मुक्ता चैतन्य
राधिका बारावीत आहे. ती अभ्यास करत बसलेली असताना सतत थोड्या थोड्या वेळाने तिचा मोबाईल तपासून बघत असते. खरंतर मोबाईल वाजलेलाही नसतो तरीही ती तिचा फोन तपासून बघत असते. आपला फोन व्हायब्रेट झालाय, काहीतरी मेसेज नक्की आला असणार असं तिला सतत वाटत असतं. पण फोन उघडून बघितल्यावरही त्यात नवीन कुठलाच मेसेज तिला दिसत नाही. या अवस्थेला म्हटलं जातं ‘फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम’. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. आपला फोन व्हायब्रेट झाला आहे, काहीतरी मेसेज आला आहे, कुणाचा तरी मिस्ड कॉल असावा असे भास होतात, पण प्रत्यक्षात ना फोन व्हायब्रेट झालेला असतो, ना कुणाचा मेसेज आलेला असतो ना कुणी मिस्ड कॉल दिलेला असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेषतः टिनेजर्स आणि मोठ्यांमध्ये. अर्थातच त्याच एक महत्वाचं कारण आहे मोबाइलवरचं प्रचंड अवलंबत्व आणि अति स्क्रीन टाइम. फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमची शास्त्रीय कारणं अजून तरी लक्षात आलेली नाहीत, पण आतापर्यंत या विषयात जितके काम झाले आहे, संशोधन झाले आहे त्यावरुन वरची दोन कारणं सध्या तरी गृहीत धरलेली आहेत. म्हणजेच ही मानसिक आणि भावनिक कारणं आहेत. आपल्या फोनशी आपली मानसिक आणि भावनिक गुंतवणूक किती प्रचंड असते हे यावरुन सहज लक्षात येऊ शकतं. ही अवस्था मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणाच्याही संदर्भात असू शकते त्यामुळे आपण आपल्या फोनशी भावनिक पातळीवर किती अवलंबून आहोत याचा विचार केला पाहिजे. आणि मुलांनाही असं अवलंबत्व योग्य नाही हे शिकवलं पाहिजे.

हेही वाचा… Health Special: मानेवर चामखीळ कशामुळे येतात?

काय करता येईल?

१) मोबाईल आणि इंटरनेटवर असलेलं भावनिक अवलंबत्व कमी करण्याचे प्रयत्न. याचाच अर्थ असा की फेसबुकवर किती लाईक्स मिळतायेत यावरुन खऱ्या आयुष्यात छान/वाईट वाटणं या गोष्टी बाजूला सारायला शिकणं.

२) फोनमधलं व्हायब्रेशन फिचर बंद करुन टाकणं. रिंगटोन बदलणं. याने आपला फोन नेहमी पेक्षा वेगळा वाजतो आणि तो सतत बघण्याचा मोह किंचित कमी होतो. व्हायब्रेशन मोड बंद केल्याने सतत मोबाईल व्हायब्रेट होतो आहे आणि काहीतरी मेसेज आला आहे हे मेंदूचं झालेलं कनेक्शन तोडायला मदत मिळते.

हेही वाचा… Mental Health Special : मुलांना लागलेलं स्क्रीनटाईमचं व्यसन कसं सोडवाल?

३) काहीवेळा तंत्रज्ञानातून येणारी अस्वस्थताही फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमला कारणीभूत असू शकते. जर तीव्र अस्वस्थता जाणवत असेल तर समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घेतली पाहिजे.

४) काही मुलं आणि मोठ्यांमध्ये हा प्रकार काहीकाळ चालतो तर काही जणांमध्ये दीर्घकाळ चालतो. कायमस्वरूपीही होऊ शकतो जर मोबाईल आणि स्क्रीनचे अवलंबत्व कमी केले नाही तर. त्यामुळे स्क्रीन टाइम मॅनेजमेंटला पर्याय नाही.

मुलांसह कुटुंबाची स्क्रीन टाइम मॅनेजमेंट कशी करायची हे बघूया पुढच्या भागांमध्ये!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what is phantom vibration syndrome how it affects our concentration capacity hldc asj