वैभवी वाळिम्बे
आपल्या वेदनेशी जुळवून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी ती वेदनेच्या कोणत्या प्रकारात मोडते हे समजून घेणं आवश्यक आहे. आज आपण वेदनेचे आठ मुख्य प्रकार समजून घेणार आहोत.
१. अक्यूट पेन (तीव्र वेदना): कुठलीही इजा झाल्यानंतर त्वरित जाणवणारी वेदना, शरीरातील किंवा त्वचेवरील रासायनिक (केमिकल), तापमानिक (थर्मल) किंवा यांत्रिक (मेकॅनिकल) उत्तेजनेस दिला जाणारा शारीरिक प्रतिसाद म्हणजे तीव्र वेदना. ही वेदना सहसा सात दिवसांपेक्षा कमी काळ टिकते; परंतु काही वेळा ही तीस दिवसांपर्यंत जाणवू शकते. बहुतेक वेळा या वेदनेचा उद्देश झालेली इजा भरून काढण्यासाठी वेळ मिळणे आणि पुढील संभाव्य इजा थांबवणे असा असतो. उदाहरणार्थ: जखम झाल्यावर किंवा खरचटल्यावर होणारी वेदना, शस्त्रक्रियेनं होणारी वेदना, शरीराला मार लागल्यानंतर होणारी वेदना, पाय मुरगळल्यावर होणारी वेदना.
२. क्रॉनिक पेन (जुनाट वेदना): शरीराच्या एका किंवा अनेक भागात एकाचवेळी होणारी वेदना जी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहते किंवा जिची पुनरावृत्ती होते. यासोबत लक्षणीय भावनिक त्रास आणि दैनंदिन जीवनातील क्रिया आणि सामाजिक भूमिकांमधील सहभागावर येणार्या मर्यादा हे या वेदनेचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ: जुनाट कंबरदुखी, संधिवात, न्युरोपथिक पेन, फाईब्रोमाएलजिया
हेही वाचा… Health Special: भूक लागली आहे किंवा शमली आहे हा निरोप मेंदूला कोण देतं?
३. न्यूरोपॅथिक वेदना: ही नर्व्स म्हणजेच नसांना होणार्या इजेशी संबंधित असते, संदेशवहन करणार्या मज्जातांतूना इजा झाल्यामुळे वेदना निर्माण होतात आणि त्यांच्या संदेशवहनाच्या कामातदेखील अडथळे निर्माण होतात. उदाहरणार्थ: पेरीफेरल न्युरोपथी, आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सामान्यतः दिसणारा प्रकार डायबेटीक न्युरोपाथी. यात वेदनेसह इतर लक्षणं जसं संबंधित भाग सुन्न पडणे, थंड-गरम न जाणवणे, स्नायूंची शक्ती कमी होणे आदी परिणाम जाणवतात.
४. सायकोजेनिक वेदना (सायकोलॉजिकल पेन): अशी शारीरिक वेदना जी मानसिक, भावनिक किंवा वर्तणुकीशी संबंधित घटकांमुळे, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे (कुठल्याही शारीरिक दुखापत किंवा आजारपणाशिवाय) जाणवते, वाढते किंवा दीर्घकाळ टिकते. डोकेदुखी, पाठदुखी किंवा पोटदुखी हे सायकोजेनिक वेदनांचे काही सामान्य प्रकार आहेत.
५. कॅन्सर पेन (ऑन्कोजेनिक पेन): ट्यूमरच्या वाढीमुळे आजूबाजूचे अवयव संकुचित किंवा त्यांच्यावर दबाव आल्यामुळे होणारी वेदना, कॅन्सरच्या उपचार आणि निदान प्रक्रियेतून, त्यादरम्यान होणार्या संप्रेरकांच्या असंतुलनामुळे, किंवा केमोथेरेपी दरम्यान होणार्या रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे होणारी वेदना.
हेही वाचा… Health Special: कोड पूर्णपणे बरा होतो का?
६. विसरल पेन: अंतर्गत अवयवांना सूज आल्यावर, त्यांच्या कार्यात बिघाड झाल्यावर, अंतर्गत अवयवांना दुखापत झाल्यावर आपल्याला जाणवणारी वेदना. सामान्यतः या प्रकारची वेदना केंद्रीकृत करणे किंवा ओळखणे कठीण आहे. उदाहरणार्थ: पोटदुखी, स्वादूपिंडाला येणारी सूज, आतड्यांमधील वेदना
७. सोमेटिक पेन (Somatic Pain): सोमॅटिक वेदना म्हणजे तुमच्या स्नायू, त्वचा किंवा हाडांमधील वेदना. ही वेदना एका विशिष्ट भागावर केंद्रित असते आणि विशिष्ट हालचाली करताना तुम्हाला जाणवू शकते.
८. फॅन्टम लिंब सेन्सेशन आणि फॅन्टम लिंब पेन (Phantom Limb Pain): शरीराचा काढून टाकलेला (एम्प्युटेड) भाग किंवा अवयव अजूनही तिथे असल्याची संवेदना म्हणजे फॅन्टम लिंब सेनसेशन आणि त्या नसलेल्या भागात जाणवणारी वेदना म्हणजे फॅन्टम लिंब पेन.