Health Special: फणस म्हणजे इंग्रजीत जॅकफ्रुट! रसाळ किंवा स्वच्छ पिवळा आणि चवीला खास असणाऱ्या या फळाचं मला कायम कुतूहल वाटत आलंय. बऱ्याच फळझाडांच्या बियादेखील आहारात समाविष्ट केल्या जातात. फणस त्यापैकीच एक! आजच्या लेखात त्याचबद्दल थोडं जाणून घेऊ!

कोकणात सुट्टीत गेलो की, आंबे, काजू आणि फणस यांची रेलचेल असे. सकाळ संध्याकाळ फक्त आंबे, करवंद, फणस यांचा घरभर घमघमाट असायचा. खेळायला जाताना आजोबांना फणसाचा अंदाज घेताना पाहिलं की, समजायचं आज फणसाचे गरे! खेळून आलो की, आपसूक पावलं मागच्या पडवीत वळायची (गावच्या घराचे चार भाग- अंगण, बाहेरची खोली, माजघर, देवघर आणि मागची पडवी. मागच्या पडवीत आम्हा नातवंडांचा कल्लोळ असायचा) आम्ही खेळून आलो की आजी प्रत्येकाला हातात छोटी डिश देत त्यात गरे द्यायची. कापा आणि बरका – कोणाला कोणते गरे हवेत ते विचारात, हा साधारण सोहळाच सुरु असायचा.

हेही वाचा – वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

फणसाच्या गऱ्यांवर पाणी पिऊ नका…

मला कायम कापा फणसाचं आकर्षण असे. एक तर ते गरे स्वच्छ दिसत आणि खायला पण सुटसुटीत! “हळूहळू खा नाहीतर पोटात दुखेल.” आजी सांगत राहायची कोणी चुकून पाणी प्यायला तर आजी बजावायची “गऱ्यांवर पाणी पिऊ नये बाळा; पोटात दुखेल” “आणि गरे खाऊन आठूळ धुवून ठेवा बाहेरच्या भांड्यात” असा एक सूचनावजा दंडक देखील असे. “आम्ही हात धुताना आठूळं धुवायचो – ती गुळगुळीत आठूळं धुताना त्याचं आरपार दुधट कवच मजेमजेत काढायला मजा येई. हे करताना कधी कधी आठूळं निसटायची. या सगळ्याची मला कायम गम्मत वाटायची. त्या किंवा पुढच्या आठवड्यात आजी याच आठूल्या किंवा आठळ्या भाजून किंवा उकडून खायला देई. खमंग आणि दैवी!

बाहेरून काटेरी, आतून रसाळ

पुढे गावावरून फणस घरी येत आणि आठळ्या वेगळ्या येत. मला रसभरीत लहानखुऱ्या बरक्या फणसाच्या गऱ्यापेक्षा कायम कापा गऱ्याचं आकर्षण असे आणि आठूळ कधी अशीच किंवा भाजी म्हणून खायला कोण आनंद होई! उन्हाळा सुरु होताना कच्च्या फणसाची भाजी आणि पावसाळ्याआधी साठवलेल्या आठळ्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. फणस दिसायला अजस्त्र -बाहेरून काटेरी आतून रसाळ, रुचकर!

आहारशास्त्रामध्ये फणस त्यामानाने कमी गवगवा केलं जाणारं फळं. त्याच्या अजस्त्र आकारामुळे आणि खाण्याआधी साफ करण्याच्या पद्धतीमुळे असेल. आजच्या झटपट जीवनशैलीत तितका सहज घराघरात दिसत नाही. आणि भारतीय फळांबद्दल त्यातून महाराष्ट्रातील फळांबद्दल आपल्याला माहिती असायलाच हवी. फणसाबद्दल काही जाणून घ्या, आधी जाणून घेऊ फणसाच्या बियांबद्दल!

स्नायूंच्या बळकटीसाठी…

फणसाच्या बियांमध्ये ज्याला आठूल किंवा आठळ्या असं म्हटलं जातं यात भरपूर मॅग्नेशिअम, लोह आणि प्रथिने असतात. लहान मुलांच्या वाढीसाठी पोषक आणि विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम अशा फणसाच्या बिया उकडून, भाजून खाल्ल्यास शरीरातील स्नायूंना उत्तम बळकटी मिळते. मासिक पाळीदरम्यान नियमित आठळ्या खाल्ल्याने अनेक स्त्रियांची पोटदुखी कमी व्हायला मदत होते. केसगळती, त्वचेचे विकार कमी होण्यासाठी आठळ्या खाणे आरोग्यदायक मानले जाते. यात असणारे अ जीवनसत्त्व डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील उत्तम मानले जाते. तसेच यात असणारे लोह अ‍ॅनिमियाचे प्रमाण कमी करू शकते.

मधुमेहींसाठीही उत्तम

मधुमेह असणाऱ्यांनीदेखील फणसाच्या बिया आवर्जून आहारात समाविष्ट कराव्यात. बियांमध्ये असणारी सॅपोनीन, लिग्नन, आर्टोकार्पीन, जॅकनीन यासारखी द्रव्ये रक्ताभिसरण, पेशींचे आरोग्य, हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अलीकडे दुधाला पर्याय म्हणून याच बियांची पावडर वापरली जाते. केवळ उपवासाचे पदार्थ म्हणून नव्हे तर ज्यांना ग्लूटेन पचत नाही त्यांच्यासाठी या बियांचे पीठ आहारात सहजी समाविष्ट केले जाऊ शकते.

हेही वाचा – Health Special: व्यक्ती व्यसनाधीन कशी व का होते?

क जीवनसत्त्व आणि तंतूमय पदार्थ

नेहमीच्या आहारात थालीपीठ, वेगेवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पोळी अशा स्वरूपात हे पीठ वापरले जाते. फणसाच्या बिया भाजल्याने त्यातील प्रथिनांचा अंश आणखी वाढतो त्यामुळे भाजलेल्या बियांचे पीठ जास्त पोषक मानले जाते. अनेक ठिकाणी फणसाच्या गऱ्यांना मोड आणून त्यानंतर ते भाजले जातात. या प्रक्रियेमध्ये गऱ्यातील क जीवनसत्त्व आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण उत्तम असते आणि या गऱ्यांपासून तयार केले जाणारे पीठ किंवा पावडर अनेक प्रथिनांच्या पावडरमध्ये देखील वापरली जाते. त्वचाविकारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांमध्ये गऱ्यांचा अर्क किंवा पावडर हमखास वापरली जाते.

पचनासाठी उत्तम

फणसाच्या बियांमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थाच्या उत्तम प्रमाणामुळे त्या पचनासाठी उत्तम मानल्या जातात. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू नये यासाठी फणसाच्या बिया आहारात जरूर समाविष्ट कराव्यात. भूक पटकन भागविणाऱ्या फणसाच्या बिया अलीकडे वेगेवेगळ्या उत्पादनामध्ये वापरल्या जातात. पूर्णपणे वनस्पतीजन्य आहाराकडे कल असणाऱ्या बहुतांशी विगन लोकांसाठी फणसाच्या बिया आवडतं खाणं आहे. हे झालं बियांबद्दल -पुढच्या लेखात जाणून घेऊया गऱ्यांबद्दल!