पल्लवी सावंत- पटवर्धन
“मी गेले काही दिवस योगा करतेय!”
“ग्रेट! किती वेळ ?”
सुरुवात १० मिनिटांनी केली, आता सूर्यनमस्कार सुरू केलेत.”
“ओके आणि खाण्याचं कसं काय :
मी शक्यतो सकाळी उपाशीपोटी करते, त्याने थोडं हलकं वाटतं”
“उत्तम!”
“पण हे योगा जरा स्लो आहे.”
“योगा म्हणजे लक्ष केंद्रित करून आसन करणे. शरीरात योग्य ऊर्जा आणि संयम राखत आरोग्य राखणे!”
“हो प्रयत्न तोच आहे. मी आता पूर्ण शाकाहारी होऊ का?”
“आधी आपण बॅलन्स तयार करू, एकदम शाकाहारी होणं आवश्यक नाहीये.”
मीनलच्या आयुष्यात नव्यानेच योगा सुरू झालं होतं आणि फक्त अनुलोम-विलोमवरून सूर्यनमस्कार करण्याचं तिने मनावर घेतलं होतं. योगा केलं म्हणजे शाकाहारी व्हाच, असा गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे.
‘जागतिक योग दिन’ असल्यामुळे आजच्या लेखात योग आणि आहार नियमन याबद्दल थोडंसं जाणून घेऊ या. योगा म्हणजे शरीर, मेंदू, भावना आणि आत्मा यांचं संघटन. आहाराबाबत संतुलित आहार हे प्रमाण सगळ्याच शाखांमध्ये वापरलं जातं. क्रीडापोषणशास्त्रामध्ये तुम्ही ज्या प्रकारचा व्यायाम करता, जितका वेळ, ज्या क्षमतेने व्यायाम करता त्याप्रमाणे आहारातील ऊर्जेचे प्रमाण राखणे आवश्यक आहे.
हेही वाचा… आठ तास लॅपटॉपसमोर असताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावली असेल तर काय होईल? तज्ज्ञांचं उत्तर वाचा
विशेषतः योगिक पद्धतीप्रमाणे आहाराचे तीन प्रकार मानले जातात. सात्त्विकः ज्या आहारात सगळ्या पोषणतत्त्वाचं योग्य संतुलन राखलेलं आढळून येतं त्याला सात्त्विक आहार म्हणतात. पौष्टिक, ताजे अन्नपदार्थ आहारात समाविष्ट केले जावेत. आहार संतुलित असणं या आहारपद्धतीत महत्त्वाचं मानलं जातं. शक्यतो वनस्पतिजन्य पदार्थांवर या आहारपद्धतीत भर दिला जातो. पदार्थ: ताजी फळे, भाज्या, कंदमुळे, कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध राजसी : शाकाहारी पदार्थांसोबतच या आहारपद्धतीमध्ये कडू, तुरट, गोड चवीचे पदार्थ समाविष्ट केले जातात. या आहारामुळे भावना काही प्रमाणात प्रखर करणं हा आहे.
हेही वाचा… Health Special: थंड प्रदेशात पर्यटनासाठी जावे की, न जावे?
तामसी: ज्या आहारपद्धतीत मांसाहार, तळलेले पदार्थ, खारट पदार्थ, बटर अशा स्निग्ध पदार्थांचा, कार्बोनेटेड द्रव्यांचा समावेश असतो त्याला तामसी आहारपद्धती मानले जाते. तामसी आहारपद्धती अनेकदा चयापचयाचा वेग मंदावू शकते. या तिन्ही पद्धतींचा अभ्यास करताना या तिन्ही प्रकारांत तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात आढळून येतात. जीवनसत्त्वांचे प्रमाण साधारणपणे समान असते. राजस आहारात ब जीवनसत्त्वांचे प्रमाण मुबलक आढळून येते आणि काही शोधनिबंधानुसार आहारातून तामसी पदार्थ कमी करून सात्त्विक आणि राजस आहारपद्धती अवलंबिणे आवश्यक आहे.
योगिक आहारपद्धतीमध्ये कोणताही पदार्थ चांगला किंवा वाईट असे मानले जात नाही. यातील दोन महत्त्वाचे नियम आहेत.
१. ताजे तयार केलेले अन्न खावे.
२. जास्त वेळ साठवून ठेवलेले रासायनिक अभिक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे.
त्याचप्रमाणे योगिक आहारपद्धतीमध्ये मुबलक फळ, भाज्या, तृणधान्ये, कडधान्ये यांचा समावेश करायलाच हवा. योगा नियमित करणाऱ्या व्यक्तींचा आहार अभ्यास केल्यास असे आढळून आले आहे की आहारनियमनाचे तंत्र व्यवस्थित पाळले जाते. योगासने नियमित पाळल्यास आपण आपल्या मेंदू आणि चयापचय क्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या संप्रेरकांचे संतुलन अबाधित ठेवण्यास मदत होते. योगासनं करताना विशेषतः सकाळच्या प्रहरी करावीत.
ज्याप्रमाणे योगासनांची वेळ, तीव्रता वाढत जाईल त्याप्रमाणे आहारात बदल करणे जरुरीचे आहे. ज्यांना हार्मोन्स (संप्रेरकांचा असंतुलन) आणि त्या संदर्भातील असंतुलनाचा विकार असल्यास योगा कायम फायदेशीर आहे. पहाटेच्या वेळी योगासनं उपाशीपोटी जरूर करावीत. मात्र योगासनांनंतर योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि योग्य प्रमाणात संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
आज ‘जागतिक योग दिवस’ आहे. यानिमित्ताने आपलं आहारचक्र संतुलित, नेमकं आणि क्रमाने पाळलं जाईल, असा संकल्प करू या.
- वज्रासन
- बद्धकोनासन
- ऊर्ध्व प्रसारिता पदासन
यासारखी आसने विशेषतः जेवणांनंतर विशेष उपयोगी आहेत.