Health Special: शरदातला (ऑक्टोबर हिटचा) उष्मा कमी होऊन हळुहळू थंडीचा सुगावा लागू लागला की, समजावं की हेमंत ऋतू सुरू होत आहे. प्रत्यक्ष थंडी सुरू होण्याआधी काही लक्षणांवरुन थंडीचे आगमन ओळखता येते. त्यातले महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. तुमच्या शरीराची त्वचा कोरडी पडू लागली की, समजावे लवकरच थंडी येणार आहे. त्यातही या दिवसांत पायांची त्वचा अधिक कोरडी पडते. हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यांचा संधिकाळ आहे, म्हणजे ऑक्टोबर हिटचा उष्मा संपतानाचा आणि डिसेंबरची थंडी सुरू होतानाचा संगमकाळ. त्याबद्दल या लेखात जाणून घेऊ!

यमदंष्ट्रा काळ

शरद आणि हेमंत या ऋतूंच्या संधिकाळाला आयुर्वेदाने नितांत महत्त्व दिलेले आहे, त्याला ‘यमदंष्ट्रा’ म्हटले आहे. कोणत्याही दोन ऋतूंचा संधिकाळ हा आरोग्यासाठी हितकर नसतोच, तसाच तो या शरद व हेमंत या उभय ऋतूंचा सुद्धा नाही. मात्र या ऋतू संधिकाळाला आपल्या आरोग्य- परंपरेने यमदंष्ट्रा संबोधून त्याचे गांभीर्य आपल्याला सांगितले आहे.

हे ही वाचा… Methanol Poisoning : मिथेनॉल विषबाधा म्हणजे काय? मद्यपानामुळे विषबाधा होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

॥यमदंष्ट्रा स्वसा च प्रोक्ता॥

या सूत्राचा अर्थ होतो यमदंष्ट्रा काळ हा वैद्य- डॉक्टरांसाठी बहिणीसारखा आहे. यमदंष्ट्रा म्हणजे नेमका कोणता काळ?तर, कार्तिक महिन्याचे शेवटचे आठ दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिले आठ दिवस. या संधिकाळाला (या पंधरवड्याला) ‘यमदंष्ट्रा’ म्हणतात आणि हा पंधरवड्याचा काळ वैद्य व डॉक्टरमंडळीं साठी बहिणीसारखा आहे, असे आपली परंपरा म्हणते. का, तर या काळामध्ये आजार खूप वाढतात आणि रुग्णसंख्या वाढून वैद्यांचा व्यवसाय जोरात चालू लागतो, म्हणून बहीण जशी भावाची काळजी घेते, तसा मुबलक रुग्ण पुरवून वैद्यांची, त्यांच्या व्यवसायाची- चरितार्थाची काळजी घेणारा असा हा काळ आहे.

तापमानाशी जुळवून घेणे

शरद आणि हेमंत हे उभय ऋतू हे विसर्गकाळातले म्हणजे शरीराचे बल वाढवणार्‍या काळातले असले, तरी शरद हा उष्ण ऋतु आहे, तर हेमंत हा शीत. शरदात असतो ऑक्टोबरचा उष्मा, तर हेमंतात असतो हिवाळ्यातला थंडावा. साहजिकच या दोन ऋतूंचा संधिकाळ म्हणजे उष्मा आणि थंडाव्याचा संधिकाळ, जेव्हा उष्म्याकडून थंडाव्याकडे प्रवास होतो, जो रोगकारक होण्याची शक्यता दाट असते. वातावरणात,सभोवतालच्या तापमानात झालेला बदल शरीराला उपकारक होत नाहीच, कारण त्याआधीच्या वातावरणाशी- तापमानाशी शरीराने जुळवून घेतलेले असते. नवीन वातावरणाशी-तापमानाशी जुळवणे ज्या शरीरांना जमत नाही, झेपत नाही ती शरीरं आजारांना बळी पडतात.

हे ही वाचा… Fake Or Adulterated Butter: तुम्ही बनावट बटर तर खात नाही ना? खरं बटर कसं ओळखावं? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ टिप्स

आहारविहारात अचानक बदल नको

वातावरणातला बदल हळुहळू झाला, तर तो शरीराला काही प्रमाणात तरी सात्म्य (अनुकूल) होऊ शकतो, मात्र तसे न होता एक- दोन दिवसांत अचानक बदल झाला आणि उन्हाळा थांबून अकस्मात थंडावा सुरु झाला तर ते शरीराला उपकारक होत नाही. त्यात पुन्हा तुम्ही शरद ऋतूमधल्या उष्म्याला अनुरूप आहारविहार करत होतात; त्यात थंडी सुरु झाली म्हणून अचानक बदल केलात तर ते बदल शरीराला बाधक आणि रोगनिर्मितीला पोषक होतात. या दिवसांत आजार वाढतात ते याच कारणांमुळे आणि म्हणूनच या पंधरा दिवसांच्या काळाला यमाच्या दाढेमध्ये नेणारा या अर्थाने यमदंष्ट्रा काळ म्हटले आहे. त्यामुळे योग्य ती काळजी नक्की घ्या!