Health Special: अनघा आणि विशालची ओळख डेटिंग अॅपवर झाली. कॉफी डेट ठरली, नियमित भेटी सुरु झाल्या. दोघंही एकमेकांना क्लिक् झाले होते. डेटला जाणं, ओझरते स्पर्श यापुढे जावं असं विशालला वाटत होतं, पण विचारायचं कसं हे कळत नव्हतं. एक दिवशी त्यानं अनघाला किस केलं. पण तिची रिअॅक्शन काहीशी थंडच होती. आपण फार चटचट पुढे जातोय असं तिला वाटत होतं. गप्पा, चॅटिंग, भेटी, कॉफी, सिनेमे यात बरेच महिने गेले. पुढे जावं की नाही हे विशालला समजत नव्हतं. तिकडे अनघाही कन्फ्युज होती. कारण प्रत्यक्षात जरी ते एकमेकांना डेट करत असले तरी त्यांची आपापली वेगवेगळी ऑनलाईन सिरिअस रिलेशनशिप्सही सुरु होती. ते दोघंही त्या ऑनलाईन डेट्सना प्रत्यक्ष भेटले नव्हते पण त्यांच्याशीही इंटेन्स गप्पा सुरु होत्या. त्यामुळे प्रत्यक्षातल्या डेट बरोबरचं नातं पुढे न्यायचं की ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तीबरोबरच याबाबत गोंधळलेली अवस्था दोघांचीही होती.
हे सगळं इतकं सविस्तर लिहिण्याचं कारण व्हर्च्युअल जगातली सिक्रेट रिलेशनशिप्स हा अतिशय गुंतागुंतीचा प्रकार आता पुढे येऊ लागला आहे. अशी नाती सर्व वयोगटातील आणि सर्व लैंगिक अग्रक्रम असलेल्या व्यक्ती करु बघतायेत. तरुणाईमध्ये याचं प्रमाण विशेष आहे. एका नात्यात असताना माणसे अनेक नाती तयार करत आहेत. सोशल मीडियामुळे ते सहज शक्य आहे. सोशल मीडिया जगाशी आपल्याला कनेक्ट करता करता एकलकोंडा करतोय. आपलं सारं जग आपल्या स्मार्ट फोनमध्ये व्यापून गेलेलं आहे. आपलं मनोरंजन, आपली बँक, आपलं सोशलायझिंग, आपले मित्र, गप्पा असं सगळं एका स्मार्ट फोनमध्ये आहे. त्यामुळे आपलं सगळं लक्ष त्या स्मार्टफोनमध्येच लागलेलं असतं ज्यामुळे आपण आपल्याही नकळत स्वतःला एकलकोंडे करून घेतो. याच एकटेपणात नातीही तयार होतात. आणि प्रत्यक्ष नात्यांपेक्षा हे खूप सोपं वाटतं. एकापेक्षा जास्त गहिरी नाती तयार करणाऱ्या तरुण तरुणींशी बोललं की ते सहज सांगतात, “हॅण्डल करायला सोपं जातं. आपण आपल्या फोनमध्ये काय करतोय हे कुणाला कळत नाही. शिवाय भेटायला जा, गिफ्ट्स द्या. कमिटमेंट करा या सगळ्यापासून लांब राहता येतं. अशी नाती सिक्रेटली मस्त डेव्हलप करता येतात.”
हेही वाचा >>>१०० ग्राम ‘स्वीट कॉर्न’ डायबिटीस रुग्ण व गर्भवती महिलांना कोणते फायदे व तोटे देऊ शकतो? तज्ज्ञांनी दिलं उत्तर
अनेकांच्या मते ही नाती टिकवणं सोपं जातं कारण त्यात एकनिष्ठतेच्या कल्पना गुंतलेल्या नसतात. अर्थात हेही व्यक्तीसापेक्ष आहे. मुळात व्हर्च्युअल जगातली सिक्रेट नाती ही म्हटली तर सोय आहे आणि म्हटलं तर फक्त भास. दोन्ही बाजूंनी गुंतायचं नाही असं ठरवलेलं असेल तर गोष्ट वेगळी पण दोघांपैकी एक जण जरी गुंतला तरी गोंधळ वाढणारच आहे. व्हर्च्युअल जगातली सिक्रेट नाती दर वेळी आनंद देतात असंही नाहीये. काहीवेळा या नात्यातून फसवणूक होते. ह्युमन ट्रॅफिकिंगपासून सेक्सटॉर्शनपर्यंत अनेक सायबर गुन्हे घडू शकतात. अशावेळी आपण जी नाती तयार करतोय ती धोका देणारी नाहीयेत ना, समोरची व्यक्ती त्याने सांगितलं ते सगळं खरं आहे ना हे न तपासता त्यावर विश्वास ठेवणं धोकादायक असू शकतं. तरुण- तरुणींना याची कल्पना असणं फार आवश्यक आहे, कारण अशी नाती तयार करण्याचं आकर्षण त्यांच्यात प्रचंड आहे पण आभासी जगात खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असू शकतात.
मुक्ता चैतन्य
संस्थापक, सायबर मैत्र