उन्हाळ्यातल्या उष्म्याने घामाच्या धारा वाहात असताना आणि अंगाची काहिली होत असताना पाऊस पडू लागला की जो आनंद होतो, तो आपण सर्वांनीच अनुभवला आहे. या पहिल्या पावसाचे कौतुक काही औरच! कवी त्यावर कविता करतात, गजलकार गजला लिहितात आणि लेखक त्या प्रसंगाचे उत्कटतेने वर्णन करतात.
एकंदरच तो क्षण हुरहुर लावणारा असतो हे खरं. तर अशा या पहिल्या पावसामध्ये भिजायला कोणाला आवडणार नाही. थोरामोठ्यांना पहिल्या पावसात भिजण्याचा मोह आवरत नाही तिथे लहानग्यांचे काय, ते तर पावसात चिंब भिजायला तयारच असतात. गंमत म्हणजे त्यांच्या घरातलेसुद्धा त्यांना पहिल्या पावसात भिजायला प्रोत्साहन देतात ‘पहिला पाऊस अंगावर घेणे चांगले असते’ या विचाराने. मात्र प्रत्यक्षात याविषयी आयुर्वेदशास्त्र काय सांगते?
१) गुर्वभिष्यन्दि पानीयं वार्षिकं मधुरं नवम्।चरकसंहिता १.२७.२०३
चरकसंहिताकार आचार्य चरक यांच्यामते नवीन पावसाचे पाणी पचायला जड व अभिष्यन्दी (शरीरामध्ये ओलावा व सूज वाढवणारे असे) असते. शल्यचिकित्सक असलेल्या सुश्रृतांनी इसवी सनपूर्व दीडहजार वर्षांपूर्वी रचलेल्या सुश्रृतसंहितेमध्ये मानवी आरोग्यासाठी अयोग्य असलेल्या दूषित पाण्याचे वर्णन करताना वर्षा ऋतुमधील पहिल्या पावसाचे पाणी हे रोगकारक होऊ शकते, असा स्पष्ट इशारा दिलेला आहे.
२) योऽवगाहेतवर्षासुपिबेद्यापिनवंजलम्।सबाह्याभ्यान्तरान् रोगान् प्राप्नुयात् क्षिप्रमेवतु॥ सुश्रुतसंहिता १.४५.११
पहिल्या पावसातले पाणी हे विषसमान समजावे अशी सक्त ताकीद सुद्धा सुश्रृतांनी दिली आहे.
३) आर्तवं प्रथमं च यत् – तत् कुर्यात् स्नानपानाभ्यां…./अष्टाङ्गसंग्रह – १.६.२२,२३
काश्मीरमध्ये सहाव्या शतकात रचलेल्या अष्टांगसंग्रह या ग्रंथामध्ये आचार्य वाग्भट यांनी सुद्धा पहिल्या पावसाचे पाणी स्नानपानासाठी निषिद्ध सांगितले आहे.
४) ….तदा तोयमान्तरिक्षं विषोपमम् ׀ सुश्रुत संहिता ६.६४.५२
भावप्रकाश, हा आयुर्वेदामधील तुलनेने नवीन ग्रंथ, जो १६ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भावमिश्र नामक बिहारवासीय विद्वानाकडून लिहिला गेला. त्यामध्येसुद्धा या विषयाचे नेमके मार्गदर्शन केलेले आहे, ते पुढील शब्दांमध्ये – ‘पृथ्वीवर पडणार्या पहिल्या पावसाचे पाणी हे अपथ्यकारक असून आरोग्यासाठी हितकारक नसते.’
५) वार्षिकं तदहर्वृष्टं भूमिस्थंहितं जलम्׀ भावप्रकाश पूर्वखण्ड-वारिवर्ग, ५५
एकंदर पाहता आयुर्वेदातल्या इसवी सनपूर्व दीडहजार एवढ्या प्राचीन काळामध्ये रचलेल्या ते आपल्या देशाच्या इतिहासाच्या तुलनेमध्ये आत्ताच्या म्हणजे १६ व्या शतकात लिहिलेल्या आयुर्वेदीय ग्रंथांनी पहिल्या पावसात भिजू नये असाच सल्ला दिलेला आहे.
आयुर्वेदाने दिलेला हा सल्ला योग्यच म्हणायला हवा. कारण पावसाळ्याआधीच्या उन्हाळ्यामध्ये वातावरणाच्या वरच्या थरामध्ये धुळीचे सूक्ष्म कण जमलेले असतात. जेव्हा पहिला पाऊस पडतो, तेव्हा त्या पहिल्या पावसाच्या पाण्याच्या थेंबांमुळे ते धुळीचे कण (रजःकण) जमिनीवर पडतात. या सूक्ष्म रजःकणांवर असंख्य रोगजंतू निवास करत असतात.
हेही वाचा… Health Special: आषाढी एकादशी आणि उपवास- आहार कसा असावा?
असंख्य म्हणजे किती तर अब्जावधी, कारण धुळीच्या एका कणावर सरासरी दोन कटी रोगजंतू निवास करतात! साहजिकच पहिला पाऊस अंगावर घेताना, त्या रजःकणांबरोबर ते रोगजंतू आपल्या शरीरावर पडण्याची व त्यांमुळे रोगसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय आजच्या आधुनिक जगामध्ये हवेमध्ये सोडलेले-हवेत मिसळलेले प्रदूषण करणारे विविध घटक वातावरणामध्ये जमलेले असतात, ते पहिल्या पावसाबरोबर जमिनीवर येतात. त्या घातक प्रदूषक घटकांचाही शरीराशी संपर्क होण्याचा धोका पहिल्या पावसात भिजल्यामुळे निर्माण होतो.
पहिल्या पावसातील ते रजःकण व प्रदूषित घटक हे आरोग्याला अतिशय हानिकारक असल्याने, एकंदरच पहिल्या दिवशीचा पाऊस टाळणेच योग्य, त्या पावसात भिजण्याचा मोह कितीही होत असला तरी. भिजायचेच असेल तर पहिल्या पावसापासून निदान तीन दिवस थांबा, कारण तीन दिवस पाऊस पडून गेल्यानंतर पावसाचे पाणी अमृतासमान होते असाही सल्ला आयुर्वेदाने दिलेला आहे.