांबवू शकत नाही . कारण आपण फक्त खात जातो आणि काय खातोय व किती खातोय याकडे आपले लक्षच नसते. विशिष्ट क्षणी आपल्याला असे वाटते की ‘हे भारी आहे’ पण त्याहीवेळेस ते फीलिंग वगळता पोट भरले आहे की नाही याची जाणीवही आपल्याला नसते. ही जाणीव आपल्याला भावभावनांचे प्रमाण नियोजित करणारी संप्रेरकं करुन देत असतात. नेमके हेच गणित बिघडलेले असते. परंतु, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या संप्रेरकांचं प्रमाण योग्य पद्धतीनं राखलं जातं आणि योग्य प्रकारचे पदार्थ निवडण्याचं कौशल्यदेखील वाढीस लागल्याचं दिसून येतं.
नकारात्मक भावना म्हणजे चिंता, दुःख, एकाकीपणा, कंटाळा, राग, तणाव, नैराश्य यांचा लठ्ठपणाशी थेट संबंध आहे. शरीराचं वजन वाढण्याचं प्रमाण नकारात्मक भावना असणाऱ्यांमध्ये जास्त असल्याचं दिसून येतं.
आपल्याकडे ‘भावनेच्या आहारी जाणे’ असा वाक्प्रचार प्रचलित आहे . आहारतज्ज्ञ म्हणून मला शब्दशः हा वाक्प्रचार महत्त्वाचा वाटतो. कंटाळा आला म्हणून खाणं, रागानं अतिरेकी खाणं, अतिशय दुःखात काहीतरी खाणं यामुळे पदार्थ आणि शरीरावर दुष्परिणामच होतात. किंबहुना आहारनियमन करताना खूप घाबरून थोडंसंच खाणं किंवा उपाशी राहणं असे अनुभव अनेकदा येतात. त्यामुळे दिव्याच्या भाषेत सांगायचं तर ‘सॅड डाएटिंग’चा अनुभव जास्त येतो. त्यामुळे आनंदाचं खाणं असणं आवश्यक आहे.
म्हणजे कसं तर- योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य अन्नपदार्थ खाल्ल्यानं मन, मेंदू व शरीर या तिन्हींचा समतोल राखला जाऊ शकतो.