थंडी हा वर्षभरातला सर्वात निरोगी ऋतू. या दिवसात सहसा लोक आजारी पडत नाहीत. डॉक्टरांचे दवाखाने सुद्धा तसे रिकामेच असतात, कारण रुग्णांची गर्दी नसते. एकंदरच आयुर्वेदाने हेमंत ऋतूला वर्षभरातला सर्वाधिक स्वास्थ्यवर्धक ऋतू सांगितले आहे. थंडीतल्या या निरोगी दिवसांचा शरीराचे बल वाढवण्यासाठी उपयोग करावा, असे शास्त्राचे सांगणे आहे. एकंदरच हिवाळ्यामध्ये अशाप्रकारे दिनचर्या ठेवावी,जेणेकरुन उर्वरित वर्ष निरोगी जाईल.त्यातही यापुढचे वसंत,ग्रीष्म व वर्षा हे स्वास्थ्याला एकाहून एक प्रतिकूल असे ऋतू एकामागून एक येणार असल्याने त्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी हिवाळ्यात शरीराचे स्वास्थ्य व रोगप्रतिकारशक्ती उत्तम करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र फक्त च्यवनप्राश खाऊन किंवा पौष्टिक आहार घेऊन शरीर तंदुरुस्त होईल, या भ्रमात राहू नका! पौष्टिक खुराक पचवण्यासाठी व च्यवनप्राश सात्म्य होण्यासाठी व्यायाम हवाच. म्हणूनच म्हटले की थंडी आहे म्हणून नुसते हातावर हात चोळत बसू नका.
हिवाळा हा एक असा काळ आहे,जेव्हा प्रत्यक्षात या शरीराला व्यायामाची गरज असते. मात्र वेगवेगळ्या कारणांनी लोक व्यायाम टाळतात. हिवाळ्यात व्यायाम न करण्याची कारणे वेगवेगळी असतात.जसे थंडीने कुडकुडत असताना व्यायामासाठी म्हणून ऊबदार कपडे-ऊबदार पांघरूण सोडावेसे न वाटणे, थंडीमुळे अंग जड होणे (त्यातही हातपाय जड होणे), हाडे दुखणे, कंबर धरणे, सांधे आखडणे, सर्दी-ताप-खोकला-दमा वगैरे श्वसनविकाराने ग्रस्त असणे, केवल कर्बोदकांनी युक्त अशा(गोडधोड) आहाराच्या सेवनामुळे सलग उर्जेचा अभाव व त्यामुळे (अतिगोडामुळे) निर्माण होणारी क्रियाहिनता म्हणजेच सामर्थ्य असूनही काम न करण्याची इच्छा,प्रथिन-उर्जेचा अभाव व त्यामुळे अनुत्साह, सतत झोप येणे, मद्यपानाचा अतिरेक वगैरे कारणांमुळे लोक व्यायाम टाळतात. अर्थात यांमध्ये आळस हेच सर्वात प्रभावी कारण आहे. कारण अगदी शरीर रोगग्रस्त असले तरी त्या-त्या रोगांवर उपचाराप्रमाणे साहाय्यक होणारे व्यायाम करता येतातच. कारण कोणतेही असो, लोक या नाही तर त्या कारणाने हिवाळ्यात व्यायाम करत नाहीत आणि हात चोळत बसतात.
हेही वाचा…Health Special: प्रेमाचं प्रतीक असलेल्या गुलाबाचे प्रकृतीसाठी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
इथे थंडीमध्ये तुम्ही हात का चोळता, याचाही जरा विचार केला पाहिजे. हवेतल्या गारठ्यामुळे शरीराच्या केंद्राला (जिथे मस्तिष्क,हृदय,मूत्रपिड,यकृत असे महत्त्वाचे अवयव असतात त्या भागाला) अधिक रक्त पुरवण्याचा शरीर प्रयत्न करते. त्यामुळे त्वचा व हातापायांना रक्तपुरवठा कमी होतो. अशावेळी हात गार पडतात आणि त्यांना उब मिळावी, तिथे रक्तसंचार व्हावा म्हणून शरीर तुम्हाला हात चोळायला उद्युक्त करते. हा ऊब देण्याचा शरीराचा प्रयत्न असतो, जो तुम्ही नकळत करता. प्रत्यक्षात हातापायांमध्ये (किंबहुना संपूर्ण शरीरामध्ये) व्यवस्थित रक्तसंचार होण्यासाठी शरीराला चलनवलनाची गरज असते, जे केवळ व्यायामाने शक्य आहे.
हेही वाचा…Health Special : चॉकलेटचा कुठला प्रकार तुम्हाला ठेऊ शकतो फिट?
याचसाठी या दिवसांमध्ये काहीना काही व्यायाम केला पाहिजे..तरुण असाल तर दंडबैठका मारा, वेटलिफ़्टिंगची आवड असेल तर जिममध्ये जाऊन वजने उचला, धावण्याची आवड असेल तर धावा-पळा, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो असे उर्जादायी मैदानी खेळ खेळा, वयाने लहान असाल तर सूर्यनमस्कार घाला, दमवणारे-घाम काढणारे खेळ खेळा, प्रौढ वयाचे असाल तर सूर्यनमस्कार घाला, कार्डिओ व्यायाम करा , सायकलिंग करा किंवा आवडता खेळ खेळा. ज्येष्ठांसाठी सुद्धा सूर्यनमस्कार किंवा योगासने योग्य. तुमच्या शारिरीक स्थितीमुळे किंवा एखाद्या आजारामुळे यातला कोणताही व्यायाम जमत नसेल तर चालायला जा. ज्या वृद्धांना चालणेही जमणार नसेल त्यांनी उन्हात उभं राहावं आणि बसल्या जागेवर हातापायांच्या हालचाली कराव्यात आणि प्राणायाम करावा. बसल्या जागेवर शरीराला उर्जा देणारा प्राणायाम हा एक योग्य व्यायाम आहे. मथितार्थ हाच की थंडीत नुसते हात चोळत बसू नका, आळस झटका आणि व्यायाम करा.