जीवनसत्त्वे मानवी शरीरातील चयापचयाच्या योग्य कार्यांसाठी आणि संपूर्ण आरोग्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक होय. काही जीवनसत्त्वे आहारातील स्रोतांमधून मिळू शकतात, परंतु काही जीवनसत्त्वांची उपलब्धता मर्यादित असू शकते. अशा परिस्थितीत, जीवनसत्त्वांच्या उत्पादनाच्या व साधनांच्या पर्यायी पद्धती महत्त्वपूर्ण ठरतात. अशी एक पर्यायी पद्धत म्हणजे सूक्ष्मजीवांपासून जीवनसत्त्वांचे संश्लेषण. बहुतेक वेळेस जेव्हा डॉक्टरांना जाणवते की, समोरील रुग्णास जीवनसत्त्वांची गरज आहे, तेव्हा त्यांच्या औषधयोजनेत मल्टी-व्हिटॅमिन कॅप्सूल, गोळ्या आणि आहारयोजनेत विविध जीवनसत्वयुक्त फळे असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवनसत्त्वांच्या उत्पादनांच्या मूलतः दोन पद्धती आहेत. रासायनिक पद्धतीने उत्पादित काही जीवनसत्त्वांची उदाहरणे म्हणजे जीवनसत्व अ (रेटीनील पाल्मिटेट), जीवनसत्व ब, आणि काहीवेळेस जीवनसत्व इ आणि के. तसेच किण्वन पद्धतीने अनेक जीवनसत्त्वांच्या व्यावसायिक उत्पादनासाठी सूक्ष्मजीवांचा यशस्वीपणे वापर केला जाऊ शकतो उदा. थायामिन, रायबोफ्लेविन (आशबय्या गॉस्सीपी, एरिमोथेशिअम उपजाती, इ., मार्फत), जीवनसत्व ब-१२ (स्ट्रेप्टोमायसिस, प्रोपिओनिबॅक्टेरियम, बॅसिलस, मायक्रोमोनोस्पोरा, ऱ्होडोसुडोमोनास इ. जीवाणूच्या प्रजातीच्या अनेक उपजातींमार्फत), बीटा-कॅरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) [ब्लेकस्लिया ट्रायस्पोरा, फ्लेव्होबॅक्टेरियम, ड्यूनालीयेलला उपजाती, इ. मार्फत], पायरीडॉक्सिन, फॉलिक आम्ल, पॅन्टोथेनिक आम्ल, बायोटिन, एस्कॉर्बिक आम्ल, , एर्गोस्टेरॉल (प्रो-व्हिटॅमिन डी). तथापि, आर्थिक दृष्टिकोनातून सूक्ष्मजीवांद्वारे जीवनसत्त्व ब-१२, रायबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि बीटा-कॅरोटीन तयार करणे व्यवहार्य आहे.

हेही वाचा… ‘मसल मेमरी’ म्हणजे काय ? शारीरिक तंदुरुस्तीसाठी कशी करते मदत ?

या दोन्ही पद्धतीने जीवनसत्त्वे उत्पादित करता येत असली तरीही त्यांचे निष्कर्षण आणि शुद्धीकरण करून कॅप्सूल किंवा टॅब्लेट रूपात ती घ्यावी लागतात. तसेच डॉक्टरांकडून थांबविण्याचा संकेत मिळेपर्यंत त्या गोळ्या घ्याव्या लागतात. चुकून एखादी मात्रा विसरल्यास मनात उगाच अपराधी भावना येत राहते. मग असे मनात येते की, अशी काही योजना अथवा उपाय आहे का की जेणेकरून या जीवनसत्त्वांच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत आणि आपोआप जीवनसत्त्वे आपल्या आतड्यांत तयार होतील आणि माणसांस सहज उपलब्ध होतील. तर या मनातील प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आहे. सूक्ष्मजीव शास्त्रातील सातत्याने सुरु असलेल्या या क्षेत्रातील संशोधनामुळे ते शक्य झाले आहे आणि अधिक विकसित होऊ लागले आहे विविध प्रो- बायोटिक्सच्या स्वरूपात.

हेही वाचा… एक महिना भात खाणे सोडल्यास शरीराची स्थिती कशी होते? फायदा की नुकसान? सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या

प्रो- बायोटिक्स म्हणजेच, जिवंत सूक्ष्मजीव जे काही प्रमाणात अंतर्ग्रहण केल्याने मूलभूत पोषणाच्या पलीकडे आरोग्यास फायदे देतात. मानवी आतड्यातील दोन जीवाणू जे सर्वात फायदेशीर प्रो-बायोटिकस मानले जाऊ शकतात ते म्हणजे लैक्टोबॅसिलस प्रजाती आणि बिफिडोबॅक्टर प्रजाती होत. असे जीवाणू लघु-शृंखलायुक्त मेदाम्ले आणि जीवनसत्त्वे तयार करतात. विशेषतः “ब” गटातील जीवनसत्वांची निर्मिती बहुतेक प्रो-बायोटिक्स करतात. आतड्यामधील काही लॅक्टोबॅसिलस प्रजातीचे प्रोबायोटिक्स रक्तातील जीवनसत्व “ड” ची मात्र वाढवितात. मानवी आतड्यातील काही जीवाणू “के” (K) जीवनसत्त्व संश्लेषित करतात व स्रवतात, जी आतड्यांतून सहजपणे रक्तात शोषिली जातात.

हेही वाचा… Health Special: Stress Test घ्यायची आहे, तर ‘हे’ करू शकता, तेही विनामूल्य!

बायफिडोबॅक्टेरियाच्या प्रजाती फॉलिक आम्लाची निर्मिती करतात. लैक्टोबॅसिलस बल्गेरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस नावाच्या जीवाणूंचे दोन विशिष्ट प्रकार अनेक योगर्टमध्ये वापरले जातात. घरी तयार केल्या जाणाऱ्या दह्यामध्ये साधारणपणे २५० विविध प्रकारच्या जीवाणूंचा समावेश सुमारे १०-३० दशलक्ष (कॉलनी फॉर्मिंग युनिट्स, CFU) जीवाणू /१०० मिली या मात्रेत असतो. ज्यात मुख्यत्वे लैक्टोबॅसिलस वर्गीय जीवाणूंचा (रायबोफ्लेविन जीवनसत्वाचा स्रोत) समावेश असतो. त्या तुलनेत काही लोकप्रिय प्रो- बायोटिक पेयांमध्ये सुमारे ६.५ अब्ज CFU प्रति बाटली असतात. परंतु यात केवळ एकाच जीवाणूच्या प्रजाती असतात. काही पेयांमध्ये २-३ प्रकारचे प्रो- बायोटिक देखील आढळतात.

अनेक प्रो- बायोटिक सप्लिमेंट्समध्ये (कॅप्सूलमध्ये) प्रति डोस १ ते १० अब्ज CFU असतात, परंतु काही उत्पादनांमध्ये ५० अब्ज CFU किंवा त्याहून अधिक असतात. बहुसंख्य वरील चर्चा केलेली प्रो-बायोटिक्स जीवनसत्त्वे समृद्ध आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सातत्याने काही महिने आपण ही प्रोबायोटिक्स खाल्ली अथवा प्यायलो की ही प्रोबायोटिक्स आपल्या आतड्यात त्यांच्या वसाहतींची निर्मिती करून तेथे स्थायिक होतात आणि ते आपल्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वांचे शाश्वत स्रोत असतात. मग आपण बाहेरून जीवनसत्त्वांच्या वापराबद्दल विचार करण्याची गरज भासत नाही. या प्रोबायोटिक्सच्या इतर फायदेशीर वैशिष्ट्यांसह ते जीवनसत्त्वांचे अखंड नैसर्गिक स्रोत म्हणून काम करतील. अशा प्रकारे या प्रोबायोटिक्सचा वापर करून आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता कायमची दूर करता येईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special how do our gut bacteria help with digestion hldc dvr
Show comments