Health Special गुरू ही संकल्पना आपल्या देशात फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. स्वतःचे घर सोडून ज्ञान संपादनासाठी गुरुगृही जाऊन राहणे ही आपली परंपरा. अशा वेळेस अर्थातच केवळ विद्या प्राप्त होत नसे तर शिष्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाकडे गुरुचे लक्ष असे. विशिष्ट विद्या आणि त्याबरोबरच आयुष्याला सामोरे जाण्याचे बळ मिळवून शिष्य गुरुगृहातून परत येत असे. वैयक्तिक आयुष्य सुरू केले तरी गुरुविषयी ऋणभावना मनात कायम राही. तसेच आयुष्यातल्या अवघड वळणावर गरज पडल्यास पुन्हा एकदा गुरूकडे धाव घेण्याचीही मुभा होती. एकदा गुरू शिष्याचे नाते निर्माण झाले की ते कायम टिकत असे.

कोणाचा शागीर्द?

विद्यार्जनाप्रमाणेच अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर ‘गुरू करणे’ आवश्यक असते. संत परंपरेमध्येही गुरूला महत्त्व आहे. त्यामुळेच चांगदेवाचे गुरू नामदेव, नामदेवांचे गुरू ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथ अशी गुरू शिष्य परंपरा आपल्याला दिसून येते. कलेच्या क्षेत्रात आजही गुरू शिष्य परंपरा कायम दिसते. एखादा उत्तम गाणारा ‘कोणाचा शिष्य किंवा शागीर्द’ याची चर्चा असते. वर्षानुवर्षे गुरुकडून कला अवगत करण्यासाठी धडपडणारे अनेक आजही आपल्याला दिसतात. ही परंपरा मात्र केवळ आपल्याच देशात नाही तर जगभरात दिसून येते.

cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Anurag dead body, post-mortem, custody,
शवविच्छेदनानंतर अनुरागचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
protest against Badlapur School Sexual Abuse Case
…‘या’ जखमा सायकल चालविल्याने झाल्या असतील! बदलापुरातील शाळा मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा
What happened to South Asian University after the Chomsky case
‘चॉम्स्की प्रकरणा’तून साउथ एशियन युनिव्हर्सिटीचे काय झाले?
Kolkata Rape Case : “…तर माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नका”, कोलकाताच्या रुग्णालयातील नव्या प्राचार्यांचा पहिल्याच दिवशी संताप!
Loksatta kutuhal Kevin Warwick British Cybernetics researcher Vice Chancellor of Coventry University
कुतूहल: केविन वॉरविक
nashik zilla parishad students uniform
नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

हेही वाचा – Health Special: लसूण आणि ग्लास स्किन, खरंच फायदा होतो का?

गुरूंचे महत्त्व

गुरुची छाप शिष्याच्या हावभावांमध्ये, वागण्यामध्ये, विचार करण्यामध्ये सगळ्यात दिसते. असा गुरूचा शिष्यावर प्रभाव असतो. आपल्या ज्ञानाची, विचारांची, कलेची, नैपुण्याची तसेच अध्यात्मिक शक्तीची पुढली पिढी गुरू घडवत असतो आणि त्यातूनच अनेक विद्या, कला, अध्यात्मिक ज्ञान यांचे जतन होते. फार पूर्वीपासून आपण गुरुचे महत्त्व जाणले आणि गुरूला समाजात स्थान दिले. आजची स्थिती काय आहे? आज विद्यार्थी शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडे शिकतो. शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक असतात. क्रीडा क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षक असतात. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी शिकतात, परीक्षा देतात आणि पुढच्या टप्प्यावर पोहोचतात.

शिक्षक- विद्यार्थी नाते

शिक्षकी पेशा स्वीकारलेले विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान देतात. विद्यार्थी यातून आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे शिकतो आणि आयुष्यातल्या यशापयशाला एकटाच समोर जातो. काही शिक्षक मात्र केवळ शिकवण्याची दिलेली जबाबदारी पार पाडत नाहीत तर, अनेक विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे, त्यांना येणाऱ्या अडचणींकडे विशेष लक्ष पुरवतात आणि त्या त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात. असे दिसून येते की, अशा शिक्षकांची विद्यार्थ्यांवर छाप पडते आणि विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतात. तसेच या विद्यार्थ्यांची प्रगतीही चांगली झालेली दिसून येते. हे शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे गुरू होतात.

व्यक्तिमत्व विकासासाठी मेन्टॉर

केवळ एखाद्या विषयाचे ज्ञान मिळवणे पुरेसे नसते. त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले व्यक्तिमत्व घडवायचे तर कुणाचा तरी मदतीचा हात मिळणे आवश्यक असते. आजच्या इंटरनेटच्या युगात, जिथे माहितीच्या जाळ्याच्या आधारे कुठल्याही विषयात आपले ज्ञान वाढवता येते तिथे असा मदतीचा हात देणारे कोण? भले एखाद्या विषयात आपण पुरेसे शिकून तयार झालो, तरी आजच्या जीवनसंघर्षामध्ये कोणी मार्गदर्शक भेटला तर वाट सुकर बनते. शालेय विद्यार्थी दशेपासून, महाविद्यालयीन शिक्षणात आणि प्रत्यक्ष नोकरी व्यवसायाला लागल्यावरही अशा मदतीची गरज भासते. म्हणजेच असा मार्गदर्शक, सल्लागार हा आपला ‘आधुनिक गुरू (mentor)’ असतो. विशेषतः आजच्या शहरी जीवनामध्ये केंद्रित कुटुंबपद्धतीमुळे वडीलधाऱ्या नातेवाईकांशी सहज आणि नियमित संपर्क येत नाही. शेजारपाजारच्या किंवा परिचयाच्या माणसांशी सतत आणि वैयक्तिक संपर्क नसतो. आजच्या संघर्षमय आणि स्पर्धेच्या युगात आपली प्रगती साधताना मानसिक स्वास्थ्य टिकवायचे तर कोणीतरी मार्गदर्शक, सल्लागार मिळाला तर खूपच फायदा होतो. त्यामुळे अशा ‘गुरू’ चे स्थान आज अधिकच महत्त्वाचे ठरते.

आधुनिक गुरू

पुन्हा एकदा आजच्या युगात गुरूचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. आजच्या ‘आधुनिक गुरू’च्या संकल्पनेतही गुरू शिष्य नात्याचे तेवढेच महत्त्व आहे. Mentor या शब्दाचा उगमही एका प्राचीन ग्रीक कथेवर आधरित आहे. ओडीसीअस राजाने युद्धावर जाताना Mentor नावाच्या आपल्या मित्रावर आपल्या मुलाच्या शिक्षणाची, संरक्षणाची तसेच विकासाची जबाबदारी दिली होती. त्यावरून आजही तशी भूमिका पार पडणाऱ्या आधुनिक गुरूला ‘mentor’ म्हटले जाऊ लागले. हा आधुनिक गुरू कधी एखादा शिक्षक असतो, तर कधी आपल्या व्यवसायातील कुणी बुजुर्ग व्यक्ती असते. कधी कधी आपल्यापेक्षा पुढच्या वर्षांमध्ये शिकणारा एखादा विद्यार्थीसुद्धा गुरू बनू शकतो. आपल्याबरोबर काम करणारा आपला सहकारीसुद्धा ही भूमिका पार पडू शकतो. गुरू आणि शिष्य एकाच ठिकाणी असतील असेही नाही.

विद्यादानापलीकडे…

दूरच्या विद्यापीठातील प्राध्यापक एखाद्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करू शकतात. सतत भेटले पाहिजे असे नाही. विशिष्ट कालावधीनंतर गुरू शिष्याची प्रत्यक्ष भेट झाली तरी चालेल. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकमेकांशी दुरून संवाद साधणेही सहज शक्य असते. परंतु गुरू शिष्य नात्याचे गुणधर्म मात्र कायम राहतात. सद्गुरुचे वर्णन करताना असे म्हटले जाते की, सद्गुरुमुळे ज्ञान वाढीस लागते, शिष्याचे दुःख नाहीसे होते, आनंद निर्माण होतो, समृद्धी येते आणि शिष्याची प्रतिभा अभिव्यक्त होते. आजही गुरू हेच करताना दिसतात. म्हणजेच केवळ विद्या देणे हे गुरुचे कार्य सीमित नाही. आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले शहाणपण शिष्यापर्यंत पोहोचवणे हे गुरुचे काम असते. आज विविध शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि व्यावसायिक कंपन्या अशा अनेक ठिकाणी मुद्दाम अशा गुरुंची म्हणजेच mentor ची व्यवस्था केलेली असते.

भावी युवा पिढीसाठी

काही शाळांमध्येही शिक्षकांमध्ये ही जबाबदारी वाटलेली असते. स्वाभाविकपणे असा गुरू मिळाला तर आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होतेच. परंतु प्रत्येकालाच कोणी गुरुस्थानी भेटेल असे नाही. मग अशा कृत्रिम रचनेतून युवापिढीला मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली तर एक यशस्वी युवा पिढी निर्माण होईल असा या मागचा उद्देश आहे. हे गुरुशिष्याचे नाते परस्पर विश्वासावर आधारित असते. Mentor ला शिष्याला वेळ द्यावा लागतो. आपल्याकडील ज्ञान देण्याबरोबरच आपल्या कार्यपद्धतीतून एक आदर्श घालून देणेही महत्त्वाचे ठरते. अनुकरणातून खूप काही शिकता येते. विद्यार्थ्याला/ शिष्याला येणाऱ्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्याची जबाबदारीही गुरुची असते. या अडचणी केवळ ज्ञानार्जनातीलच असतील असे नाही. तर वैयक्तिक अडचणींवर मात करतानाही mentor ची मदत होते. आपल्या शिष्याला त्याची ध्येये ठरवताना, त्यांचा पाठपुरावा करताना, ते करत असताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाताना मदत करणे हे mentor चे काम असते. प्रत्यक्ष प्रत्येक विषयातील कौशल्य गुरूकडे असतेच असे नाही, पण योग्य दिशादर्शन करण्याचे काम मात्र गुरू करू शकतात.

हेही वाचा – हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांपासून दूर राहायचेय? मग तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ चार सवयी टाळा

मानसिक व भावनिक आधार

आपल्या शिष्याला मानसिक आणि भावनिक आधार देण्याचीही गुरुची जबाबदारी असते. वेळोवेळी आपल्या शिष्याच्या प्रगतीचा आलेख त्याच्यासमोर मांडणे, त्याला त्याच्या चुकांची, त्रुटींची जाणीव करून देणेही महत्त्वाचे असते. गुरुशिष्य नाते यातून अधिक बळकट होते. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर, उदा. विद्यार्थीदशेत किंवा नोकरीच्या सुरुवातीच्या काळात असा सल्लागार किंवा मार्गदर्शक भेटला तर हे नाते पुढेही कायम राहते. आपल्या शिष्याने कायमस्वरुपी आपली मदत घेत राहिली पाहिजे अशी गुरुची भूमिका असता कामा नये. किंबहुना आपला धरलेला हात सोडून शिष्याने आपली वाटचाल सुरु ठेवावी असा गुरूचा प्रयत्न असला पाहिजे. एकमेकांशी असलेले नाते कायमस्वरुपी असले तरी आपल्या शिष्याचा झालेला विकास पाहून गुरूला मिळणारा आनंद हाच खरा होय!

मेन्टॉर कोण?

शिष्य ज्याला आधुनिक युगात mentee म्हटले जाते आपल्या गुरुकडून बरेच काही शिकतो. पौगंडावस्थेत, तरुणपणी mentor (गुरू) मिळाल्याचे खूप फायदे असतात. जगभरात आज या वयोगटाला गुरू मिळावे यासाठी मुद्दाम योजना राबवल्या जातात. आजचे मध्यमवयीन, त्या त्या क्षेत्रातले याशस्वी लोक, बुजुर्ग मंडळी यांच्याबरोबरच सीनिअर विद्यार्थी, मित्र हेही अशी गुरूची (mentor) भूमिका निभावताना दिसतात. Mentoring मुळे युवकांचे परस्पर संबंध सुधारतात. कुटुंबातील तसेच मित्रमंडळीमधील नातेसंबंध सुदृढ होतात. प्रत्यक्ष फायदा म्हणून शैक्षणिक यश अधिक मिळते, नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी दिलेली लक्ष्ये साध्य करायला मदत होते. आत्मविश्वास वाढतो. चांगली स्व-प्रतिमा तयार होते. निर्णयक्षमता वाढते. काम करण्याची प्रेरणा मिळते. मानसिक बळ वाढते. संकटांना सामोरे जाताना एकटेपणाची भावना निर्माण होत नाही. मदत घेताना संकोच राहत नाही. कोणाच्या तरी सल्ल्याने प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास वाटतो. मानसिक आरोग्य टिकण्याच्या दृष्टीने या सगळ्याचा खूप फायदा होतो.

वाईट बाबी परस्पर टळतात…

अनेक चुकीच्या गोष्टींपासून पुढच्या पिढीला दूर ठेवण्याचे काम mentoring मधून होते. तरुण व्यसनाकडे वळण्याची शक्यता कमी होते. त्यांच्यातील आक्रमकतेसारख्या वृत्ती नियंत्रणात राहतात. चुकीची संगत लागत नाही. गुन्हेगारी वृत्ती बळावत नाही. त्यामुळेच समाजातल्या ज्या मुलांना लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले आहे अशांना mentoring चा निश्चित फायदा होताना दिसतो. युवपिढीचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास होण्याच्या दृष्टीने हे गुरू शिष्याचे नाते उपयोगी आहेच. गुरूलाही याचा फायदा मिळतो. आपले ज्ञान अत्याधुनिक करण्याची संधी मिळते. एक सुदृढ नाते तयार होते, जे गुरूलाही आधार देणारे असते. गेल्याच आठवड्यात यंदाची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेचे महत्त्व आजही तितकेच आहे हे या सगळ्यातून पटते. आज आपणहून कोणाचे तरी मार्गदर्शक गुरू (mentor) होणे, तरुण पिढीला विकासाच्या मार्गावर सहाय्यभूत ठरणे हे महत्त्वाचे आहे. आजच्या आधुनिक युगातील गुरुशिष्य परंपरेचाही हा आढावा याच आठवड्यात पार पडलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने.