Health Special हल्ली प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी वाहन ( मोटर/ दुचाकी ) असते. त्यामुळे जवळ जायचे असेल तरी गाडी किंवा स्कूटर वापरली जाते. विविध अ‍ॅप्समुळे सर्व गोष्टी घरी येतात आणि बाजारात फिरण्याची गरज पडत नाही. त्यामुळे चालण्याचा व्यायाम कमी होतो. तुमचे वजन वाढते आहे किंवा तुम्ही हृदयरोगाने ग्रस्त आहेत किंवा तुम्हाला ताणतणाव जास्त आहे, तर तुम्ही नियमित चालायला सुरवात करा – तुमचे हे त्रास दूर पळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किमान अर्धा तास तरी चाला

दररोज ३० मिनिटे चालायला जाणे हा शरीर आरोग्यसंपन्न ठेवण्याचा साधा, सोपा, बिनखर्चिक व बिनधोक उपाय आहे. कुणी मित्र- मैत्रिण बरोबर असेल तर चालणे आनंदी होते म्हणून चांगली संगत बघा. कंटाळा टाळण्यासाठी नवनवीन किंवा वेगवेगळ्या मार्गावर चाला. सुरुवातीला कमी वेळ अंतर चालून हळुहळू सकाळ- संध्याकाळ ३० मिनिटे चालायला लागा. आपण रोज किती चालतो ते आपण आपल्या मोबाइलवर किंवा पेडोमीटर वर तपासू शकतो. शक्यतो दिवसाला ६०००- ८००० पावले चालायला पाहिजे.

हेही वाचा…Health Special: कोलेस्ट्रॉल का वाढतं?

चालण्याचे फायदे

१. हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरु राहते, रक्ताभिसरण सुधारते व रक्तदाब नियंत्रणात राहतो.
२. वाढत्या वयात आपले स्नायू कमजोर होतात. चालण्याने या स्नायूंमध्ये जास्त ताकद
येते. हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो.
३. रोजच्या चालण्याने पचनशक्ती सुधारते. जेवल्यानंतर शतपावली करण्याचे हेच कारण
आहे.
४. चालण्याने फुप्फुसाची क्षमता वाढते. शरीराला जास्त प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.
तुमची कार्य क्षमता वाढते.
५. चालणे या व्यायाम मुळे शरीराची आणि मनाची मरगळ निघून जाते. मनातील ताण तणाव, नैराश्य कमी होते. तुमचा मूड चांगला राहतो.
६. चालण्याने मेंदू व मज्जासंस्था रिलॅक्स होतात. विचारांना चालना मिळते. स्मृतिभ्रंश व
वृद्धत्व अश्या आजारापासून चालणे तुम्हाला दूर ठेवते.
७.. चालण्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते जेणे करून आजाराशी लढणे सोपे जाते.
८. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोजच्या चालण्याने मधुमेहासारख्या आजाराला दूर ठेवले जाते. मधुमेह असल्यास रक्तातील साखरेची पातळी योग्य व समतोल ठेवण्यास फायदा होतो. वजन आटोक्यात येण्यासही मदत होते.
९. चालण्याच्या सवयीमुळे अनेक नवनवीन मित्र जोडले जातात, मॅरेथॉन, वॉकेथॉन
सारख्या शर्यतीत भाग घेऊन जीवन आनंदाने भरून येते.

हेही वाचा…Health Special : रेबीज होऊ नये म्हणून काय करावं?

चालताना काय खबरदारी घ्यावी ?

१. चालताना तुमचे डोके वर आणि नजर समोर असावी. सतत खाली जमिनीकडे पाहून चालू नये.
२. पाठ, मन, खांदे सैल ठेवावेत. पोक काढून चालू नये. ताठ चालावे.
३. चालताना दोन्ही हात मागे पुढे करणे ही एक चांगली सवय आहे.
४. पाऊल पुढे टाकताना प्रथम टांच टेकवली जावी व नंतर बोटे टेकवावीत.
५. सिमेंटच्या रस्त्यांपेक्षा मातीचे व गवताचे मार्ग चालण्यास चांगले असतात.
६. चालताना चांगले मऊ पण मजबूत तळ असलेले स्पोर्ट्स शूज वापरावे. त्यामुळे पायांच्या
स्नायूंना इजा पोहोचत नाही.
७. चालताना पिण्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
८. कपडे सुटे, सैलसर व गडद रंगाचे असावेत.
९. कुठल्याही व्यायाम प्रकारात वॉर्म अप किंवा प्रथम थोडे हळू चालून स्नायू मोकळे झाले की भरभर चालावे ज्यामुळं जास्त उष्मांक वापरले जातील.  
१०. कुठल्याही आजारानंतर चालताना आपल्या अस्थिव्यंग तज्ज्ञाचा आणि फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन काही पावले चालून सुरुवात करावी. 
११. तरुणांनी चालण्याबरोबर सायकल चालवणे, पोहणे, धावणे इत्यादी स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करावेत.  चालण्यापूर्वी योगासने केल्याने स्नायूंना अधिक लवचिक करता येईल. 

हेही वाचा…Mental Health Special : मुलांना शिस्त कशी लावाल?

चालण्याचा व्यायाम नियमित करत राहणे व प्रेरित असणे आवश्यक असते. मित्र किंवा एखाद्या वेळी कुत्रा घेऊन फिरायला निघा. चालण्याने मित्रांबरोबर घनिष्ठ मैत्री होते. वेळ कमी असल्यास घरच्या घरी किंवा सोसायटीमध्ये रात्री जेवल्यानंतर किंवा सकाळी अर्धा तास तरी चालावे.

हेही वाचा…Health Special : चपळता वाढवणारं ट्रेनिंग का आवश्यक? 

शहरात एकत्र चालणाऱ्यांचे गट असतात. किंवा हायकिंग / ट्रेकिंगच्या गटाबरोबर जाण्यातही मजा असते. थोडक्यात चालण्याचे एवढे सारे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही नियमित चालायला सुरुवात करावी. त्यासाठी स्वयंप्रेरित होऊन चालण्यासाठी खास बूट आणून तयार होऊन चालायला निघा. टीव्हीवरील करमणुकीपेक्षा हे नक्कीच जास्त आनंददायी होईल. मग करणार ना सुरुवात?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what is the connection between regular walking and immunity hldc psg
Show comments