गेल्याच आठवड्यात जागतिक पोहे दिन साजरा झाला. पोहे आणि नाश्ता हे समीकरण पिढ्यानपिढ्या जोडले गेले आहे. आहार नियमन म्हटलं की नाश्ता म्हणून पोहे ओघाने आलेच. पोहे खरं तर आयुर्वेदातील तसेच आहारशास्त्रातील नियमानुसार महत्वाचे खाद्य आहे. पोहे सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रात खायला सुरुवात झाली तेव्हा, पटकन ऊर्जा देणारं खाणं म्हणून त्याकडे पाहिलं जात असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Health Special: कोकणच्या ‘या’ मेव्यातून सर्वाधिक लोह मिळते!

हलके तिखट गोड असणाऱ्या चवीचे पोहे पाहुणचार करून जाणाऱ्या भटक्या माणसाचं खाणं होतं. आहारशास्त्रानुसार पाहायला गेलं तर लोहाचं मुबलक प्रमाण असणारे पोहे आरोग्यदायी मानले जातात. आताच्या काळात प्रश्न हा पडतो की, लाल तांदळाचे पोहे खावेत की पांढरे? मुळात भातावर प्रक्रिया करून तयार झालेल्या पोह्यांमध्ये लोह भरपूर असतेच. लाल तांदूळ इतर पोषणतत्त्वांनी देखील भरपूर असतो. भारतात २ ढोबळ प्रकारचे पोहे मिळतात… जाडे पोहे व पातळ पोहे. दोन्ही प्रकारच्या पोह्यांचे पाकशास्त्रातील संस्कार वेगळे आहेत तसेच; वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे आहारात समाविष्ट होणे देखील. या दोन्ही प्रकारात फरक एवढाच आहे की, जाडे पोहे भिजवून त्याला आहारात समाविष्ट करता येते आणि पातळ पोहे भाजून आणि शिजवून दोन्ही प्रकारे आहारात समाविष्ट करता येतात.

आणखी वाचा: Monsoon Health : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे? तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स!

पोह्यातील पोषणमूल्यांबद्दल आधी थोडंसं जाणून घेऊ.
पोह्यामुळे उत्तम प्रमाणात ऊर्जा मिळते. सकाळी नाश्त्याला पोहे खाणारी व्यक्ती दिवसभरात फार क्वचित विरंगुळा म्हणून इतर खाणं खाताना आढळून येते. (सामान्य भाषेत सांगायचं झालं तर अरबटचरबट खाण्याकडे कल कमी असतो.)
पोह्यांमध्ये कर्बोदके (कार्ब्सचं ) प्रमाण प्रामुख्याने आहे. प्रथिनांचं प्रमाण तुलनेने कमी आहे. सोबत जीवनसत्त्व बी चं अख्ख कुटुंबच घेऊन पोहे वावरतात म्हणजे काय? तर नायसिन, थायामीन, कोबालामीन, पँटोथिनिक आम्ल या सगळ्यांचं उत्तम प्रमाण पोह्यांमध्ये आढळतं.

आणखी वाचा: Health Special: शिबे टाळण्यासाठी काय कराल?

पोहे खाताना त्यावर थोडा लिंबाचा रस पिळल्यास त्याचा ग्लासेमिक इंडेक्स अर्थात जीआय कमी होतो आणि ते पचायला हलके होतात. काळ बदलला तसे पोह्याचे वेगेवेगळे प्रयोग होऊ लागले आणि केवळ दाणे आणि खोबर यांनी सजवले जाणारे पोहे चटणी, सॉस, फरसाण, शेव यांनी सजवले जाऊ लागले. आहारशास्त्रामध्ये मात्र या सजावटीचे आपापले निम्न पोषणमूल्य आहे त्यामुळे आहारनियमनात मात्र हे सगळंच वर्ज्य केलं जातं.

आणखी एक सवयीची बाब म्हणजे चहा आणि पोहे. कोणत्याही खाद्यपदार्थासोबत चहा किंवा तत्सम द्रवपदार्थ प्यायल्यास त्यातील लोह शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते आणि चहा त्याला अपवाद नाही. अनेक ठिकाणी पोहे आणि फळं एकत्र खाल्ली जातात. ज्याने शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज वाढू शकते.

पोहे आणि दूध – या मिश्रणात देखील दुधातील कॅल्शिअम पोह्यातील लोहाच्या शोषले जाण्यावर बाधा आणू शकते आणि पचनास अडथळा आणू शकते.
दडपे पोहे – पोह्यामध्ये नारळाचे पाणी, मसाले आणि कांदा- टोमॅटोचे मिश्रण करून तयार केला जाणारा आणि केवळ आवश्यक पाक -संस्कार करून तयार केला जाणारा हा पदार्थ पोह्यातील जास्तीत जास्त पोषण मूल्यांचा पुरवठा करतो.

पोह्याचा चिवडा- वेगवेगळी कडधान्ये एकत्र करून तयार केला जाणारा आणि जास्तीत जास्त काळ टिकणारा शक्यतो हिवाळ्यात तयार केला जाणारा पोह्याचा चिवडा स्निग्ध पदार्थांच्या अतिरेकी वापरामुळे आहारनियमांतून वजा करावा लागतो.

पोह्यांचे लाडू : गूळ आणि पोहे किंवा लाह्या आणि पोहे यांचे लाडू लहान मुलांसाठी उत्तम खाद्यपदार्थ आहेत. भूक शमविण्यासाठी आणि भुकेची संप्रेरके योग्य प्रमाणात राखण्यासाठी नाश्त्यात पोहे असणे आवश्यक आहे. त्यामुळे आहारनियमांच्या पारड्यात पोह्याचे वजन कायम वरचढ असणार आहे. तर, तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे खाल्लेत का?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what is the importance of having poha pohe in daily breakfast importance of iron hldc vp
Show comments