उषःपान म्हणजे सकाळी केलेले जलप्राशन. सकाळी म्हणजे नेमके कधी तर रात्रीच्या शेवटच्या प्रहरामध्ये सूर्योदय होण्यापूर्वी उषःपान करावे. रात्र संपत असताना सकाळी उषःपान केल्यामुळे विविध आजार, एकंदरच वात-पित्त व कफ विकृत झाल्यामुळे होणारे सर्व रोग नष्ट होतात, असा उल्लेख आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये आहे. महर्षी भोज यांनी तर शिळे (रात्री भरुन ठेवलेले असे) पाणी साधारण आठ ओंजळी इतक्या मात्रेमध्ये नियमितपणे सकाळी पिणारा माणूस रोग व अकाली वार्धक्य यांपासून दूर राहून शतायुषी होतो,असे म्हटले आहे. हे अर्थातच उषःपानामुळे आरोग्याला होणारे फायदे मनात ठसवण्यासाठी सांगितले आहे.
आयुर्वेदाचे आद्य संहिताकार सुश्रुत यांनी मात्र शिळे पाणी पिण्यास विरोध केला आहे. सुश्रुत यांच्यामते शिळे पाणी कोणालाही देऊ नये, ना रुग्णांना ना स्वस्थ व्यक्तीला! कारण शिळे पाणी आंबट होते व शरीरामध्ये कफ वाढवते आणि म्हणूनच तहानलेल्याला शिळे पाणी देऊ नये. या विरोधाचे उत्तर सुश्रुतसंहितेचे भाष्यकार डल्हण यांच्या निबंधसंग्रह या भाष्यामध्ये मिळते.डल्हण मतानुसार उकळवून ठेवलेले असे शिळे पाणी पिणे अयोग्य, निष्कर्ष हाच की रात्री न उकळवता ठेवलेले पाणी सकाळी उषःपानासाठी वापरता येईल.
हेही वाचा…कोमट दूध प्यायल्यास खरेच शांत झोप लागते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या काय आहे सत्य….
उषःपानाचे आरोग्याला फायदे
रात्री जेवल्यानंतर साधारण अडीच ते तीन तास अन्न जठरामध्ये असते आणि त्यानंतर आतड्यामध्ये शिरते. त्यानंतर पुढचे काही तास जठरामध्ये अन्न नसते. अन्न नसले तरीही जठरामध्ये अत्यल्पमात्रेमध्ये अम्ल स्त्राव होत असतो. त्यात ज्यांची पित्तप्रकृती आहे अशा मंडळींमध्ये अंमळ जास्तच पित्तस्त्राव होतो. एकंदरच ज्यांचा अग्नी तीव्र आहे त्यांना रात्रीचे जेवण जेवल्यानंतर साधारण चार-पाच तासांनी भूक लागते व जठरामध्ये अम्लाचा स्त्राव सुरु राहतो. त्या वेळेला व्यक्ती झोपेत असल्याने अन्नसेवन होत नाही आणि अन्नाअभावी ते संहत अम्ल जठराच्या आतल्या नाजूक त्वचेला इजा करु शकते.
दुसरीकडे ते निव्वळ अम्ल पुढे सरकून आतड्यांमध्ये पोहोचून त्याचे शोषण होते व ते रक्तात मिसळते,ज्यामुळे रक्ताचा अम्ल धर्म वाढण्याची शक्यता असते. मानवाच्या रक्ताचा पीएच हा ७.३५ ते ७.४५च्या आसपास राहायला हवा अर्थात रक्त अम्ल धर्मीय होऊ नये. कारण रक्त अल्कधर्मीय राहणे आरोग्यासाठी अतिशय उपकारक असते. काही संशोधकांच्या मते तर रक्त अम्लधर्मीय होणे हेच अनेक आजारांचे, अकाली वार्धक्याचे व मरणाचे एक प्रमुख कारण आहे. सकाळी लवकर पाणी प्यायल्याने जठरामधील अम्लाची संहतता कमी होते आणि रक्ताचा अम्ल धर्म सुद्धा कमी होऊन रक्त अल्कधर्मीय होण्यास साहाय्य होते. रक्त अल्कधर्मीय होणे हे संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्याला उपकारक होते.
हेही वाचा…Health Special : मुलांचे मनःस्वास्थ्य- वाढ आणि विकास- भाग २
हिवाळ्यात उषःपानाला हवे कोमट पाणी
हिवाळ्यातल्या सकाळी कडाक्याची थंडी असताना साधे पाणी असले तरी तोंडामध्ये घेण्याची हिंमत होत नाही.अगदी साधे पाणी जरी तोंडामध्ये घेतले तरी ते दातांना शिवशिवते आणि सहन होत नाही.त्याचमुळे सूर्योदयापूर्वी जर उषःपान करायचे असेल तर थंडीमध्ये पाणी कोमट असले पाहिजे. रात्रभर ठेवलेले पाणी प्यायचे असले तरी किंचित कोमट करुन प्यावे. एकंदरच हिवाळ्यामध्ये अर्थात हेमंत आणि शिशिर या ऋतूंमध्ये पिण्यासाठी कोमट पाण्याचाच उपयोग करावा.