केतन अत्यंत चोखपणे व्यायाम करत होता आणि आणि मुख्यतः आजारांपासून दूर राहण्याइतपत उत्तम शारीरिक ऊर्जा बाळगणे हे त्याचे ध्येय होते. गेले काही महिने त्याला भरपूर तहान लागत होती आणि व्यायाम करताना अचानक थकवा येत होता . मी अर्थात विचारलं व्यायाम करताना पाणी पितोस का ? त्यावर तो अत्यंत विचारी चेहऱ्याने म्हणाला “नाही. मला माहितेय व्यायाम करताना पाणी पिऊ नये”.
मी विचारलं “कुठे वाचलंस?”
“मी अमुक अमुक व्यक्तीला फॉलो करतो त्यांनीच सांगितलंय, व्यायाम करताना पाणी प्यायल्यास शरीर सुस्त होत आणि आणखी थकवा येतो.” ज्या अमुक व्यक्तीबद्दल केतन सांगत होता, त्यांनी स्वतःवर काम करून अनुभव कथनाचा भाग म्हणून आहाराबाबत (अर्थातच) ज्ञान विषयक व्हिडीओ केलेले होते.
वस्तुस्थिती- खरं तर व्यायाम करताना थोडे थोडे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील क्षारांचे संतुलन राखले जाते, शिवाय चयापचय क्रियादेखील उत्तम राहते.
समाजमाध्यमांवर अशाच प्रकारचे ज्ञानामृत अनेकांकडून पाजले जाते. शिवाय अनेकांनी ते करून पाहिलेले असले तरी त्यांचे शरीर आणि तुमचे यात फरक तर असतोच. त्यामुळे प्रत्येकाला त्या गोष्टी तशाच लागू होत नाहीत. समाजमाध्यमांवरील समज- गैरसमजांबाबत आणखीही काही महत्त्वाच्या बाबी पाहूयात.-
गैरसमज- व्यायाम करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके खाऊ नयेत.
वस्तुस्थिती- व्यायाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठरावीक प्रमाणात कर्बोदके खाणे आवश्यक आहे, कारण शरीरातील प्रथिनांचे कार्य कार्बोहायड्रेटच्या अस्तित्वामुळेच आकार घेऊ शकते. मग ती धान्ये असोत, फळे किंवा भाज्यांही असोत.
गैरसमज- व्हिटामिन्समधून शरीराला ऊर्जा मिळते.
वस्तुस्थिती- जीवनसत्त्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स शरीराला ऊर्जा नव्हे तर योग्य प्रकारे ऊर्जेच्या वापरासाठी मदत करतात. पेशींचे आरोग्य वाढविणे, पेशींच्या आवरणाचे कार्य सुरळीत करणे, रक्तातील पोषणमूल्यांचे कार्य सुलभ करणे अशी विविध कामे जीवनसत्त्वे करत असतात. मात्र ऊर्जेसाठी कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यावरच आपण अवलंबून राहायला हवे.
गैरसमज- केवळ ताजी फळे किंवा भाज्या खाल्ल्यानेच तुम्हाला उपयुक्त पोषणमूल्य मिळू शकतात.
वस्तुस्थिती- ताजी या शब्दानुरूप अर्थ ठरवायचं झाला तर थेट झाडावरून हातात असाच अर्थ घ्यावा लागेल. आपण बाजारातून फळे विकत आणतो- ती धुतो आणि त्यानंतर त्यांचा आहारात समावेश करतो- यादरम्यान त्यातील जीवनसत्त्वे कमी होत नाहीत. त्यामुळे फळे आणून जर तुम्ही कमी तापमानात साठवून ठेवत असाल किंवा भाज्या स्वच्छ करून रेफ्रिजरेट करत असाल तर त्यातील महत्त्वाची पोषणमूल्ये उत्तम राहतात. जीवनसत्त्व क मात्र काही प्रमाणात कमी होऊ शकते.
गैरसमज- वजन वाढविताना किंवा कमी करताना केवळ कॅलरी काऊंट करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या नियमानुसार वजनावर काम करणारे अनेकजण असतात. माझ्या माहितीत एकजण दिवसातून किंवा ३ वेळा ७५० मिली इतके दूध पिऊन वजनावर काम करू इच्छितात. त्यांचा मते या कॅलरीज दिवसभरासाठी लागणाऱ्या उर्जेची त्यांची योग्य काळजी घेतायत. काहीजण फक्त ३०० ग्राम फलाहार दिवसातून ५ वेळा करतात.
वस्तुस्थिती- वजनावर काम करताना कॅलरीजबरोबर पोषण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तेलबिया, तृणधान्ये, फळे याचा योग्य वापर शरीरातील केवळ पचनसंस्थाच नव्हे तर मेंदू, हृदय, यकृत, पेशी यांवरदेखील परिणाम करत असतात. त्यामुळे कोणताही सल्ला सरसकट पाळण्यापूर्वी आहारतज्ज्ञांशी बोला; त्यांचे वैज्ञानिक मत तुमच्या आहाराला परिणामकारक आयाम देऊ शकते.