उन्हांत दीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशात वावरल्याने किंवा अतिउष्णतेच्या निकट संपर्कामध्ये दीर्घकाळ राहिल्याने जे धोके संभवतात, ते पुढीलप्रमाणे-

 उष्णतेच्या संपर्कामध्ये शरीर आल्यानंतर शरीर स्वतःचे तापमान सांभाळण्याचा प्रयत्न करते. जेव्हा शरीराचे तापमान नेमके ९८.६ फॅरन्हाइटहून अधिक होते, तेव्हा हे प्रयत्न सुरू होतात.

आणखी वाचा : रुग्ण आणि डॉक्टर दोघांनाही आचारसंहिता हवी का? कशासाठी?

 सर्वप्रथम हृदय आपली पंपिंगची क्रिया वाढवून रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात रक्त खेळवते.
 याच दरम्यान रक्तवाहिन्या अधिकचे रक्त स्वीकारण्यासाठी विस्फारतात व अधिकाधिक रक्त त्वचेजवळ नेले जाते, जेणेकरून उष्णता शरीराबाहेर फेकणे सोपे व्हावे.
 यानंतर मेंदूतर्फे त्वचेखालील स्वेदग्रंथींना अधिक प्रमाणात घाम तयार करण्याचा आदेश दिला जातो. त्वचेवर जेवढा अधिक घाम येतो, तेवढ्या घामाचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातलीच उष्णता वापरली जाते. त्वचेवर येणार्‍या घामाचे बाष्पीभवन होताना त्वचेखाली असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील रक्तातली उष्णता कमी केली जाते व शरीराचे उष्ण तापमान कमी होते.
 या सर्व प्रक्रियेमध्ये धोका निर्माण होतो, तो हृदयामार्फत अधिक प्रमाणात त्वचेकडे ढकललेल्या अतिरिक्त रक्तामुळे. शरीराला अर्थात रक्ताला थंडावा मिळावा यासाठी शरीराच्या केंद्राकडून अधिकाधिक रक्त त्वचा आणि स्नायूंकडे पाठवण्याचा शरीराचा प्रयत्न असतो, तेव्हा साधारण मिनिटाला आठ लिटर या गतीने रक्त त्वचेच्या दिशेने धावत असते.

आणखी वाचा : ऋतुमानानुसार डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

 त्या प्रयत्नात हृदय व फुप्फुस या महत्त्वाच्या अवयवांवर विलक्षण ताण पडतो. रक्त त्वचेकडे अधिक प्रमाणात आणि महत्त्वाच्या अवयवांना व महत्त्वाच्या क्रियांना मात्र रक्ताची कमी, अशी बिकट परिस्थिती ओढवते.
 साहजिकच त्यामुळे शरीराच्या केंद्रामधील मुख्य अवयवांना रक्ताची कमतरता भासते. त्यातही मूत्रपिंड व आतडे यांमधील रक्तसंवहन मोठ्या प्रमाणावर घटते. अन्नपचनाची क्रिया व मूत्रनिर्मितीची क्रिया या त्या क्षणी दुय्यम असल्याने शरीर असे करते.
 उन्हाळ्यात मूत्रविसर्जनाचे प्रमाण कमी होण्याचे हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे.
 उन्हातान्हांत किंवा अतिउष्णतेच्या साहचर्यामध्ये अधिक काळ काम करणार्‍यांना शरीराचे तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ वाटण्यापासून ते मृत्यूपर्यंतचा धोका संभवतो.

आणखी वाचा : Health special: उन्हाळ्यात त्वचेच्या विकारांपासून दूर राहायचे, तर ‘हे’ करायलाच हवे!

 त्यातही ज्या प्रदेशांमध्ये तापमान ४० अंशाच्या आसपास असते, त्या प्रदेशांमध्ये उष्णताजन्य मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.
 भारतामधील राज्यांचा विचार करता राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये उष्णताजन्य मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मागील एक दशकापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सियसची पातळी गाठू लागला आहे आणि २०२२-२३ पासून ठाणे जिल्ह्यात सुद्धा तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे.
 त्यात पुन्हा वयाची साठी ओलांडलेल्या लोकांना अधिक धोका असतो, विशेषतः उष्ण आणि दमट वातावरणामध्ये.
 हे झाले तत्कालिक-ताबडतोब दिसणारे परिणाम. आयुर्वेदानुसार या शरीरामध्ये वाढणार्‍या अतिउष्णतेचे दीर्घकालीन परिणामसुद्धा होतात. विविध पित्तप्रकोपजन्य साध्या व गंभीर अशा व्याधींमध्ये मूळ कारण हे ‘उष्णतेचे दीर्घकालीन साहचर्य’ असल्याचे दिसून येते.
 त्याहूनही मुंबईसारखी जी शहरे दमट तापमानाची आहेत, तिथे हवेतल्या दमटपणामुळे त्वचेवरील घामाच्या बाष्पीभवनाची व पर्यायाने शरीर थंड करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. हे समीकरण मुंबईप्रमाणेच समुद्रालगतच्या सर्वच गावांना-नगरांना लागू होते. त्यामुळे अशा ठिकाणी अतिउष्णतेच्या संपर्कात कामे करणार्‍यांनी अधिक काळजी घ्यायला हवी.

Story img Loader