Health Special: सुंदर त्वचेसाठी विविध उपचार गेली वर्षानुवर्षे आपण पाहात आणि ऐकत आहोत. किमान तीन महिने कच्ची लसूण सकाळी उठल्या उठल्या खा आणि नितळ ‘ग्लास’ स्किन मिळवा! असे सांगणारे व्हिडीओज गेल्या काही काळात व्हायरल झाले आहेत. त्यानिमित्ताने आजचा लेख …
पोटात जळजळ
“पल्लवी माझी स्किन अचानक खूप लाल झालीये. पोटात जळजळ पण होतेय. काल मी डायजिन घेतलंय दोन्ही जेवणाआधी” वेदिका काळजीच्या स्वरात सांगत होती.
“आपण प्रत्यक्ष भेटू शकतो का? आणि मुख्य म्हणजे डॉक्टरना भेटलीस का?” मी काळजीने विचारलं.
“अजून नाही भेटलीये. अॅक्चुयली मी गेले आठवडाभर दिवसा सकाळी उठून लसूण खायला सुरुवात केलीये. त्यामुळे झाला असेल का ?”
“पण कशासाठी?”
“मी ते ग्लास स्किनबद्दल वाचलं. म्हटलं करून पाहूया.” तिच्या या वाक्यावर नक्की काय बोलावं, हे मलाच समजेना “त्यामुळे झालं असेल का ?”
“अर्थात! काही लोकांना लसूण उष्ण पडू शकते”
“मग आता काय करूया ?”
“आधी भरपूर पाणी पिणे. त्यात पुदिना, काकडी भरपूर खा. आणि शक्य असल्यास स्किन स्पेशालिस्टना भेटून ये.”
लसणीतून मिळणारे पोषण
समाज माध्यमांवर ट्रेण्डिंग होणाऱ्या व्हिडीओ किंवा आरोग्यविषयक सल्ल्याला बळी पडलेल्या अनेकजणींपैकी वेदिका होती. यानिमित्ताने हे ग्लास स्किन आणि त्याबद्दल जाणून घेऊ.
लसणामध्ये एलिन, सायक्लो एलिन, स- एलील – ल-सिस्टीन, एस -मिथाईल – एल सिस्टीन, एस -इथलीसिस्टिन, एस -१ -प्रोपोनील – एल सिस्टीन, फ्रुकटो सिल -अरजीनीन अॅण्ड बीट क्लोरोजेनीन, एल आरजीनीन, एल सिस्टीन आणि एल मिथिओनिन असतं. १०० ग्राम लसणामध्ये ९२ % रायबोफ्लेवीन, २५% लोह, ७३% मॅग्नेशिअम असतं त्यामुळे दिवसातून किमान २- ३ लसणीच्या पाकळ्या खाल्ल्या तरी त्यातून मुबलक प्रमाणात पोषण मिळतं.
लसणीचे फायदे
लसूण आहारात नियमितपणे समाविष्ट केल्यामुळे अनेक फायदे होतात ते आधी जाणून घेऊ –
१) उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी लसूण खाल्ल्यामुळे रक्तदाब कमी होतो
२) पचनाचे विकार कमी होतात
३) केसगळती कमी होते
४) चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात
५) यकृत निरोगी ठेवण्यासाठी लसूण पावडर गुणकारी ठरते
६) त्वचेचे विकार कमी करणाऱ्या अनेक औषधांमध्ये लसूण अर्क वापरला जातो
७) नियमितपणे लसूण खाल्ल्याने स्मृतिभ्रंशाचा आजार होत नाही.
८) रोगप्रतिकारशक्ती वाढते
९) रक्तप्रवाह सुरळीत राखणे (रक्त पातळ करणे)
कच्च्या लसणीचे परिणाम
या सगळ्या आरोग्यदायी फायद्यांसोबत काही लोकांमध्ये मात्र कच्ची लसूण खाल्ल्यामुळे उलट परिणाम पाहायला मिळतात. विशेषतः ज्यांना लसूण पचत नाही किंवा लसणाची अॅलर्जी असते त्यांच्यामध्ये लसूण खाल्ल्याने पोटात जळजळ होणे, गॅसेसचे प्रमाण वाढणे असे परिणाम दिसून येतात. अनेकदा लसूण फोडणीत वापरल्यास त्याने अपचन होत नाही. त्वचाविकारांमध्ये लसूण खाणे हा अनेक त्वचारोगतज्ज्ञांच्या मते भ्रामक समजुतीचा भाग आहे.
हेही वाचा – तुम्हाला खूप जास्त आळस येतो का? ‘ही’ असू शकतात कारणे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
लसूण खाल्ल्याने मुरुमे कमी होऊ शकतात परंतु नितळ त्वचेऐवजी पोट मात्र नक्की बिघडू शकते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना कच्ची लसूण खाल्ल्याने काही दिवसांनी लालसर चट्टे येऊ शकतात. त्यामुळे समाजमाध्यमांवर व्हायरल असणाऱ्या “ग्लास स्किन” च्या व्हिडीओमध्ये काहीही तथ्य नाही.
…तर लसूण टाळा
लसूण आहारात समाविष्ट करताना सोबत उत्तम आहार असेल तर तोंडाला दुर्गंधी येणे किंवा शरीराला येणाऱ्या घामाला लसूणसदृश गंध येणं यासारखे प्रकार होत नाहीत. वृद्ध व्यक्तींनी मात्र लसूण कमी प्रमाणात खावी. अनेकदा पोटाचे विकार बळावणे, गॅसेसचे प्रमाण वाढणे अशा प्रकारची लक्षणे तीनपेक्षा जास्त प्रमाणात लसूण पाकळ्या खाल्ल्याने दिसून येतात .