-पल्लवी सावंत पटवर्धन
‘मला पोळी नको. मी सध्या ग्लुटेन बंद केलंय’, अभि म्हणाला. नवीन ट्रेंड फॉलो करायचा म्हणून सुरू आहे हे सगळं – इति अभिची बायको. ऋचा म्हणाली त्यावर अभिने सुरुवात केली. ‘सायन्स आहेच पण लॉजिक पाहिलं -तर नो ग्लुटेन म्हणजे नो कार्ब्स म्हणजे उत्तम परिणाम’, त्यावर ऋचा म्हणाली – उलट ग्लुटेन फ्रीमुळे डायबिटीस होतो’. यावर मात्र मी चमकलेच ! मी म्हटलं कुठे वाचलंस ? त्यावर ती म्हणाली – लॉजिकली – ‘ग्लुटेन चिकट असतं ना त्याने खरं तर शुगर चिकटत असणार आणि कमी होते. ग्लुटेन फ्री पदार्थांमुळे शुगरला चिकटायला काही मिळत नाही. सो होत असेल’.
तिच्या या लॉजिकल विचाराने मीच हैराण झाले आणि माझे आहारतज्ज्ञाचं मन तिचे गैरसमज दूर करायला सरसावलं. लॉजिक आणि विज्ञान यांचा कितीही परस्परसंबंध असला तरी ग्लुटेन ॲलर्जी असेल तरच ते बंद करून परिणाम मिळतात आणि ग्लुटेन फ्री आणि डायबिटीस याचा संबंध नाहीये. शुगर रक्तात वाढते आणि ती ही पदार्थांना तुझ्या भाषेत सांगायचं तर चिकटते. ग्लुटेनला चिकटून शुगर कमी वगैरे होत नसते “ त्यानंतर आमचं एक आहाराचं सेशनच झालं. मात्र ग्लुटेनचे हे गैरसमज माझ्या डोक्यात विचारचक्रासारखे धावू लागले.
हेही वाचा…Health Special: उषःपान काय असते? ते का करावे?
ग्लुटेन म्हणजे खरंतर एका प्रकारचं प्रथिन! जे गव्हात, जव यासारख्या धान्यांमध्ये असतं. एखाद्या धान्याच्या पीठाला लवचिक चिकटपणा यावा म्हणून ग्लुटेन मदत करतं. म्हणजे पीठ एकसंध करण्यासाठी ग्लुटेन अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे पिझ्झा,पास्ता, ब्रेड यासारखे बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी ग्लुटेनचा वापर केला जातो. अनेक प्रथिनांनी परिपूर्ण असणाऱ्या विगन पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लुटेन वापरलं जातं आणि विगन पदार्थ प्रक्रियेसाठी ग्लुटेन स्वतंत्र पदार्थ म्हणून विकलं जातं. खरं तर ग्लुटेन असलेल्या धान्याचं नियमित सेवन अनेक विकारांपासून आपलं संरक्षण करू शकतं.
ग्लुटेन मानवी शरीरात अनेकदा प्रिबायोटिक म्हणून देखील काम करतं. गव्हाच्या कोंड्यात अराबिनोक्सिलन ऑलिगोसकेराइड नावाचं प्रिबायोटिक आढळतं ज्याने आतड्यातील काही चांगल्या बॅक्टेरियाचं काम सुरळीत करत काही लोकांना मात्र ग्लूटेनची एलर्जी असते. अशा लोकांच्या शरीरात ग्लुटेन म्हणजे टॉक्सिनसारखं ओळखलं जातं. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती दुप्पट वेगाने काम करु लागते. थोडक्यात ग्लुटेन अजिबात पचत नाही. ग्लुटेन पाचट नाही म्हणजे नक्की काय होतं? तर ग्लुटेनची ऍलर्जी असेल तर खालील परिणाम दिसून येतात.
भरपूर थकवा येणे, पोट फुगणे, वारंवार मलावरोध बळावणे, ग्लुटेन असणारे पदार्थ खाल्ल्यावर काही वेळात पोट जास्तीचे साफ होणे, त्वचेवर लालसर चट्टे तयार होणे, त्वचेला खाज येणे, शरीरावर मुरुमे किंवा लालसर पुळ्या येणे.
ग्लुटेन ॲलर्जीची दूरगामी परिणाम म्हणजे अनावश्यक वजन कमी होणे, कुपोषण होणे, आतड्याला इजा होणे, हाडांची घनता कमी होणे, शरीरातील कॅल्शिअम कमी होणे, शरीरातील लोह कमी होणे (विशेषतः स्त्रियांमध्ये) वैचारिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होणे. अशा व्यक्तींच्या आहारात पोषणमूल्यांचा कमतरता हा महत्वाचा घटक असतो . ग्लुटेन सरसकट बंद करण्यापेक्षा त्याची ॲलर्जी जाणून त्याचे योग्य निदान करून मग त्यावर उपाय करणे कधीही योग्य अलीकडे सर्रास ग्लुटेन फ्री नावाचे पदार्थ मिळू लागले आहेत. एखादा पदार्थ ग्लुटेन फ्री असेल तर त्यात ग्लूटेनबरोबर, जीवनसत्त्व बी , मॅग्नेशिअम, लोह यांचे प्रमाण देखील नगण्य असण्याची शक्यता असते.
हेही वाचा…Health Special : मुलांचे मनःस्वास्थ्य- वाढ आणि विकास- भाग २
ग्लुटेन फ्री आहारामध्ये मुबलक प्रमाणात फळे, भाज्या, फळभाज्या यांचा समावेश करणे अत्यावश्यक ठरते. ग्लुटेन फ्री आहारात तृणधान्ये , प्रक्रिया न केलेलं ओट्स यासारखे पदार्थ कर्बोदकांचे कमतरता बाहेरून काढतात. अनेक ग्लुटेन फ्री पदार्थ त्यावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थ, सोडिअम आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
काही झटपट वजन कमी करणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये ग्लुटेन फ्री पदार्थ सर्रास वापरले जातात. अनेकदा सहा महिने किंवा त्याहून जास्त महिने अशा झटपट पावडरींचे सेवन केल्यानांतर कुपोषणाचे प्रमाण वाढलेले आढळून येते. अनेक संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे कि ग्लुटेन फ्री आहारामुळे आजारांचे प्रमाण कमी होत नाही. ज्यांना आतड्याचे विकार आहेत किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स, ग्लुटेन एलर्जी आहे त्यांच्यासाठीच ग्लुटेन फ्री आहार फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुमच्या नेहमीच्या आहारात ग्लुटेन असेल तर घाबरून जाऊ नका. तुमची पचनसंस्था ग्लुटेन पचवू शकत असेल तर ती उत्तम आहे !
जागतिक ग्लुटेन दिनानिमित्ताने ग्लुटेन बद्दल सजग होऊया आणि गैरसमजांपासून दूर राहूया