रुग्ण व डॉक्टर यांच्या संवाद कौशल्यामुळे किंवा त्याच्या अभावामुळे काय अनर्थ होऊ शकतात, हे आपण गेल्या खेपेस पाहिले. या लेखामध्ये आपण असेच काही मजेशीर किस्से समजून घेवूया. त्याचप्रमाणे काहीवेळा रुग्णांकडून डेंटिस्टची काय अपेक्षा असते याही गोष्टी समजून घेवूयात. एकप्रकारे डेंटिस्टकडे जाताना रुग्णांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी म्हणजे त्यांना सर्वोच्च उपचारपद्धती मिळेल आणि दोघांचाही वेळ वाचेल…
आणखी वाचा : Health Special: उन्हाळ्यातील सर्दी-ताप आणि खोकला-दमा याचे कारण काय?
कोणताही रुग्ण जेव्हा ट्रीटमेंट साठी डेंटिस्टकडे जातो त्यावेळी त्यांनी शक्यतो जेवूनचं जायला हवं. सकाळची वेळ असेल तर पोटभर नाश्ता, दुपारची वेळ असेल तर इतकं खावं की संध्याकाळी – रात्री लिक्विड डाएट घेतला तरी चालेल आणि रात्रीची वेळ असेल तर काहीतरी खाऊन जावे. हे यासाठी महत्वाचे आहे, कारण डेंटेल ट्रीटमेंटनंतर आपण काही तास जेवू शकत नाही. काही वेळा ट्रीटमेंट करते वेळी इंजेक्शनने भूल दिलेली असल्यामुळे ती जागा पुढील काही तासांसाठी बधिर असते. अशा वेळी गाल, जीभ, ओठ चावला जाण्याचा धोका अधिक असतो. भुलीचा परिणाम उतरायला काही तास लागतात. त्यामुळे त्या अवस्थेत तुम्ही खूप बोललात अथवा काही खाल्लं आणि त्यादरम्यान दाताखाली गाल, जीभ, ओठ आले तर ते चावल्यानंतर दुखत नाही आणि लक्षातही येत नाही. मात्र नंतर खूप त्रास होतो. अश्या अवस्थेमुळे मोठी जखम तोंडाच्या आतमध्ये होऊ शकते. अशी जखम भरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. म्हणूनच आपण काळजी घेतलीत तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो.
आणखी वाचा : Health Special: तुम्हालाही पित्ताचा त्रास सतावतोय? कारण, लक्षणे व उपचार सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा
आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कुठल्याही दातामध्ये आपण सिमेंट,चांदी भरतो, ते घट्ट होण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे दंतशल्यचिकित्साकडे जातांना पोटात भर टाकूनच जावे. “आधी पोटोबा, नंतर दंतोबा” याचा एक फायदा असाही होतो. खाल्यामुळे आपल्या मध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते. काही वेळा चक्कर येणे, गरगरने, अस्वस्थ वाटणे असे प्रकार खूप कमी होतात. डेंटिस्टने अशावेळी इन्स्टंट एनर्जी पेय आपल्या क्लिनिकमध्ये ठेवले पाहिजे. इलेक्ट्रॉल पावडर ग्लुकॉन-डी, लिंबू पाणी अगदीच काही नसेल तर साखरेचे पाणी दिलं तरी पेशंटची भोवळ कमी होते हे मी अनुभवाने सांगू शकतो.
आणखी वाचा : Health Special: मनोविकारात रासायनिक संतुलनाचे स्थान काय?
डेंटिस्टकडे येताना बऱ्याचदा पेशंट्स एकटे येतात. मला वाटतं कुठल्याही डॉक्टरांकडे जाताना एक व्यक्ती आपल्यासोबत नेहमी असावी. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे लोकांची अडचण होते खरी, परंतु अशावेळी १५ किंवा त्याहून मोठ्या वयाचे आपलं मुलं असले तरी चालेल किंवा ते शक्य नसेल तर बाजूच्या ओळखीच्या कोणालाही सोबत आणावे. अगदी घरात काम करणाऱ्या मावशीला आणलेत, तरी उत्तम. डॉक्टरांकडून इलाज केल्यानंतर घरी जाताना रस्त्यात चक्कर वगैरे येऊ पडू नये त्यासाठी सोबतीला कोणीतरी हवं. शिवाय डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या- औषधं घेण्यासाठी मदतीची गरज लागते. काही वेळा रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात. एक्स-रे काढावे लागतात काही पेशंट्स ना रक्त चाचण्या घेतांना ते पाहूनच चक्कर येते. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील. तर ‘एक से भले दो’ हे नेहमी लक्षात ठेवावे.
काही वेळा याच्या अगदी उलट घडते डेंटिस्टकडे येताना एक रुग्णासोबत तीन-चार घरची लोकही येतात. अशावेळी डेंटिस्टसमोर परिस्थिती फारच अवघड होते. एक तर कुठल्याही डेंटिस्टकडे क्लिनिकमध्ये फार मोठी जागा नसते. ९०% डेंटिस्टकडे क्लिनिक हे २०० स्क्वेअर फिट जागेतच बसविलेले असते. त्यात केबिनमध्ये अर्धी जागा डेंटल चेअर्स, एक्स-रे व्यापून टाकतात. अशावेळी क्लिनिकच्या वेटिंग भागात नातेवाईक बसले तर इतर रुग्णांना बसायला जागा राहत नाही. नातेवाईकांना आत केबिनमध्ये घेतले, तर डेंटिस्टला काम करणे अवघड होऊन जाते. त्यामुळे शक्यतो आपल्या सोबत एकच सहकारी असावा, हे केव्हाही उत्तम.
एकदा असेच माझ्याकडे कॅबिनमध्ये पेशंट सोडून चार जण आले. मी उपहासाने म्हटलं इतकेजण सोबत आले! रुग्णांच्या नातेवाईकाने माझ्या उपहासाकडे दुर्लक्ष करत माझा भ्रमनिरास तर केलाच… परंतु एकाला घरी ठेवले, तोही येणार होता असं म्हणत माझाच उपहास केला.
काही अगदी सामान्य गोष्टी असतात. परंतु त्याकडेही रुग्णांचे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. डेंटिस्टच्या केबिनमध्ये येताना चप्पल, बूट, सँडल आपण क्लिनिकच्या बाहेर काढायला हवेत. ते न करता काही रुग्ण सरळ पायताण घालून येतात व डेंटल चेअरवर बसतात काहींना बसल्यावर आपल्या पायाकडे लक्ष जाते व काहीजण दिलगिरी व्यक्त करतात. काही तर ‘जूता बाहर निकाल के आऊ क्या ?’ असेही विचारतात. बिचाऱ्या डेंटिस्टला काय बोलावे सुचत नाही काही वेळा रिसेप्शनिस्टने सूचना देवूनही पेशंट त्यांचे ऐकत नाही. प्रत्येक क्लिनिकमध्ये सूचना फलक असतात. पेशंट ते वाचत नाहीत किंवा अतिपरिचयात अवज्ञा अशी त्यांची अवस्था होत असावी. काही वेळा रुग्ण हे मोठे अधिकारी, उद्योगपती, राजकारणी, समाजसेवक असले तर या अडचणीत वाढ होत जाते. परंतु, या सर्व रुग्णांना विनंतीवजा सूचना द्यावीशी वाटते की, कुठल्याही डॉक्टरांचा जो ऑपरेटिव्ह विभाग असतो, तो अत्यंत स्वच्छ व निर्जंतूक असणे गरजेचे असते. तरच पेशंटला व इतरांना क्रॉस इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे आपणच काळजी घ्यावी. डॉक्टर्स, नर्स, स्टाफ व आपण स्वतःही यांना होणारा त्रास टाळावा.
डेंटिस्टकडे जाताना एका छोट्याशा गोष्टीकडेही मला लक्ष वेधायचे आहे. ते म्हणजे रुग्णाचा पेहराव कसा असावा? काहींना हा विचार अप्रस्तुत वाटेल किंवा हा काय प्रश्न आहे का, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु तब्बल २५ वर्षांच्या अनुभवानंतर व लाखांहून अधिक रुग्णांना सेवा दिल्यानंतर काही गोष्टी नक्कीच माझ्या निदर्शनास आल्या आहेत, त्या मी इथे मांडणे योग्य ठरेल. काही वेळा जवळचे रुग्ण क्लिनिकमध्ये अगदी घरातलेच काम करत असतानाचे म्हणजे गाऊन, स्पोर्टस् किंवा तोकड्या पॅन्ट किंवा स्पोर्ट बनियान अशाही कपड्यात ट्रीटमेंटसाठी येतात. जेव्हा इमर्जन्सी असते किंवा खूप आजारी पेशंट असतो त्यावेळी आपण खरेच कपडे वगैरे गोष्टींकडे लक्ष देत नाही. परंतु, इथे आपण डेंटिस्टकडे येणाऱ्या रुग्णांसंदर्भात बोलतो आहोत. कारण डेंटिस्टकडे इमर्जन्सी म्हणून येणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्यच असते. त्यामुळे आपण थोडा सोयीचा किंवा चांगला पेहराव करणे केव्हाही चांगलेच!
स्त्री रुग्णांच्या बाबतीत काही किरकोळ बाबींची नोंद सुद्धा जाता जाता घेऊया. मला वाटतं सर्व डेंटिस्टला सर्वात जास्त छळणारा अलंकार असेल तर तो म्हणजे स्त्री रुग्णांचे केस. स्त्री रुग्णांची केस बांधण्याची जागा डोक्याच्या मागे लावलेला बो, क्लिप काटा हे आणि डेंटल चेअरवर त्यांचे डोकं ठेवण्याची जागा यामध्ये सतत प्रतिस्पर्धा सुरू असते. काही वेळा त्या केसांचा चाप इतका मोठा असतो की डेंटिस्टला तोंडात इलाज करायला स्थिर जागा मिळत नाही. त्यामुळे रुग्ण व डेंटिस्ट यांची सतत डोक्याची पोझिशन स्थिरस्थावर ठेवण्याची धडपड चाललेली असते. स्त्री रुग्णाबद्दल एक छोटीशी अडचण नेहमी जाणवते ती म्हणजे घुंगट किंवा बुरखा घातलेले पेशंट जेव्हा ट्रीटमेंटला येतात तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये कुठलीही डेंटल प्रक्रिया करताना डेंटिस्टला थोडीफार कसरत करावी लागते. घुंगट घातल्याने वा बुरखा घातल्याने पेशंट आपले तोंड पूर्णपणे उघडू शकत नाही. त्यामुळे डेंटिस्टला काम करताना पूर्ण वाव मिळू शकत नाही. अर्थात प्रत्येक डॉक्टर यासाठी कधीही ट्रीटमेंट करायचा थांबत नाही. पेशंटचा कम्फर्ट झोन पाहूनच आपल्या अनुभवाच्या आधारे डेंटिस्ट योग्य मार्ग काढत चांगली ट्रीटमेंट देतात. परंतु पेशंटनेही थोडी काळजी घेतली व खबरदारी घेतली तर त्यामुळे ट्रीटमेंट करताना रुग्णालाच त्याचा जास्त लाभ मिळेल, एवढे मात्र नक्कीच!