अनेक शारीरिक व्याधी वृद्धापकाळात पाहायला मिळतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, संधिवात (Hypertension, Diabetes mellitus, Heart disease, Ostoarthritis) हे काही सर्वसाधारणपणे आढळणारे शारीरिक आजार. या बरोबरच अनेकांच्या दृष्टीवर (vision) आणि श्रवणशक्तीवर (hearing) परिणाम होतोच. खूप जणांमध्ये थायरॉइडचा(Thyroid) विकार असतो. ६५ वर्षे वयावरच्या ५०% पेक्षा जास्त वृद्धांना एक तरी वर्षानुवर्षे चालणारा शारीरिक आजार असतो आणि निदान १/३ वृद्धांमध्ये ह्या आजारामुळे हालचाली आणि कार्यक्षमतेवर (functional disability) परिणाम झालेला दिसून येतो.
सत्तरीतल्या ६५% व्यक्तींना निदान दोन शारीरिक आजार असतात. उदा. उच्च रक्तदाब आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि संधिवात इ. उच्च रक्तदाब आणि मधुमेहातून अर्धांगवायूचा झटका(stroke/paralysis) येण्याची शक्यता बळावते. काही वेळेस पार्किन्सन डीसीस(Parkinson’s disease), स्मृतिभ्रंश(dementia) असे आजार दिसून येतात. वयाबरोबर कॅन्सरचे प्रमाणही वाढते. याचाच अर्थ शरीरात वयपरत्वे होणाऱ्या अनेक स्वाभाविक बदलांबरोबरच अनेक शारीरिक व्याधी वृद्ध व्यक्तीला सहन कराव्या लागतात, त्यांच्यावर उपचार करावा लागतो आणि या आजारांमुळे आलेल्या मर्यादांचा स्वीकार करावा लागतो.
एखादा ट्रेकिंग करणारा माणूस दुर्धर संधिवात झाला, तर कदाचित डोंगर चढायला जाऊ शकणार नाही किंवा एखादी नृत्याची आवड असलेली स्त्री प्रत्येक नृत्यप्रकार करू शकणार नाही. वय जास्त झाले की लघवीवरचा ताबा नाहीसा होणे या अडचणीला अनेक वृद्धांना सामोरे जावे लागते आणि त्यातून खूप लाज वाटू शकते, जास्त काळ घराबाहेर राहण्याची भीती वाटायला लागते. तोल जात असेल तर आपण पडू अशी सतत भीती वाटते आणि अशी वृद्ध व्यक्ती एकटी कुठे जाऊ शकत नाही. काठी वापरणे म्हणजे आपल्या स्वाभिमानाला धक्का, आपल्या प्रतिमेला धक्का अशी अनेक जण समजूत करून घेतात आणि उलट त्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. पुन्हा पुन्हा पडल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. अनेक शारीरक व्याधींनी ग्रस्त शरीर थकते आणि सतत जाणवणारा थकवा, कृशपणा याचा मनावर खूप परिणाम होतो.
हेही वाचा… Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा दुष्परिणामच अधिक!
जितके आजार तितकी औषधे! आयुष्यभर एकही औषध न खाल्लेला माणूस आता १०-१० गोळ्या रोज घेऊ लागतो. शिवाय औषधोपचाराचा खर्च येतो ते वेगळेच! खर्चात हातभार लावायला, दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करायला, अगदी काठी, चष्मा आणि कानाचे यंत्र आणून द्यायला जवळचे कोणी असेल, थोडक्यात काळजी घेणारे कोणी असेल तर खूप मदत होते. बऱ्याच वेळा असा आधार नसतो, एकटेपणा बळावतो आणि मनावरचा ताण वाढतो. जर आर्थिक चणचण असेल तर हा ताण जास्तच जाणवतो. कधी कधी तर काळजी घेणारे कोणी असले तरी मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
अशा प्रकारे शारीरिक विकारांचा खोलवर मानसिक परिणाम होतो. त्यातून उदासपणाचा आजार होऊ शकतो. अर्धांगवायू, थायरॉइडचा(Thyroid) विकार या आजारांचा भाग म्हणूनच डिप्रेशन येते; तर अनेक शारीरिक व्याधी आणि डिप्रेशन हातात हात घालून येतात. माधवरावांना तीन महिन्यांपूर्वी अचानक उजव्या हातातील आणि पायातील शक्ती गेली आणि पॅरॅलिसिस झाला. वाचेवरही परिणाम झाला. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे वागणे बदलले. फार चिडचिड करू लागले. खायचे नसेल, तरी आग्रह केला, तर सरळ ताटली उडवून द्यायचे. जोरजोरात ओरडायचे, तर कधी कधी तासनतास काही न बोलता बसायचे. स्पष्ट शब्द उमटला नाही की चिडायचे. अचानक डोळ्यांना पाणी यायचे. फ़िजिओथेरपिस्ट घरी यायचे, त्यांच्याशी सहकार्य करणेच बंद केले. रात्र रात्र झोप लागत नसे आणि भूकही लागत नसे. डॉक्टरांनी डिप्रेशनचे निदान केले आणि उपचार सुरू केले.
७० वर्षांच्या जयंतरावांचे हार्ट अॅटॅक नंतर बायपासचे ऑपरेशन झाले. उत्तम पार पडले. आधी तर ते ऑपरेशन नकोच म्हणत होते. तब्येत चांगली होती, तरी त्यांनी ३ महिने कामाला न जाण्याचा निर्णय केला. उत्तम चालणारा व्यवसाय होता त्यांचा. हळू हळू फार उदास झाले जयंतराव. फारसे कोणाशी बोलेनासे झाले, टीव्ही बघणे, गाणी ऐकणे सगळे बंद केले. नुसते बसून असत. एकीकडे व्यवसायाची चिंता करत. त्यांच्या मनात सतत निराशेचे विचार येत, एखाद्या वेळेस तर त्यांना असे वाटे की जीवन संपवून टाकावे. त्यांची अशी स्थिती बघून घरातले फार अस्वस्थ झाले. डिप्रेशनचा इलाज सुरू झाला आणि महिन्याभरात ते काम करायला लागले आणि सकाळी उठून वॉकला जाऊ लागले.
हेही वाचा… मेटाबॉलिजम कशामुळे प्रभावित होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे?
उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक(अर्धांगवायू), पार्किन्सन डीसीज, फुफ्फुसाचे आजार, किडनीचे विकार, कॅन्सर, थायरॉइडचे(Thyroid) विकार, हृदयरोग, स्मृतिभ्रंश अशा अनेक आजारांशी डिप्रेशन निगडीत आहे; इतकेच नाही तर काही औषधांमुळे सुद्धा डिप्रेशन येते. शारीरिक व्याधी आणि डिप्रेशनची काही लक्षणे सारखी असतात. उदा. झोप आणि भुकेवर परिणाम, बद्धकोष्ठता(constipation), थकवा, लक्ष केंद्रित न होणे, सर्व क्रियांची गती मंदावणे इ. उदास वाटणे, रडू येणे अशी डिप्रेशनची म्हणून असणारी लक्षणे असतातच असे नाही. डिप्रेशनचा शारीरिक व्याधींवरही परिणाम होतो. शारीरिक व्याधींची लक्षणे अधिक तीव्र होतात. असलेल्या आजाराची औषधे घेण्यात अनियमितता केली जाते. त्यामुळे आजार बळावू शकतो.
उदा. डायबिटीस ची औषधे न घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. लक्षात आले नाही तर त्यातून आणखी नवे आजार उद् भवू शकतात. उदा. अतिप्रमाणात असलेला डायबिटीस दृष्टीवर विपरीत परिणाम करू शकतो, किडनीचा आजार होऊ शकतो. एकूणच शारीरिक आजाराविषयी निराशा वाटू लागते आणि बरे होण्याची उर्मी कमी होते. नियंत्रित नसलेला उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल जास्त असणे,(मेद जास्त असणे, lipids) या धोक्याच्या घंटा आहेत, ज्या मेंदूतील रक्तस्रावावर विपरीत परिणाम करतात, चेतासंस्थेवर परिणाम करतात, मेंदूत छोट्या गाठी, छोटे रक्तस्राव, पॅरॅलिसिसचे प्रकार निर्माण करतात. त्याचबरोबर डिप्रेशनही दिसते ज्याचे रुपांतर काही वेळा डिमेन्शियात होते. त्यामुळे या आजारांकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे असते. अल्झायमर सारख्या आजारातही डिप्रेशन आढळते आणि अनेक बौद्धिक लक्षणांसकट आपल्यासमोर येते. उदा. विस्मरण, क्रियांची कार्यशक्ती (executive functions) इ. म्हणूनच शारीरिक व्याधी आणि डिप्रेशन या दोन्हीकडे वृद्धापकाळात वेळेवर लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. योग्य उपचार केले तर अर्थातच त्या वृद्ध व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता चांगली राहते.