Health Special: वर्षा ऋतू म्हणजे जून महिन्याचा उत्तरार्ध; जुलै महिना व ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध होय. वर्षा ऋतूत शरीराचे व्यवहार हळूहळू बदलत असतात. ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात शरीरातील वातदोष वाढलेला असतो. या बिघडलेल्या वातदोषाला वर्षा ऋतूतील थंडाव्याची जोड मिळाली की, तो चेकाळतोच ! जोडीला मंदावलेली पचनक्रिया तर असतेच. वर्षा ऋतूचे वैशिष्ट्य म्हणजे या ऋतूत पित्तसंचयाला सुरुवात होते. त्यामुळे वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक आजार उद्भवू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवं पाणी बाधतं

तळ्यात, विहिरीत, तलावांवर नवे पाणी येते. नवे पाणी म्हणजे जमिनीवरील सर्व मलमूत्र आपल्यासोबत वाहून आणणारे पाणी. रोगजंतूंचा भरपूर साठा असणारे पाणी, यशिवाय पावसाबरोबर माश्याही वाढतात. पाणी व अन्नपदार्थांवर घोंघावणाऱ्या माश्यांचा उपद्रव, त्यामुळे हगवणीसारखे आजार, उलट्या-जुलाब सुरु होतात. पोट बिघडणे, गॅस धरणे, आव पडणे अशा तक्रारी या काळात सुरु होतात. यालाच आपण म्हणतो, “नवं पाणी बाधलं!”.

हेही वाचा – काळी मिरी, हळदीसह सद्गुरूंनी सांगितलेले हे ४ उपाय केल्यास कफ पटकन पडेल बाहेर; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा

पोटाच्या वाढत्या तक्रारी

सर्व डॉक्टरांकडे जास्त रुग्ण हे पोटाच्या तक्रारीचे असतात. उघड्यावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे वर्षाऋतूत अनेकांचे पोट बिघडत राहतं. पावसाळ्याच्या सुरुवातीला आभाळ भरुन येते, गार वारा सुटतो. त्यामुळे या पावसाच्या थंडीवाऱ्यात सांधेदुखी बळावते. पन्नाशी उलटलेल्या लोकांचे सांधे कुरकुरायला लागतात. गारठा व पावसात भिजणे यामुळे सर्दी- पडश्याला आमंत्रण मिळते. या थंड वातावरणात दमेकऱ्यांचा दमादेखील बऱ्याचदा बळावला जातो. शिवाय पावसात आपण वापरतो प्लास्टिक चपला व प्लास्टिकचे बूट, या प्लास्टिक बुटात पाणी साचून रहिल्याने पायाला बोटांच्या मध्ये चिखल्या होऊ लागतात.

लेप्टोस्पायरोसिसचा धोका

पावसाळ्यात पावसाचे पाणी जिथे- तिथे साठून राहते. या साठलेल्या पाण्यात उंदीर तसेच कुत्र्या- मांजरांचे मलमूत्र मिसळले जाते. पावसाच्या पाण्यात चालल्यास व शरीरावरील जखमेत पाणी गेल्यास व पावसाचे पाणी अनावधानाने पोटात गेल्यास लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. सर्व रुग्णालयात पावसाळ्यात प्रचंड गर्दी असते. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, ताप व इतर आजार असतात. हे सर्व आजार लवकर औषध घेतल्यास बरे होतात, पण याकडे दुर्लक्ष केल्यास जीवघेणेही ठरू शकतात.

हेही वाचा – पाण्यातील व्यायामाने राहा तंदुरुस्त; पोहता येत नसेल तरी करता येतील असे चार व्यायामांचे जबरदस्त फायदे

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

१) पायात चप्पल न घालता अजिबात फिरु नये.
२) दुपारची झोप या ऋतूत शक्यतो टाळावी.
३) पायात चिखल्या होऊ नये म्हणून पाय कोरडे ठेवावेत. त्यांना पावडर लावावी.
४) पायाला निलगिरीचे तेल वा वेखंड, कापूर याने सिद्ध तेल वापरावे. हातापायाच्या तळव्यांना हे वापरावे.
५) घरामध्ये हवा शुद्धीसाठी चंदन, वाळा, कापूर, उद यांचा धूप करावा.
६) साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये. मुलांना तर बिलकूलच डुंबू देऊ नये.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special how to maintain health in rainy season hldc ssb