बारा ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिवस असतो. यावर्षी या दिवसाची संकल्पना इन्फॉर्म्ड चॉईसेस अँड बेटर आउटकम्स अशी आहे. रुग्णांना संपूर्ण आणि योग्य माहिती देऊन उत्तम उपचार आणि परिणाम साध्य करणं अस मूळ उद्दिष्ट आहे. आर्थरायटिस हा आजार सर्वपरिचित आहे, मात्र याची संपूर्ण माहिती लोकांमध्ये अजूनही नाही. ऑर्थरायटिस जागरुकता मालिकेतील हा दुसरा लेख.

या अनुषंगाने एकंदरीत आर्थरायटिस आणि त्यामधे होणार्‍या वेदानांबद्दल जाणून घेणं आपली क्वालिटी ऑफ लाइफ निश्चितपणे वाढवणार आहे. यामुळे आर्थरायटिस मुळे समाजावर आलेला शारीरिक, आर्थिक आणि भावनिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात

मागच्या लेखात आपण ऑस्टियोआर्थरायटिस बद्दल जाणून घेतलं या लेखात आपण रूमटोईड आर्थरायटिस (Rheumatoid arthritis) बद्दल जाणून घेऊया. रूमटोईड आर्थरायटिस हा रोगप्रतिकार शक्तीच्या विसंगत प्रतिसादामुळे निर्माण होणार आजार आहे. हा स्वयंप्रतिकार रोगांच्या म्हणजे ऑटोइम्युन रोगांच्या वर्गात मोडतो. यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती शरीरातील निरोगी पेशींवर हल्ला चढवते. प्रामुख्याने हाताचा पंजा आणि मनगट यातील छोट्या सांध्यांना हा आजार लक्ष्य करतो.

हा आजार व्हायला कोणतंही एक ठोस कारण नाही मात्र काही रुग्णांमध्ये HLA DR 4 (याला RA फॅक्टर असही म्हणतात) या जनुकाशी हा आजार जोडलेला असू शकतो. ऑस्टियोआर्थरायटिस हा प्रामुख्याने मोठ्या आणि गुडघे, खुबा अशा वजन पेलून धरणार्‍या सांध्यामध्ये होतो. बहुतेकवेळा तो शरीराच्या एका बाजूच्या सांध्यामध्ये होतो, काही वेळा हा दोन्ही बाजूंना असला तरी याचं प्रमाण दोन्हीकडे तंतोतंत सारखं नसतं. रूमटोईड आर्थरायटिस हा छोट्या आणि वजन न पेलणार्‍या सांध्यामध्ये होतो आणि हा शक्यतो नेहमीच शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये सारख्या प्रमाणात होतो. याला सीमेट्रिकल आर्थरायटिस असं म्हणतात.

हातांची बोटे आणि मनगटे यातील सांधे दुखणं, यावर सूज येणं, हे सांधे स्टीफ होणं अशी लक्षणं दिसतात. या लक्षणांची तीव्रता सकाळी सगळ्यात जास्त असते यालाच मॉर्निंग स्टीफनेस असं म्हणतात. दिवस पुढे सरकला की ही लक्षणं हळूहळू कमी होतात. तीव्र स्वरूपाच्या रूमटोईड आर्थरायटिसमध्ये बोटातील सांध्याची ठेवण बदलते, या सांध्याच्या आजूबाजूच्या पेशींचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते त्यामुळे बोटांचे सांधे काही विशिष्ट स्थितीत कायम राहतात यालाच डिफोर्मिटीज असं म्हणतात. यामुळे रुग्णाची दैनंदिन कामे ज्यामधे बोटांचा कुशलतेने वापर करावा लागतो अशी कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. तीव्र स्वरूपा मध्ये बोटांची अजिबातच हालचाल होत नाही आणि कामे बंद होतात. कणीक मळणं, लिहिणं, विणकाम, पेंटिंग, वाद्यं वाजवण अशी कौशल्याची कामे जमत नाहीत. हाताच्या स्नायूंची शक्ती कमी कमी होऊ लागते. हाताची बोटे आणि मनगटे इथून सुरू झालेला आजार हळूहळू दोन्ही हातांची कोपरे मग खांदे असा वाढत जातो. काही वेळा हातांची बोटे आणि कोपर इथे गाठी तयार होतात ज्या त्वचेवर उंचवंट्यांच्या स्वरूपात दिसतात, या गाठी शक्यतो वेदनारहित असतात, त्यांना रूमटोईड नोडयूल असं म्हणतात. रूमटोईड आर्थरायटिसच्या रुग्णांना थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं अशी लक्षणं देखील असतात.

हेही वाचा – मुलमाती मातीचा सतत वापर करणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांचे मत काय..

र्ऑस्टियोआर्थरायटिस हा एका सांध्यापुरता मर्यादित असतो आणि याची लक्षणं शरीरात इतरत्र जाणवत नाहीत मात्र रूमटोईड आर्थरायटिस हा आजार शरीरातील इतर अवयव आणि संस्था यांनाही लक्ष करतो. ऑस्टियो आर्थरायटिस हा एका विशिष्ट वयात होणारा आहे मात्र रूमटोईड आर्थरायटिस कोणत्याही वयात होऊ शकतो तसच स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात होतो. ऑस्टियोआर्थरायटिस आणि रूमटोईड आर्थरायटिस यांचे फिजिओथेरपी उपचार बघूया पुढच्या लेखात..