उन्हाळ्यातली सुट्टी ही शाळा-कॉलेजना मिळणारी मोठी सुट्टी असते. पूर्वी लोक आपल्या मामा-काकाच्या गावी जायचे, ते या उन्हाळ्यातल्या सुटीमध्येच. या कारणास्तव आणि उन्हाळ्यातला उकाडा सहन होत नाही म्हणूनसुद्धा या दिवसांत लोक सहलीला जातात. त्यात मागील काही वर्षांपासून लोकांना उंचावरील देवळाप्रमाणेच किल्ले व डोंगर पाहायला आवडू लागले आहेत. शिवाय, हल्ली पावसाळी सहलीचाही ट्रेण्ड सुरू आहेच.
सहलीला (म्हणजे टूरला) जाऊन तुम्हाला डोंगर चढून जावा लागणार असेल वा तुम्ही एखादे असे देऊळ पाहायला जाणार असाल; जिथे तुम्हाला काही शे वा, काही हजार पायर्या चढाव्या लागणार असतील किंवा तुमच्या टूरमध्ये एखादा उंच डोंगरावरचा किल्ला चढून जाण्याचा बेत असेल, तर तुम्हाला त्याची तयारी सहलीला जाण्याच्या काही दिवस आधीच करावी लागेल. एका रम्य दिवशी आम्ही आमची बॅग भरली आणि निघालो वर सांगितलेल्या सहलीला… असे करणार असाल, तर तुमचं काही खरं नाही.
हेही वाचा… Health Special: योगिक आहारपद्धती म्हणजे काय?
एक मजला चढण्यासाठी सरासरी १८ पायर्या चढाव्या लागतात. याचा अर्थ दोन मजले म्हणजे ३६ पायर्या आणि चार मजले म्हणजे ७२ पायर्या. सर्वसामान्य माणसाला सराव नसेल, तर चार मजले सहजगत्या चढणे शक्य नाही. आता महाराष्ट्रातील आणि देशामधील काही प्रसिद्ध मंदिरे व किल्ल्यांच्या पायर्या किती आणि त्या तेवढ्या पायर्या चढताना तुम्ही प्रत्यक्षात किती मजले चढणार याचा विचार करू. त्याशिवाय तुम्हाला तुमच्या शरीराला होणारा त्रास समजणार नाही.
इथे कोणी म्हणेल, याचा अर्थ देवळांमध्ये आणि किल्ल्यावर जायचंच नाही का? तसं नाही. हे खरं आहे की, आज देवळामध्ये जाण्याच्या निमित्ताने आपली संस्कृती लोकांसमोर येते. किल्ल्यांवर आपल्या पूर्वजांचा पराक्रम व गौरवशाली इतिहास त्यांना समजतो. याशिवाय सर्वच देवळे उंच डोंगरावर बांधण्यामागे पूर्वजांच्या डोक्यातसुद्धा काही सकारात्मक हेतू होतेच.
ते हेतू म्हणजे लोकांना (विशेषतः स्त्रियांना) घरातून बाहेर काढणे (जे जुन्या काळात सहज शक्य नव्हते), कुटुंबाला एकत्रित प्रवासाची मजा अनुभवायला मिळणे व नकळत कुटुंबाची वीण घट्ट करणे, आपल्या नित्याच्या प्रदेशामधून दूर नेऊन लोकांना अन्य प्रदेशामधील प्रवासाचा आनंद देणे, वेगळ्या प्रदेशाचे दर्शन घडवणे, विविध प्रदेशांमधील निसर्ग, प्राणी-पक्षी वगैररेची माहिती मिळणे, भिन्न-भिन्न प्रदेशामधील लोकांना परस्परांच्या संपर्कात आणणे, विभिन्न प्रदेशामधील लोकांच्या भाषा, पेहराव, आहार, सवई, परंपरा ज्ञात होणे, देशामध्ये नकळतपणे एकत्वाची भावना रुजवणे, धर्म व संस्कृतीचा प्रवाह अव्याहत सुरू ठेवणे आणि महत्त्वाचा हेतू हा की, लोकांचे स्वास्थ्य ठणठणीत ठेवणे.
हेही वाचा… आठ तास लॅपटॉपसमोर असताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावली असेल तर काय होईल? तज्ज्ञांचं उत्तर वाचा
उंचावरील देऊळ व किल्ल्यांच्या चढणीच्या निमित्ताने लोकांच्या शरीराला योग्य तो व्यायाम मिळत होता, उंचावरील शुद्ध हवा फुप्फुसांना मिळत होती. शरीराच्या स्नायूंची ताकद तपासली जात होती. हृदयाची पम्पिंगची क्षमता समजत होती. कारण- देऊळ वा किल्ल्यांवरील चढण ही त्या काळातली स्ट्रेस टेस्ट (Cardiac Stress Test) होती. एकंदरच देऊळ व किल्ल्यांचे पर्यटन हे तेव्हा सर्वांगीण भल्यासाठी होते आणि आजही त्यामुळे लोकांचे कल्याणच होते हे निश्चित. मात्र, वरीलपैकी सर्व हेतू आज २१ व्या शतकातही साध्य होत असले तरी स्वास्थ्य संवर्धनाचा हेतू काही साध्य होत नाहीसे दिसते. आजही ही विनामूल्य स्ट्रेस टेस्ट सहज उपलब्ध आहे, फक्त त्यासाठी घरातून बाहेर पडायला हवे!
पूर्वी म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी लोकांना दिवसभरातून काही किलोमीटर चालण्याची सवय होती, लहानसहान चढाव, टेकड्या ते नियमित चढत होते, वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने शरीराचे स्नायू-सांधे-हाडे यांना व्यायाम मिळत होता. एकंदरच त्यांच्या शरीराला परिश्रमाची सवय होती आणि आहार पोषक असल्याने बहुतांश लोकांची शरीरे सुदृढ होती. साहजिकच उंचावरील देऊळ किंवा किल्ला चढताना त्यांच्या शरीराला तितकासा त्रास होत नसे; किंबहुना त्यांना ते आनंददायी वाटत असे. तसे आजच्या लोकांचे नाही.
हेही वाचा… Health Special: थंड प्रदेशात पर्यटनासाठी जावे की, न जावे?
आधुनिक जगातील सोई-सुविधांचा अतिरेक व सर्वच बैठी कामे यामुळे लोकांच्या शरीराला व्यायाम असा मिळत नाहीच. त्यात आहार निकस असल्याने शरीरे सदृढ नाहीत. एरवी तुम्ही नित्यनेमाने लिफ्टचा वापर करत असल्यामुळे पायर्या चढणे होत नाही. कधी चुकून जिने चढण्याची वेळ आलीच तरी चढता ते कण्हत-कुथत! जिथे तुम्ही तुमच्या इमारतीचे चार-पाच मजलेसुद्धा चढत नाही, तिथे अचानक तुम्हाला काही शे वा काही हजार पायर्या कशा काय चढायला जमणार?
आपल्यातल्या अनेकांना जिने चढणे तर दूरच राहिले; पण दिवसभरातून हजारेक पावलेसुद्धा चालायची सवय नसते आणि अचानक उभाच्या उभा किल्ला चढायचा वा डोंगर चढून जायचा, हे कसे जमायचे? कोणतीही पूर्वतयारी न करता अशा चढाई कराव्या लागणार्या सहलीला गेलेल्यांना परतल्यानंतर गुडघेदुखी, कंबरदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, सायटिका वा पाठीच्या मणक्यांचे विकार सुरू झाल्याची एक नाही तर अनेक उदाहरणे मागील अनेक वर्षांपासून मी व्यवसायामध्ये पाहत आहे.
तुमच्या पायाचे घोटा-गुडघा व वंक्षण हे सांधे (Joints), पाऊल-पोटर्या-मांड्या-नितंब व कंबर यांचे स्नायु (Muscles) व संबंधित कण्डरा (Tenons) यांना एरवी तुम्ही कधीच वा फारसा व्यायाम देत नसाल आणि अचानक त्यांच्यावर इतका अतिरिक्त कामाचा भयंकर ताण पडणार असेल, तर त्यांना इजा होणार आणि ते कमजोर पडणारच! तेव्हा एक तर तुमची क्षमता नसेल, तर सहलीचे स्थळ असे निवडा; जिथे तुमच्यावर चढाई करण्याची वेळच येणार नाही आणि तुम्हाला अशा स्थळांनाच जायचे असेल, तर काही आठवडे (निदान दोन महिने) आधीपासून तुमच्यावर सांगितलेल्या अवयवयांना नित्य व्यायाम द्या, योगासने करा, चालण्याचा – चढाव चढण्याचा सराव करा, तुमची हाडे, सांधे, स्नायू, कंडरा यांच्यासाठी पोषक आहार घ्या. सहलीपूर्वीच तुमच्या त्या-त्या अंगांना सशक्त करा, सुदृढ बनवा. अन्यथा, तुमच्या त्या-त्या अंगाची विकृती ज्या दिवशी सुरू झाली, तो दिवस म्हणून तुम्ही ती सहल लक्षात ठेवाल.