“येऊ का आत?” असे म्हणत ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत, प्रसन्न मुद्रेच्या आशाताई आत आल्या. त्यांच्या अस्तित्वानेच खोली उजळून गेली म्हणा ना! “मी तुमच्याकडे दहा-बारा वर्षांपूर्वी आले होते.” मी हळूच लॅपटॉप कडे नजर टाकून त्यांचे वय वर्षे ७८ असल्याचं पाहून घेतलं. वयोमानाप्रमाणे चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण चेहरा नितळ आणि चमकदार होता, शिवाय कातडी लोंबत देखील नव्हती.” तुम्ही अजूनही छानच दिसताय – पूर्वीसारख्याच.” मी उत्तरले. ”मी काळजी घेते ना तशी  ४५ वर्षांपासून”, त्यांचे उत्तर. त्यांच्या त्वचारोगावर उपचार करून त्या निघून गेल्या. माझ्या मनात मात्र त्यांचे उत्तर घोळत राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर मंडळी, ही आहे  किमया सातत्याची. सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर सातत्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये आपण आधीच्या लेखांमध्ये पहिल्याप्रमाणे विविध ट्रीटमेंट असोत, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर असो, यांच्या बरोबरीने निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि विहार अतिशय महत्त्वाचे आहेत.
             
प्रत्येक रुग्ण डॉक्टरांना पथ्य-पाण्याबद्दल विचारतो. तर आज आपण पाहूया आपल्या आहारातील त्वचेकरता महत्त्वाचे अन्नघटक. एक गोष्ट लक्षात ठेवा विशिष्ट पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ल्याने आपण लगेच तरुण दिसू शकत नाही. परंतु या पदार्थांचे नियमित सेवन  वार्धक्यात देखील छान दिसण्यात आणि छान वाटण्यात मदत करते. आशाताईंच्या  एजिंग ग्रेसफुलीचे रहस्य त्यातच होते.
              
१) ग्रीन टी २) तेलकट मासे ३) डार्क चॉकलेट ४) विविध भाज्या ५) आळशीच्या बिया ६) सर्व प्रकारची फळे विशेषतः डाळिंब, केळी आणि लिंबूवर्गीय फळे ७) ॲव्होकॅडो ८) ऑलिव्ह ऑइल, हे आहेत काही महत्त्वाचे अन्नघटक.

 ग्रीन टी- चहा तर आपण नेहमीच पितो. त्याने तरतरी येते. ग्रीन टी चे काही अधिक फायदे आहेत. तो स्ट्रॉंग  अँटीऑक्सिडंट आहे. फ्री रॅडिकल्स हे अणू आपल्या पेशींच्या चयापचय क्रियेतून तयार होतात. हवेतील धूर, धूलीकण, धूम्रपान व  अतिनील किरण यांच्या परिणामामुळे देखील हे तयार होतात. त्वचेवर त्यांचा घातक परिणाम होतो. अँटी ऑक्सीडंट या अणूंना निष्प्रभ करतात आणि त्यांचे त्वचेवरचे दुष्परिणाम कमी करतात. वर दिलेल्या यादीतील सर्वच अन्नघटक विविध अँटिऑक्सिडंटनी भरलेले आहे आहेत. म्हणून त्यांचे सेवन त्वचेसाठी लाभदायक ठरते. ग्रीन टी मधील पॉलिफेनॉल हे घटक अतिनील किरणांचा परिणाम कमी करतात. त्यामुळे होणारे फोटो एजिंग आटोक्यात राहते. एक सावधानीचा इशारा. आपण जर ग्रीन टी घेत असाल तर कोणत्याही शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांना त्याची माहिती द्या. कारण ग्रीन टी रक्त पातळ करते, जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे.परंतु छोट्याशा शस्त्रक्रियेत सुद्धा जास्त रक्तस्त्राव करू शकते. 

हेही वाचा… Health Special: हंगामी इन्फ्लूएंझा म्हणजे काय? फ्लू कसा पसरतो?

तेलकट मासे- रावस, सुरमई आणि बांगडा  यासारख्या तेलकट माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. हे ॲसिड त्वचेवरील तेलकट आवरण टिकवून ठेवते. ज्यायोगे त्वचा मुलायम राहते आणि सुरकुत्या कमी प्रमाणात तयार होतात. त्वचा शुष्क न झाल्यामुळे त्याच्यावर बारीक चिरा पडत नाहीत व ॲलर्जीचे प्रमाण आटोक्यात राहते. या माशांमधून प्रथिनांचा पुरवठा भरपूर होतो. ज्याच्या उपयोगाने त्वचेमध्ये कोलॅजेन आणि इलास्टिन या  तंतूंची नवनिर्मिती होत राहते.  हे दोन तंतू त्वचेला नितळ, लवचिक. मुलायम व गुबगुबीत करतात. माशांमध्ये सेलेनियम हे मूलद्रव्य भरपूर प्रमाणात असते. हे द्रव्य डीएनए च्या निर्मितीला आवश्यक असते, ज्यामुळे त्वचा पेशींना होणारी इजा रोखून नवीन पेशी निर्माण होतात.

डार्क चॉकलेट- वाचूनच सर्वजण खूश, होय ना! पण एकच इशारा या चॉकलेट मध्ये साखरेचे प्रमाण ३०%  पेक्षा कमी पाहिजे. चॉकलेट मधील फ्लेवर हा घटक  अतिनील किरणांचा  दुष्परिणाम कमी करतो.

विविध भाज्या- सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये वेगवेगळी अँटीऑक्सिडेंट असतात. शिवाय त्यातील तंतूमय पदार्थ मोठ्या आतड्यातील लॅक्टोबॅसिलाय  या चांगल्या जीवाणूंच्या वाढीला मदत करतात. हे जीवाणू त्वचेचे आरोग्य राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. काही भाज्यांमध्ये, उदाहरणार्थ गाजर, लाल भोपळा आणि टोमॅटो यामध्ये कॅरोटीन आणि लायकोपिन ही अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे अतिनील किरण आणि वायूतील प्रदूषण  यांच्यापासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. पालेभाज्या, ब्रोकोली व टोमॅटो यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते त्याचा कोलॅजेन निर्मितीसाठी उपयोग होतो.

आळशीच्या बिया-  शाकाहारी लोकांसाठी  हा एक मोठा ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा स्रोत आहे.

डाळिंब- हे फळ म्हणजे फ्लेविनॉइड,, टॅनिन  आणि  लिग्नान  यांचा खजिनाच आहे. या द्रव्यांचा उपयोग अतिनील किरणांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि  कोलॅजेन  निर्मितीसाठी होतो.

लिंबूवर्गीय फळे-  संत्री, मोसंबी, लिंबे आणि पेरू ही फळे म्हणजे क जीवनसत्वाची कोठारेच आहेत. त्यांच्यामुळे अतिनील किरणांचा दुष्परिणाम रोखण्याबरोबरच त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
 
ॲव्होकॅडो- हे फळ आपल्याकडे देखील आता मिळू लागले आहे. याच्यामध्ये Mufa Monosaturated Acids  त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात आणि कोलॅजेन निर्मितीत हातभार लावतात. त्यातील अँटीऑक्सिडंट अतिनील किरणांपासून बचाव करते.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलीव्ह ऑइल-  या तेलामधली MUFA  त्वचेचे संरक्षण करण्याबरोबरच त्वचा दाह कमी करतात.

 आहारामध्ये विविध रंगी भाज्या व फळे यांचा समावेश जरूर करावा. कारण प्रत्येक रंगात वेगवेगळी अँटिऑक्सिडंट असतात.

या सौंदर्यशास्त्र मालिकेचा समारोप करताना एकच सल्ला देऊ इच्छिते, प्रथिनयुक्त, योग्य तेल आणि भरपूर भाज्या व फळे यांचा समावेश असलेला आहार सातत्याने करावा. मिठाया इत्यादी गोड पदार्थ, तसेच तळलेले आणि  प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ  जिभेला कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यांचे प्रमाण कमी ठेवावे. योग्य आहार, नियमित व्यायाम, सनस्क्रीनचा योग्य प्रमाणात आणि वारंवार उपयोग व वाढत्या वयात मॉईश्चरायझचा वापर, हे सूत्र वापरल्याने आपण देखील आशाताईंचा एजिंग ग्रेसफुलचा मंत्र अंमलात आणू शकतो.