सुनंदा आजी -वय वर्ष ७५. स्वतःच्या आरोग्याबाबतीत अत्यंत सजग व्यक्ती ! दररोज व्यायाम करणाऱ्या मोजक्या सिनिअर सिटीझनपैकी एक ! त्यांना ग्लुकोज मॉनिटरिंग (साखरेची पातळी मोजण्याचं ) एक यंत्र दिल गेलं होतं ज्यावरून खाण्याचं आणि शरीरातील साखरेचं गणित बऱ्यापैकी लक्षात येत होतं. त्यांच्या आहाराबाबत काय खायचं किती खायचं हे ठरवून देताना त्या म्हणाल्या ,
“पल्लवी , हे जे इन्सुलिन इम्बॅलन्स म्हणतात म्हणजे जे इन्सुलिन वाढत जाताना आपल्याला कळतंय ते आधीही असेलच की . म्हणजे पूर्वी जे रक्त अशुद्ध होणं म्हणायचे ते हेच होतं का ? लोकांना त्याला डायबिटीस म्हणतात ते माहित नसावं कदाचित नाही का ?”
मी म्हटलं – “ आयुर्वेदात मधुमेहाची नोंद आहे. पण इन्सुलिनचा वापर मधुमेही रुग्णांसाठी होऊ शकतो हे एकोणिसाव्या शतकातच लक्षात आलंय शास्त्रज्ञांच्या”
त्यावर त्या म्हणाल्या – “ हम्म , कसं कळलं असेल कोणाला नाही , एक इन्सुलिन एवढं सगळं करू शकतं ते? आपल्याकडे पण कळलं असणार पण आळस केला असणार आपण जगाला सांगायला म्हणून त्या फिरंगी लोकांनी आधीच शोधल्या शोधल्या क्रेडिट घेऊन टाकलं इन्शुलिनच्या शोधाचं”
यावर मला खूप हसू आलं. सुनंदा आजीच्या इन्सुलिनच्या कुतूहलपूर्ण प्रश्नावरून इन्सुलिनच्या इतिहासात डोकावंसं वाटलं. जितकं इन्सुलिन आता लोकांना उपलब्ध आहे त्याची कहाणी सुद्धा तितकीच रंजक आहे. याच निमित्ताने आजचा लेख!
इन्शुलिन सध्या जगातील सगळ्यांच्याच ओळखीचा झालेला शब्द! आणि डायबिटीस असणाऱ्यांना धडकी भरविणारा शब्द. ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं त्यांना इन्सुलिनमुळे आहाराचं पथ्य असतंच पण हे इन्सुलिन म्हणजे नक्की काय? त्याचा शोध कसा लागला ? पिढ्यानुपिढ्या ते आपापल्या शरीरात नव्हतं का ? होतं आणि आपण दुर्लक्ष करायचो?
मधुमेहाच्या उपचार शोधाच्या इतिहासात साधारण १८८९ पासून इन्सुलिन बाबत कुतूहल तयार झालेलं आढळून येतं. सुरुवातीला केवळ ४०० ते ५०० कॅलरीज इतका आहार आणि त्यात कमीत कमी कार्ब्स (कर्बोदके ) असं इन्सुलिन वर अवलंबून असणाऱ्या मधुमेही रुग्णाचा आहार असे.
खरं तर जर्मन संशोधकांना इन्सुलिनबद्दल सगळ्यात आधी माहित झालं होतं. ऑस्कर मिन्सकोवस्की आणि जोसेफ वॉन मेरिंग अशी या संशोधकांची नावं होती. स्वादुपिंडातून स्रवणाऱ्या एका पदार्थामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण बदलतंय आणि त्यावर परिणाम होतोय हे त्यांना आढळून आलं. हे नेमकं काय असावं हे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न केला मात्र जर्मनीत सुरु असलेल्या युद्धामुळे आणि इतर अनेक कारणामुळे त्यांच्या संशोधनाला पुरेसं पाठबळ मिळू शकलं नाही.
आणखी वाचा-Health Special: डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे काय?
वीस वर्षानंतर पॉल लँगरहान्सने स्वादुपिंडातील काही पेशींबद्दल संशोधन केलं. या पेशींमधून काहीतरी बाहेर येतंय पण या काय पेशी आहेत त्याचा अंदाज तेव्हा त्यालाही नव्हता. याच पेशींना नंतर संशोधकाच्याच म्हणजेच पॉल लंगरहान्सच्या नावानेच ‘ आयलेट्स ऑफ लँगरहान्स’ असं म्हटलं जाऊ लागलं. या पेशीतून एक द्रव्य येतंय आणि ते परिणामकारक आहे हेही लक्षात आलं.
१९०१ युजीन ओपी नावाच्या अमेरिकन पॅथॉलॉजिस्टने मधुमेह आणि आयलेट्स ऑफ लँगरहान्स तर्फे स्रवणाऱ्या इन्सुलिनमुळे मधुमेह यांचा संबंध असल्याचे जाहीर केले. १९१० च्या दरम्यान सर एडवर्ड अल्बर्ट शार्प यांनी म्हणजे इन्सुलिन म्हणजेच लॅटिन भाषेत बेट असं नाव या स्रवणाऱ्या पदार्थाला देऊ केलं.
टोरोंटोमध्ये मॅक्लिओड नावाच्या शिक्षकाने त्याच्या २ शल्यचिकित्सकांकडे इन्सुलिन संशोधन करण्यासाठी दिलं. या दोन शल्यचिकित्सकांची नाव होती डॉ. फ्रेडरिक बंटिंग आणि डॉ चार्ल्स बेस्ट ! सुरुवातीला कुत्र्याच्या स्वादुपिंडातील इन्सुलिनबद्दल १९२१ साली या जोडगोळीने शोध लावला. त्यावेळी त्यांना “थीक ब्राऊन मक” म्हणजे मराठीत सांगायचं तर चक्क “स्वादुपिंडातील तांबडा चिखलासारखा पदार्थ” ज्यामुळे कुत्र्याच्या शरीरातील साखर नियंत्रणात आल्याचं आढळून आलाय हे जाहीर केलं. त्यांच्या संशोधनाबद्दल आणखी ठाम पाठबळ मिळावं म्हणून कोलिप आणि मॅक्लिओड या संशोधकांनी आणखी काही प्राण्यांच्या इन्सुलिनवर प्रयोग करायचं ठरवलं. यावेळी त्यांनी गुराढोरांच्या इन्सुलिनचा वापर केला. त्याचेही उत्तम परिणाम दिसून आले.
आणखी वाचा-तुम्ही दिवसभरातील शेवटचे जेवण कोणत्या वेळी केले पाहिजे? तज्ज्ञांनी केला खुलासा
आता मात्र मानवी शरीरावर परिणाम शोधण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात इन्सुलिनची आवश्यकता होती. कोलिप पूर्णपणे या कामासाठी रुजू झाला. मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करण्याचं त्यानं मनावर घेतलं आणि १९२१ साली त्याला त्यात यश मिळालं. १९२२ च्या सुमारास टोरोंटो मधील एका इस्पितळात डॉक्टरांनी एका १४ वर्षाच्या मुलावर या डॉक्टर जोडगोळीनं लावलेल्या शोधाचा उपयोग करायचं ठरवलं. लिओनार्ड थॉंप्सन असं या मुलाचं नाव होतं.
वजनाने केवळ २९ किलो इतकंच वजन असणाऱ्या या मुलाची रक्तातील साखर अवाजवी वाढलेली होती. ती काहीही केल्या कमी होईना आणि लिओनार्डच्या तब्येतीत आहार बदलून वेगवेगळी औषधं देऊन सुधारणा होईना. त्यावेळी मधुमेह आणि एकूणच इन्सुलनबद्दलची माहिती अपुरी होती.
मात्र कोलिपने तयार केलेल्या या इन्सुलिनने चमत्कार झाला. लिओनार्डची साखर नियंत्रणात आली. मात्र त्याला या इंजेक्शनची अॅलर्जीसुद्धा झाली त्यामुळे दिलेल्या इन्सुलिनमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु झाले. साधारण १२ दिवसांनी त्याला पुन्हा इन्सुलिनचं आणखी एक इंजेक्शन दिलं गेलं. यावेळी मात्र त्याच्या अॅलर्जीचं प्रमाण कमी झालं मात्र त्याची तब्येत सुधारू लागली आणि त्याचा जीव वाचला. याचबरोबर इन्सुलिन नावाच्या द्रव्याच्या जादुई परिणामांवर शिक्कामोर्तब झालं.
इन्सुलिनची ही शोधमोहीम टोरोंटोमध्ये सुरु असतानाच १९०७ साली भारतात कलकत्ता आणि मद्रास येथे चुनीलाल बोस यांनी भारतातील मधुमेही रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल जागरूकता निर्माण केली. १०२१ ला लागलेल्या इन्सुलिनच्या शोधांनंतर इन्सुलिन सहज उपलब्ध होऊ लागलं आणि भारतीय रुग्णांना देखील त्याचा लाभ घेता आला.
या शोधामुळे इन्सुलिन वर अवलंबून असणाऱ्या मधुमेहासाठी औषध जगभरात मिळू लागलं आणि अनेक मधुमेही रुग्णाचं जीवन वाढलं. पुढे या संशोधनासाठी बंटिंग आणि मॅक्लिओडना नोबेल पुरस्कार मिळाला जो त्यांनी बेस्ट आणि कॉलिपलाही समान श्रेय देत स्वीकारला.
सुरुवातीला अनेक वर्ष प्राणिजन्य इन्सुलिनचा मानवी शरीरातील मधुमेह कमी करण्यासाठी वापर केला जात असे. एली लिलीने १९८५ च्या आसपास हुन्सुलीन नावाने ए कोलाय(E -coli ) पासून इन्सुलिन तयार करायला सुरुवात केली.
टाईप-१ म्हणजेच इन्सुलिनवर अवलंबून असणाऱ्या मधुमेही रुग्णांना संजीवनी मिळाली आणि त्यांचं आहाराचं पथ्यदेखील सुकर झालं.