Health Special: सन १९९१ पासून एक जुलै हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बी. सी. रॉय यांच्या आठवणीप्रित्यर्थ हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. रॉय हे स्वतः डॉक्टर तर होतेच, पण त्यासोबतच शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीयधुरीण देखील होते. १९५० ते १९६२ या काळात ते पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री होते. एक जुलै ही त्यांच्या जन्माची आणि मृत्यूचीदेखील तारीख. भारतरत्न या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना १९६१ साली गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आणि प्रेरणा म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. यावर्षीच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे घोषवाक्य आहे ‘हिलिंग हॅण्डस्, केअरिंग हार्ट्स’ अर्थात बरे करणारे हात आणि काळजी घेणारे हृदय. कोणत्याही डॉक्टरकडून हाताचे आणि हृदयाचे हेच गुणधर्म आपण प्रत्येक जण अपेक्षित करत असतो.

डॉ. रॉय केवळ डॉक्टर नव्हते, तर ते समाजासाठी अविरत कष्टणारे समाजधुरीण देखील होते. डॉ. रॉय हे महात्मा गांधींचे वैयक्तिक डॉक्टर आणि मित्र होते. बापूंचे ते केवळ मित्रच नव्हते तर त्यांच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून त्या वाटेने चालणारे एक सामाजिक कार्यकर्तेदेखील होते. गांधीजींच्या स्वराज या संकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. जोवर या देशातील लोक शरीराने आणि मनाने आरोग्यदायी आणि सशक्त होणार नाहीत, तोवर स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी डॉ रॉय यांची धारणा होती. एका अर्थाने जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी सर्वांगीण व्याख्या केली आहे, ती व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेपूर्वीच डॉ. रॉय यांना मनोमन उमगली होती. आरोग्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटना म्हणते,” आरोग्य म्हणजे केवळ आजारांचा किंवा रोगांचा अभाव नव्हे तर आरोग्य म्हणजे शारीरिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे.” 

हेही वाचा – तुम्हालाही ओठांना सतत लिप बाम लावण्याचे व्यसन तर नाही ना? काय होतात परिणाम? वाचा डॉक्टरांचे मत….

सन १९२५ मध्ये रॉय बंगाल विधिमंडळामध्ये निवडून गेले आणि जवळपास शंभर वर्षांपूर्वी त्यांनी विधिमंडळात हुगळी नदीच्या प्रदूषणाबद्दलचा एक अभ्यास मांडला आणि भविष्यात नद्यांचे प्रदूषण होऊ नये, याकरताची उपाययोजना देखील सुचवली. आज हवा, पाणी यांच्या प्रदूषणाने त्रस्त असूनही कृतीशून्य असणारे आपण शंभर वर्षांपूर्वी याची जाणीव होऊन त्याबाबत कृती करणाऱ्या रॉय यांच्याकडे पाहिले की, त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. आरोग्याची सर्वांगीण व्याख्या उमजलेल्या या माणसाने १९२९ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत देखील सहभाग घेतला आणि त्याकरता तुरुंगवास देखील भोगला. १९३१ मध्ये दांडी यात्रेच्या वेळी मात्र काँग्रेसने डॉ. रॉय यांनी तुरुंगाबाहेर राहून कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम करून तेथे आपले कार्य सुरू ठेवावे, असा निर्णय घेतला. त्यानुसार या काळात कलकत्ता शहरात मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, उत्तम वीज व्यवस्था आणि पाणीपुरवठा याबाबत खूप महत्त्वाचे आणि मूलगामी काम रॉय यांनी केले. या सगळ्या बाबी एका अर्थाने आपले आरोग्य निर्धारण करणारे सामाजिक घटक आहेत, याची कल्पना डॉक्टर रॉय यांना होती.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉ. रॉय यांना खरं म्हणजे पूर्णवेळ वैद्यकीय व्यवसाय करण्याची इच्छा होती परंतु महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार त्यांनी बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यावेळी बंगाल धार्मिक दंगली, अन्नाचा तुटवडा, बेरोजगारी, मोठ्या प्रमाणावर आलेले शरणार्थी यामुळे अक्षरशः समस्यांनी वेढलेला होता पण त्या काळात या डॉक्टरांनी मोठ्या हिमतीने आणि आपल्या मानवतावादी नेतृत्वाने बंगालला समस्यामुक्त करण्याचा प्रयत्न केला. 

डॉ. रॉय यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य आणि त्याचवेळी त्यांचे समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व याचे उत्तम उदाहरण म्हणजे, १९६१ सालची त्यांची अमेरिका भेट. या भेटीत ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांना भेटले आणि त्या भेटीत केनडी यांना पाठदुखीचा त्रास आहे हे डॉ. रॉय यांच्या वैद्यकीय नजरेने बरोबर हेरले. राष्ट्राध्यक्ष केनडी यांना ७९ वर्षांच्या या डॉक्टरच्या फिटनेसचे कौतुक वाटले, कारण त्यावेळी केनडी हे ४४ वर्षांचे होते आणि पाठदुखीने प्रचंड त्रस्त होते. त्यांनी डॉ. रॉय यांच्याकडून आपली तपासणी करून घेतली. त्यांना आपले रिपोर्ट दाखवले आणि त्यानुसार डॉ. रॉय यांनी त्यांना काही उपचार देखील लिहून दिले आणि तीन एक महिन्यात तुम्हाला पाठदुखीपासून आराम पडू लागेल, असा विश्वास डॉक्टरांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिला. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना मात्र डॉ. रॉय यांनी हसत हसत केनडींना विचारले, “माझी कन्सल्टिंग फी देणार की नाही?” त्यावर केनडीही हसत म्हणाले, “नक्कीच!” आणि त्यानंतर रॉय यांनी आपली जी कन्सल्टिंग फी मागितली तीही त्यांच्या आपल्या देशावरील प्रेमाची निदर्शक आहे. रॉय यांनी कलकत्ता शहराच्या विकासासाठी जो आराखडा आखला होता तो पूर्णत्वाला नेण्यासाठी अमेरिकन अध्यक्षांकडे तीनशे कोटींचा निधी आपल्या कन्सल्टिंग फीच्या रुपाने मागितला. केनडी यांनीदेखील यातील समाजहित लक्षात घेऊन ही अव्वा की सव्वा कन्सल्टिंग फी मान्य केली आणि फोर्ड फाउंडेशनच्या मदतीने कलकत्त्याचा विकास आराखडा अंमलबजावणीचे काम सुरु झाले.

हेही वाचा – सूर्योदयाच्या ४५ मिनिटांपूर्वी उठल्याने खरंच शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते का?

बारा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत देखील डॉ. बी. सी. रॉय रोज काही वेळ गोरगरीब पेशंटना तपासत असत. अगदी १ जुलै १९६२ ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, त्या दिवशीदेखील मुख्यमंत्री असलेल्या डॉ. बी सी रॉय यांनी आपल्या क्लिनिकमध्ये काही पेशंटला तपासले होते. खरा डॉक्टर हा गरीबांचा वाली असतो, रक्षणकर्ता असतो, हे डॉ. रॉय आपल्या जगण्यातून पटवून देत होते. असा हा खऱ्या अर्थाने डॉक्टर असणारा माणूस आपल्या राष्ट्रीय डॉक्टर दिवसामागे प्रेरणा म्हणून उभा आहे. त्यांना आदरांजली वाहत असताना ज्या सर्वांगीण आरोग्याचे स्वप्न डॉ. रॉय यांनी पाहिले ते आपणही जोपासण्याची गरज आहे. व्यक्तीला केवळ शारीरिक व्याधीपासून मुक्त करणे पुरेसे नाही. आपले सामाजिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आपण समाज म्हणून एकसंध असणं, एकमेकांमध्ये बंधूभाव राहणं, या देशातली आर्थिक विषमता, गरिबी, अडाणीपणा कमी होणे, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची समान संधी मिळणे, जातीधर्माच्या नावाखाली कोणालाही विषमतेची वागणूक न मिळणे, प्रत्येक माणसाला शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, घर या मूलभूत सुविधा मिळणे हे सगळे आरोग्याचे घटक आहेत. वैद्यक हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि राजकारण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एका मोठ्या कॅनव्हासवरील वैद्यकशास्त्रच आहे, हे समजावून घेऊन आपण पुढे चालत राहिलो तर डॉ. बी सी रॉय यांच्या वाटेने ‘सर्वांसाठी आरोग्याच्या’ गावाला जाऊन पोहोचू, हे नक्की !