वर्षा-ऋतुचर्येमध्ये जलप्राशनाबाबत आयुर्वेदाने दिलेला महत्त्वाचा सल्ला म्हणजे ‘अल्प जलपान’. अर्थात पावसाळ्यामध्ये पाणी पिण्यावर मर्यादा असावी. हे मार्गदर्शन आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्यावे, या सल्ल्याच्या विरोधात आहे, असे तुम्हाला वाटेल. मात्र दिवसभरातून ८-१० ग्लास पाणी प्यावे, हा एक सर्वसाधारणपणे दिलेला ढोबळ सल्ला झाला, जो प्रत्येक व्यक्तीला-प्रत्येक ऋतुकालामध्ये लागू होईलच असे नाही.
एक नियम तयार झाला म्हणजे तो सर्वांनाच सरसकट लागू करण्याची आधुनिक वैद्यकाची पद्धत योग्य नाही. उष्ण कटिबंधाच्या उष्ण वातावरणामध्ये परिश्रमाचे काम करणार्याला सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा तीन ते चारपटीने अधिक प्रमाणामध्ये पाणी प्यायला हवे, तर शीत कटिबंधामधील बर्फाळ वातावरणामध्ये एकाच जागी स्वस्थ बसून राहाणार्या व्यक्तीला वर सांगितल्यापेक्षा निम्मे पाणीसुद्धा लागणार नाही. हीच गोष्ट लागू होते, पावसाळ्यातील थंड-ओलसर वातावरणालासुद्धा!
हेही वाचा – माणूस अन्नाशिवाय जगू शकतो पण झोपेशिवाय नाही? वाचा, काय सांगतात तज्ज्ञ…
पावसाळ्यात जेव्हा शरीर वारंवार मूत्रविसर्जन करून शरीरामधील पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करीत असते, तेव्हा अकारण भरपूर पाणी पिणे योग्य नाही. मला सांगा, शेतीला तुम्ही जे पाणी देता ते जास्त प्रमाणात दिले तर काय होईल? तांदूळ-डाळ शिजवताना त्यामध्ये गरजेपेक्षा अधिक पाणी टाकले तर काय होईल? अहो, घरातल्या तुळशीच्या लहानशा रोपाला एक पेला जास्त पाणी टाकले तर तुळस मरू शकते. त्या तुळशीला तुम्ही उन्हाळ्यात जेवढे पाणी टाकता, तितकेच पावसाळ्यातसुद्धा टाकता का? नाही, मग मानवानेसुद्धा पाणी कोणत्या ऋतूमध्ये किती पाणी प्यायचे याचे काही नियम असले पाहिजेत की नाही? की, आधुनिक विज्ञान सांगते म्हणून थंडी-पावसाळ्यातसुद्धा दिवसाला दहा-बारा ग्लास पाणी प्यायचे?
हेही वाचा – महिनाभर मीठ सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…
महत्त्वाचे म्हणजे भूक-तहान या संवेदना या स्वतःच्या गरजेनुसार शरीर निर्माण करतेच की. उन्हाळ्यात वारंवार तहान लागते म्हणून भरपूर पाणी प्यावे. मग जेव्हा पावसाळ्यात तहान मर्यादेत लागते, तेव्हा पाणीसुद्धा मर्यादेत प्यावे, हा सल्ला योग्यच म्हणायला हवा. सुश्रुतसंहितेमध्ये तर स्पष्ट शब्दात पावसाळ्यात अतिजलपान टाळावे, असा सल्ला दिलेला आहे. इथे नेमक्या कोणत्या आजारांमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण मर्यादेत ठेवावे, याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे, ते जाणून घेणे वाचकांना उपयुक्त सिद्ध होईल.
कोणत्या अवस्थांमध्ये व रोगांमध्ये पाणी कमी प्यावे?
• ज्यांची अन्नावरची वासना उडालेली आहे व ज्यांची भूक मंदावलेली आहे त्यांनी,
• ज्यांना अन्न व्यवस्थित पचत नाही त्यांनी,
• ज्यांना वारंवार तोंडाला लाळ सुटते त्यांनी,
• ज्यांच्या पोटामध्ये पाणी जमले आहे अशा जलोदर (ascites) या आजारामध्ये,
• ताप आलेला असताना,
• सर्दीने बेजार असताना,
• अंगावर सूज असताना (अंगावर सूज हे किडनीचे कार्य व्यवस्थित नसल्याचे निदर्शक असू शकते, त्यामुळे सूज असताना पाणी कमी पिण्याचा सल्ला योग्यच आहे, जो मूत्रपिंडाचे कार्य (kidney function) नीट नसताना दिला जातोच),
• शरीरावर व्रण (जखमा) असताना व त्या जखमा भरुन येत नसतील तेव्हा,
• त्वचाविकाराने ग्रस्त असताना,
• क्षय रोग झाला असेल तर,
• नेत्रविकारांमध्ये,
• मधुमेहाच्या रुग्णांनी
• स्थूल,चरबीयुक्त शरीराच्या लोकांनी आणि
• वर्षा ऋतुमध्ये (पावसाळ्यात) …कमी पाणी प्यावे.