माणिक: वय वर्ष ७. हा जरा जरी धावला तरी देखील त्याचे पाय दुखतात. अचानक पोटऱ्यांमध्ये गोळा येतो.
स्वरा: वय वर्ष १५. मला मासिक पाळीच्या वेळी त्रास होतोच. थोडं बॅडमिंटन जरी खेळलं तरी देखील लगेच पाय आणि पाठ दुखायला लागतात आणि अनेकदा पोटऱ्या जास्त दुखतात.
मनीषा :वय वर्ष २५ . मी रोज स्टेशन पासून ऑफिसमध्ये जाताना थोडं जरी चाललं तरी इतका त्रास होतो सारखे पाय दुखत असतात आणि अलीकडे हे पायाचं दुखणं खूप वाढले आहे.
अतुल : वय वर्ष ४० . सायकल चालवायला सुरुवात केली आहे. मात्र अचानक एकदम उगाचच हाडांमध्ये दुखल्यासारखं वाटतं. म्हणजे खरं तर मी याआधी गेली तीन वर्षे प्रॅक्टिस करतोय पण एवढं कधी दुखलं नव्हतं.
महेश: वय वर्ष ५०. सातत्याने मॅरेथॉन धावणारा रनर ! गेली अनेक वर्ष मी मॅरेथॉन धावतोय पण गेल्या काही दिवसांपासून इनफॅक्ट गेल्या काही महिन्यांपासून पायात दुखतंय आणि मी ‘ड’ जीवनसत्वाच्या गोळ्या घेतोय पण त्याने तात्पुरतं बरं वाटतंय. गोळ्या बंद केल्या की पुन्हा पाय दुखायला सुरुवात होते.
आहारतज्ज्ञ म्हणून काम करताना अंगदुखी किंवा अशक्तपणामुळे होणाऱ्या शारीरिक तक्रातरींबद्दल अनेकदा ऐकायला मिळतं.
“ पण हे एवढंच करायचं? “
“ नुसत्या मशरुम सूपने काय होणार ?”
असं म्हणणारे काही महिन्यात दुखणं बरं झाल्याच्या आनंदात सुखावून प्रगती झाल्याचं कळवतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या अंगदुखींचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यांसाठी देखील आहारात बदल करणे अत्यावश्यक असतं अनेकदा वेगेवेगळ्या गोळ्यांचे प्रयोग फसतात आणि एखाद्या जीवनसत्त्वाची कमतरता टोकाला जाईपर्यंत लक्षच दिलं जात नाही.
फक्त गोळ्या घेऊन तात्पुरता आराम मिळतो. मात्र अनेकदा योग्य ऊर्जेची कमतरता हेदेखील अंगदुखी पायदुखी, डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या प्रकार होऊ शकतात. त्यामुळे आहारातील कॅलरीज महत्वाच्या आहेतच. वजन कमी करताना ५०० -८०० कॅलरीजचा आहार घेताना शारीरिक तंदुरुस्तीकडे सहज दुर्लक्ष होऊ शकतं.
हेही वाचा… Health Special: चांगल्या त्वचेसाठी हे नक्की खा
अशावेळी आहारामध्ये स्निग्ध पदार्थ जरूर समाविष्ट करावेत. सूर्यफुलाच्या बिया, तीळ, अळशी म्हणजे जवस यांसारख्या तेलबियांचे सेवन करणे अत्यावश्यक आहे. अनेकदा आहारामध्ये तेलाचा वापरच न केल्यामुळे देखील तुमच्या शरीराला योग्य वंगण न मिळाल्यामुळे शरीरातल्या विविध अवयवांमध्ये दुखणे तयार होऊ शकते. तेलबियांचा वापर करताना ते सॅलडचा भाग होऊ शकते. शिवाय हे स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील संतुलित राहू शकते.
जीवनसत्व ड योग्य प्रमाणात मिळावे म्हणून शाकाहारींनी शक्यतो तेलबिया विविध प्रकारची तेले, शेवग्याच्या शेंगा , शेवग्याची पाने, कमळाचे देठ आणि मशरूम याचा आहारात नियमित समावेश करावे. सूर्यप्रकाशात उभे राहणे किंवा सूर्यप्रकाशात चालणे देखील ड जीवनसत्त्वाचे प्रमाण उत्तम राखण्यासाठी आवश्यक आहे.
जसजसे वय वाढत जाते तसं तशी हाडांची घनता आणि ठिसूळपणा वाढण्याची शक्यता असते यासाठी सुरुवातीपासूनच नियमितपणे व्यायाम करणे, हालचाली करणे, शारीरिक कसरत करणे या गोष्टी आवश्यक आहेत. व्यायाम करण्यासाठी केवळ जिममध्ये जाऊन व्यायाम करायला हवा असं काही नाहीये. तुम्ही घरगुती व्यायाम करू शकता. तुम्ही चालू शकता. तुम्ही शरीराचं वजन योग्य प्रमाणात राखून धावणं किंवा तत्सम व्यायामाबद्दल विचार करू शकता किंवा त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील घेऊ शकता. जर जीवनसत्व ड ची कमी असेल तर योग्य प्रमाणामध्ये ड जीवनसत्वाची औषधे घेऊन त्यानंतर त्याची पडताळणी करून पाहणे हे देखील तितकेच आवश्यक आहेत अनेकदा काहीतरी दुखू लागलं म्हणून सरसकट ड जीवनसत्वाच्या गोळ्या घेतल्या जातात. कोणीही हे करणे कटाक्षाने टाळायला हवे कारण गेल्या काही महिन्यांमध्ये ड जीवनसत्व जास्त असल्याच्या केसेस देखील वाढलेल्या आहेत.
त्यामुळे काही कधी काही दुखत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आहारामध्ये रोजच्या कॅलरीचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवा. नाश्ता करणे टाळत असाल तर तसे करु नका. तो सुरू करा. विशेषतः स्त्रियांमध्ये होणारी अंगदुखी किंवा पायाचं दुखणं, पाठीचं दुखणं हे सकाळी उठल्यानंतर काहीच न खाल्ल्यामुळे सुरु होणारे दुखणं आहे. त्यामुळे त्याला त्यावर लक्ष देणे आणि त्यावर उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये होत असणाऱ्या पाय दुखींसाठी विशेषतः दुधाचे की दुग्धजन्य पदार्थांचे किंवा दुधाचे प्रमाण वाढवणे हा उत्तम उपाय आहे त्याशिवाय त्यांना दररोज सूर्यप्रकाशात खेळायला लावणे किंवा योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची यावर लक्ष देणे आवश्यक आहे. ड जीवनसत्वाबद्दल विचार करताना सूर्यप्रकाश, योग्य झोप, योग्य तेलबियांचे आहारातील प्रमाण आणि जर मांसाहार करत असाल तर अंडी आणि चिकन यांचे आहारातील प्रमाण संतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे.